काळाचा काळ: Page 5 of 40

साराच अंधार. कमल – जयपाळ, मुळीच घाबरू नका तुम्ही, हा बाप्पा रावळाचा पुण्याईचा चितोडगड आहे. बायकांच्या अब्रूचा प्रश्न निघाला, तर सारा गड जोहाराच्या हलकल्होळाने भडकून, आकाशाच्या छताची राखरांगोळी करील. पण कोणाहि पाप्याचा हात निष्पाप पतिव्रतेच्या पदराला स्पर्श करू शकणार नाही. जयपाळ – तशी इतिहासाची साक्ष आहे खरी, प..... ण...... कालमाहात्म्याबरोबर इतिहास सुद्धा परंपरेला पारखा होतो. कमल – नाही होणार. बाबांच्या प्रेमाला गदागदा हालवून, मी त्यांची बुद्धी पालटीन. त्यात मी फसलेच तर माझ्या गौरीहराची शपथ घेऊन सांगते, राणीच्या पदराला हा घालायला, बनवीर महाराजांना कमलचं प्रेतच तुडवीत जावं लागेल. (दासीसह जाते.) (शिंगे कर्णतुता-यांच्या घोषात, मेवाडाधिपती बनबीर महाराज की जय, अशा गर्जना, प्रत्येक गर्जनेला समोरच्या बाजूने विक्रमाजित महाराजकी जय...... राणा उदयसिंहकी जय, अशा विरोधी गर्जनांची उलट सलामी मिळते. छत्र मोर्चेले उडत आहेत, अशा लवाजम्यानिशी संतापाने खवळलेला बनबीर प्रवेश करतो.) बनबीर – निमकहराम बंडखोर, विक्रमाजिताचा जयजयकार? (आतून तसा जयजयकार होतो.) उदयसिंहाचा जयजयकार? (तोच जयजयकार आतून. याशिवाय, बनबीराचा सत्यानाश, सत्यानाश, सत्यानाश. अशा आरोळ्या ऐकू येतात.) ....... जा, त्या राजद्रोही बंडखोराला आत्ताच्या आत्ता गिरफदार करून इकडं घेऊन या. (काही सेवक जातात.) जयपाळ, परमारांचा पराभव करून, विजयोत्सवात देवदर्शनासाठी आम्ही आलो असतां, आमच्या सत्तेचा उपमर्द? जयपाळ – किती पापी धाडस हे? बनबीर – परस्पर वैराच्या वाळवीनं विस्कळीत झालेली रजपुतांची राज्यसत्ता, भरभक्कम पायावर उभारण्यासाठी, मेवाडचा राजदंड हाती घेण्याची आम्ही मेहरबानी केली. गेल्या सहा वर्षांत राजद्रोही बंडखोरांचा नायनाट करून, उभा मेवाड आम्ही आमच्या कदरबाज शिस्तीखाली एकवटला. जयपाळ – सारी दुनिया उघड्या डोळ्यांनी हे पहात आहे. (काही सेवक एका तरुणाला पकडून आणतात. बनबीर महाराजकी जय असा जयघोष करतात. तो तरुण राणा उदयसिंहाचा जयजयकार अशी गर्जना करतो.) बनबीर – चूप रहा बदमाष. जयपाळ, या हरामखोराची जीभ आत्ताच्या आत्ता आमच्या समोर छाटून टाका.... का? अशी कांकूं कां ? जयपाळ – (बावरून खंजीर काढीत) बन्दा..... हुजूरच्या.... हुकमाचा..... ताबेदार..... तरुण – (जयपाळाला) धिःकार धिःकार, त्रिवार धिःकार तुझ्या मुर्दाड बीजाला न ब्रीदाला. बनबीर – उडाव हरामखोराची जिभली सफाचाट. तरुण – जिभल्या सफाचाट छाटून, आमच्या जळत्या विचारांची भडकती आग तू थोडाच विझवू शकशील? तुझ्या राक्षसी संतापाच्या होमात धडाड् उड्या घेणा-या शेकडो जिवांचे शाप, प्रत्येक क्षणाला तुझ्या खुनसट राजदण्डाचे कोळसे कोळसे करीत आहे. हे ध्यानात ठेव, आतापर्यंत हज्जारो जिवांची हत्या केलीस, तरी मदान्ध बनबिरा, विक्रमाजिताच्या रक्ताच्या थेंबा थेंबासाठी, तुझ्या नरड्याच्या चिंधड्या चिंधड्या उडवायला खवळलेला वेताळ काही ठार मेला नाही. उदयसिंहाचा जयजयकार बनबिराचा सत्यानाश. बनबीर – बनबिराच्या सत्तेची बदनामी? तरुण – लाख वेळा करीन. बनबीर – (तरुणाच्या पोटात तरवार खुपशीत) हे घे राजद्रोहाचे प्रायश्चित्त. तरुण – (तडफडत मरता मरता) उदयसिंह झिंदाबाद. बनबिराचा सत्यानाश. चितोड..... चितोड.... चि...तो...ड.... (मरतो.) जयपाळ – किती उलट्या काळजाचा राजद्रोही हा. (सेवकांना) जा हे प्रेत इथून घेऊन. सरकार स्वारी देवदर्शनाला आलेली न् हा अंमगळ देखावा इथं कशाला? जा. उचला. (सेवक प्रेत नेत असताना) त्याच्या धर्माप्रमाणे त्याचे शेवटचे संस्कार करा. बनबीर – राजद्रोही बण्डखोरांना कसला धर्म न् कसला संस्कार. लाथेच्या ठोकरीनं द्या ते प्रेत गडाखाली ढकलून. कोल्ही कुत्री गिधाडे त्याचे लचके तोडताना पाहून, मेवाडाधिपती बनबिराच्या सत्तेचा क्षुल्लक अवमान करणारांची काय दशा होते, याची उरल्यासुरल्या माथेफिरूंना चांगलीच दहशत बसेल. जयपाळ – खावंदांचं करणंच रास्त न् न्यायाचं..... हुजूरनी आता देवदर्शन घ्यावं. बनबीर – (लवाजम्याला) जा. तुम्ही सारे सेवक गुलाम, महाद्वारावर आमची रहा पहात उभे रहा. (लवाजमा प्रणाम करून जातो. बनबीर गाभा-याजवळ जातो. भटजी त्याला बिल्वपत्रे देतो. ती तो पिंडीवर उधळतो आणि नमस्कार करून परत येतो.) जयपाळ, तरुण रजपुतांत असला माथेफिरूपणा बोकाळलेला