काळाचा काळ: Page 40 of 40

मी माझी प्रतिज्ञा पुरी केली खरी, पण - सर्वजण – पण काय? उदय – निदान कमलदेवीसाठी तरी आजचा हा प्रसंग...... (शोकाकुल कमलदेवी येते.) कमलदेवी – टाळता आला असता.... तर नसत का हो बरं झालं. (बनबिराच्या प्रेताला कवटाळीत) बाबा बाबा, आता या अफाट जगात या अभागी कमलला कुणाचा हो आधार न् आसरा. जयपाळ – (तिला सावरीत) राजकन्ये, हे भवितव्य ठरलेलंच होतं, तिथं कुणाचा काय इलाज? सत्ताधा-यांची जुलूम जबरदस्ती कडेलोटाला गेली का त्यांची कंठस्नानाने अशीच अखेर करावी लागते. देवींनी पितृप्रेमाची मात्र कमाल शिकस्त केली. पोटची पोर कुणावर इतकी भक्ति करणार नाही. देवींनी भविष्याची काळजी करू नये. कमल – (उदयला) विजयी महाराज, मी आपली गुलाम बटिक बनले. अखेर आपणच आपला बोल खरा केलात ना? आता कशाला हे अश्रू न् आसवे? जयपाळ – देवी, बनबीर आपला काही जन्मदाता पिता नव्हता. कमल – बाप लेकाच्या नि मायलेकीच्या प्रेमासाठी जन्माची पुण्याई लागतेच. असा काही नियम नाही. माझे बाबा कित्ति प्रेमळ होते. एका शब्दानं त्यांनी कधी मला दुखवलं नाही, का माझा शब्द खाली पडू दिला नाही. उदय – कमलदेवी बनबिराची राजकन्या नव्हेच तर? कमल – खरंच. भलत्याच तरुणीला प्रेमाचं आश्वासन देवून, महाराज, आपण आपल्या कुलवंतपणाला कलंक लावलात. जयपाळ – चितोडाधिपतीकडून अशी चूक कधीच झालेली नाही.. कमलादेवी, तुझा जन्मदाता पिता..... हा पहा.... पराक्रमी हमीर इथंच आहे. कमल – लढाईच्या धामधुमीत बायको मुलीला नशिबाच्या वा-यावर झुगारून त्या धुमाळीत जो गडप झाला, त्याला काय बाप म्हणायचं? माझे बाबा बनबीरच. बाबा..... जयपाळ – कमल, तुझ्या प्रेमानंच चितोडला आज हा भाग्याचा दिवस दिसला. तू आपल्या प्रेमानंच नाही का महाराणी मातोश्रींचा बंदिवास सुखाचा केलास? हमिराने – तुझ्या पिताने – घरादाराचा मोह सोडून, वनवास पत्करला नसता, आणि राणाजींच्या पाठीवर सावलीसारखा रानोमाळ भटकला नसता, तर चितोडला उदयसिंहाचे दर्शन तरी झाले असते काय? आणि तू तर राजकुमाराला आजच्या एकाच रात्रीत या काळाच्या जबड्यातूनं दोनदा प्राणदान दिलंस. कमल – विजयी महाराज, बनबिराच्या छातीचा ठाव घेणारा तो खंजीर क्षणभर माझ्या हाती द्याल काय? जयपाळ – तुझ्या हाती नाही. माझ्या हाती. महाराज, आणा पाहू तो खंजीर इकडं. (घेतो.) वेडे पोरी, तूं तर आम्हा सगळ्यांची यशवंती. तुला पाहिलं म्हंजे आम्हा सगळ्यांना पन्नाची आठवण होते. तूच जर राजकुमारावर आपल्या प्रेमाची ढाल आडवी धरली नसतील, तर आजचा हा चितोड-मुक्तीचा दिवस उगवलाच नसता. चल. पूस ती आसवं.... राणाजी, या असे पुढे...... कमलदेवी. तू पण ये. महाराणी रूपमतिच्या आज्ञेप्रमाणे, या खंजिराला माखलेला बनबिराच्या रक्ताचा टिळा मी तुच्या दोघांच्या कपाळी लावून, मेवाडाधीश्वर महाराज नि महाराणी म्हणून आपला हाच राज्याभिषेक करीत आहे. (सगळीकडून गर्जना – चितोडेश्वर राणा उदयसिंहाचा जयजयकार., चितोडसम्राज्ञी कमलदेवीचा जयजयकार. शिंगे, तुता-या, नौबदी वाजवतात.) हमीर – हा पहा सूर्यनारायण उदयाचलावर आला. उदय – उगवत्या सूर्यनारायणाची आजच्या राज्यक्रांतीवर अखंड प्रकाशाची कृपा असो. (जयजयकारात नाटकाची समाप्ती.) ता. २७ जुलै १९५३ अंक पाचवा समाप्त