काळाचा काळ: Page 4 of 40

आय्या, ही बातमी आम्ही आताच ऐकतो.

जयपाळ – वा. या विवाहाच्या टोलेजंग तयारीचे खास हुकूमसुद्धा सर्व खात्यांना जाहीर झाले, आणि देवींना अजून पत्ताही नाही?...... हां, कदाचित असं असेल, विजयोत्सवाच्या आजच्या दरबारी मेजवानीत, ही मंगल वार्ता देवींच्या कानावर घालून, आपल्या लाडक्या राजकन्येच्या कोमल मनाला साखरधक्का द्यायचा महाजारांचा विचार असेल.

कमल – कोण कुठली धारानगरी न् कोण कुठले परमार. जन्मात, त्यांची तोंडहि पाहिली नाहीत मी न् म्हणे. त्याच्याशी माझा विवाह.

जयपाळ – देवी, हा राजकारणी विवाह आहे. प्रेमकारणी नव्हे. आणि तो बनबीर महाराजांनी आपल्या भावी सुखाकडे पूर्ण लक्ष देऊनच ठरवला असला पाहिजे.

कमल – राजकारणी विवाह म्हंजे प्रेमाचं झालंच मातेरं. आणि प्रेमाशिवाय विवाह म्हंजे प्राणाशिवाय प्रेताचंच जिणं. नाहीतर काय? मला मुळीच न विचारता, माझ्या दिलाचं दान? देहाचं दान? प्रेमाचं दान करायला सुद्धा आम्ही गुलामच वाटतं? चंचला – हा काय न्याय झाला? कमल – माणुसकी तरी म्हणता येईल का? जयपाळ – न्यादेवतेप्रमाणं राजकारण हे सुद्धा आंधळं असून, शिवाय त्याला काळीज मुळीच नसतं. राजकारणाच्या इभ्रतीसाठीच हा विवाह ठरला आहे न् तो सर्वसमर्थ बनबीर महाराजांनी ठरवला आहे. कोण त्याला आता विरोध करणार? कमल – त्या इभ्रतीच्या थडग्याखाली ही कमल जिवंत गाडली गेली, तरी त्याची मग कुणालाच पर्वा नाही, असंच ना जयपाळ? जयपाळ – चाणाक्ष राजकन्येला हे काय मी सांगायला हवे? राजकन्यांचे विवाह राजपुत्रांशीच व्हावे लागतात. चंचला – तो कसाहि असला तरी? कमल – जयपाळ, प्रेमाच्या स्वयंवराशिवाय, या कमलदेवीच्या जिण्याचा असा राजकारणी विक्रा व्हायचा असेल, तर परमारानां म्हणावं, तुमच्या युवराजांना या बनबीरकन्येच्या प्रेताचंच पाणिग्रहण करावं लागेल. जयपाळ – देवींनी थोडा विवेक करावा. त्रागा करू नये. विवाह राजकारणी असो, नाहीतर प्रेमकारणी असो, ती सुखी किंवा दुःखी करण्याचे मर्म पतिपत्नीच्याच हाती असते. कमल – बाबांच्या राजकारणी जुगारीला मान वांकवण्यापेक्षा, माझ्या हृदयाला जिंकणा-या त्या दिव्य जादूसाठी...... आ हा.... ही कमलदेवी आपल्या जिवाचं रान करायला मागं पुढं पाहणार नाही. जयपाळ – म्हणे ? ताईसाहेबांनी आपल्या हृदयाचं दान आधीच कुणाला केलंय की काय? चंचला – या गौरीवर चितोडच्या गौरीहरानं आपल्या मायेची पखरण घातली आहे हो. जयपाळ – चितोडचा गौरीहर ? चितोडचा गौरीहर कोण? कमल – चितोडचा हा एकलिंगेश्वर नाही का? याला मी माझं सारं जीवनच अर्पण करून टाकलंय. (चंचलेला डोळ्यांनी दटावते.) जयपाळ – प्रश्न जोवर लाडुकपणाचा किंवा सामोपचाराचा असेल तोवर ठीक आहे. पण राजकारणाची पाषाणहृदयी भूक शमवण्यासाठी, परमारांना राक्षसविवाहाची परवानगी मिळाली, अन् आपली संमति असो वा नसो, आपल्यावर बलात्काराचा प्रसंग आला........ कमल – तसा तो येईल म्हणता? जयपाळ – शंका आहे की काय? बनबीर महाराजांच्या राजवटीत आज अशक्य असं काय आहे? कमल – तसाच मुकाबला बितला, तर माझ्या प्राणेश्वराचं चिंतन करीत आनंदानं मी अग्निकाष्टं भक्षण करीन. जयपाळ- महाराणी रुपंमतीनं हेच करावं, असंच का आपलं म्हणणं ? कमल- म्हंजे ? तुमचा सवाल समजला नाही नीटसा मला ? जयपाळ – महाराणी रूपमतीनं आपलं राजरोस पाणिग्रहण करून, बनबीरपत्नीच्या नात्यानं, उद्याच्या दरबारात सिंहासनावर शेजारी बसलंच पाहिजे, अशा हट्टानं, आज रात्री महाराज रूपमतीवर बलात्कारसुद्धा करतील. कमल – राणीसाहेबांवर महाराज बलात्कार करणार जयपाळ – तसा प्रसंग आला आहे खरा. कमल – नाही...... नाही...... त्रिवार नाही. माझ्या देवाला दिलेल्या वचनासाठी तरी असला प्रसंग राणीसाहेबांवर येऊ देणार नाही मी. जयपाळ – प्रश्न स्त्रियांच्या अब्रूचा आहे आणि तो पुरुषापेक्षा स्त्रियाच कुशलतेनं सोडवतील. माझी मति तर अगदी कुंठित झाली ताईसाहेब. म्हणून आपल्या पायांचा आसरा शोधीत धावत आलो. देवीनीच आपल्या जिवाभावाची पाखर राणीसाहेबांवर घातली, तरच त्यांचा काही बचाव होणार आहे. आपण धीर सोडलात...... का......