काळाचा काळ: Page 3 of 40

पण जयपाळ. विक्रमाजित महाराजांच्या छातीत घुसलेला तो भयंकर खंजीर, रक्ताच्या चिळकांड्यांनी भरलेला तो पंचपक्क्वानांचा थाळा, रक्तांच्या पिचका-यांनी लालबुंद रंगलेल्या त्या चादरी, नि गालिचे, महाराजांनी फोडलेली शेवटची ती भेसूर किंकाळी नि मागे लोडावर टाकलेली ती मान, जयपाळ, आठवण कर, त्या सर्व देखाव्याची आज सहा वर्षांनी पुन्हा आठवण कर, आणि तुझ्या मेवाडनिष्ठ हृदयात सूडाचा धगधगता वणवा भडकत राहू दे. जयपाळ – तो देखावा रात्रंदिवस माझ्या डोळ्यांसमोर वावरतो आहे अन् सूडाच्या भावनेलाहि माझं मन पारखं झालेलं नाही. (आत पुन्हा कर्णे, तुता-या, नौबदींचा आवाज.) ही पहा, त्या बनबिराची स्वारी जवळ येत चालली. चल. जा जा चटकन निघून जा. (पुन्हा शिंगे वाजतात) चल आटप. या दक्षिण बाजूच्या दरडीवरून घसरत जा. जोहार.

हमीर – जोहार. (इकडे तिकडे पाहत निघून जातो.) (आत – राजकन्या कमलादेवी देवदर्शनाला जात आहेत. जाबता बंद. निगा रखो मेहरबान.) जयपाळ – आस्सं, राजकन्या येत आहे. हमीर गड उतरून गेला का नाही, पाहिलं पाहिजे. (जातो.) (पुजेचं साहित्य घेतलेली दासी चंचला आणि पाठोपाठ राजकन्या कमला)

कमल – चंचले, परमारांचा पराभव करून महाराजांनी दिग्विजय मिळवला. म्हणून सा-या गडावर आज कितीही आनंद उसळला असला, तरी या एकलिंगेश्वराच्या मंदिरातला आनंद काही निराळाच असतो, नाही का? वाटतं, रात्रंदिवस इथंच त्या गाभा-यात बसून, या गौरीहराची मंगल स्तोत्रं सारखी गात रहावं.

चंचला – ताईसाहेब, आज आपण अगदी देवी पार्वतीची भाषा बोलताहात, असं वाटतं.

कमल – काहीतरीच बोलावं झालं. कुठं पार्वतीमाई न् कुठं आपण माणसं. देवाची योग्यता माणसाला अशी लावू नये चंचले.

चंचला – लावू नये खरं. पण आपले शुद्ध विचार नि तसाच हा पांढरा शुभ्र वेष पाहून, हृदयेश्वर महादेवाला प्रसन्न करणासाठी ही हिमनगजा गौरी तपश्चर्येच्या तयारीत आहे, असाच देखावा मला आता दिसत आहे.

कमल – गौरीसारखी तपश्चर्या कुणाला साधणार चंचले. तपाच्या तेजानं गौरीनं हराला प्रसन्न करून, जगाला गौरीहर दाखवला.

चंचला – मग या आमच्या गौरीला राजकुमार भेटून, आज मलूल असलेल्या या कमलाला प्रफुल्लित करणार नाही की काय? एकलिंगेश्वराची सेवा वाया जायची नाही म्हणते. (आत वाद्यांचा गजर होतो.) - अगबाई, महाराजांची स्वारी देवदर्शनाला येत आहे वाटतं.

कमल – चल, आपण पूजा आटपून लवकर परत जाऊ राजवाड्यात (चंचला पूजासाहित्य घेऊन पिंडीजवळ जाते.) थांब थांब चंचंले. मी माझ्या हातांनीच देवाला साज चढवते. (पिंडीला हार घालते)

चंचला – ताईसाहेब, ही पहा बिल्वपत्रं खाली पडली. गौरीहरानं कौल दिला. राजकुमार उदयसिंह लवकरच येणार गडावर. जयपाळ – (प्र.क.) धारानगरीच्या भावी सम्राज्ञीचा जयजयकार असो.

चंचला – (मोठ्याने ओरडते.) गोषा गोषा. जाबत्यावर कोण आहे?

जयपाळ – घरोब्याच्या मंडळींना कसला आलाय गोषा? गोषा इतरांना. जयपाळाला नाही.

कमल – चंचले, अग हे आपले हप्तहजारी सरदार जयपाळ. असं काय नीट माणूस पाहिल्यावाचून खसकन् एखाद्याच्या अंगावर जावं.

जयपाळ – (प्रणाम करीत) धारानगरीच्या भावी सम्राज्ञीचा जयजयकार.

कमल – जयपाळ, हा प्रणाम का माझी थट्टा?

जयपाळ – कर्दनकाळ बनबीर महाराजांच्या लाडक्या राजकन्येची थट्टा? कोण करील? धारानगरीच्या आजच्या युवराज्ञीनं आणि उद्याच्या परमार सम्राज्ञीनं या राजनिष्ठ जयपाळाचा मुजरा घ्यावा.

कमल – तुम्ही खास माझी थट्टा करीत आहात.

चंचला – कदाचित विनोदाचा एक नवा प्रकार असेल हा. महाराजांना कळला तर?

जयपाळ – कळला तर? कमलदेवीला ही आनंदाची बातमी प्रथम कळवल्याबद्दल मला शाबासकीच मिळेल.

कमल – मी धारानगरीची युवराज्ञी? कुणाशी हा आचरटपणा करता आहात जयपाळ?

जयपाळ – राजकन्येनं राग मानू नये. हा आचरटपणा नाही कागदोपत्री ठरून गेलेला सिद्धांत. महाराजांनी पराभूत केलेल्या परमारांचे प्रतिनिधि, तहनामाच्या अटीप्रमाणं उद्या सकाळी भर दरबारात, मंगल आहेराचा राजकन्येला साखरपुडा देणार. आमची राजकन्या कमलदेवी धारानगरीची परमारयुवराज्ञी होणार.

चंचला –