काळाचा काळ: Page 2 of 40

लांडग्यानं ताडकन् उडी मारून, महाराजांच्या छातीत खंजीर खुपसला. आणि महाराजांच्या अन्नाला न् चितोडच्या इभ्रतीला बेमान झालेल्या आपल्या जातभाई रजपूत सरदारांनी, मेजवानीची भरली ताटं लाथाडून राजवाड्यात कापाकापीची कत्तलरात्र केली. काय? तुझ्या डोळ्यांना पाणी? जयपाळ – कां येणार नाही. हमीर, त्या काळरात्रीची आठवण, काळजाचं सुद्धा पाणीपाणी करील. मग माझी कथा काय? अरेरे, कसली घातकी ती काळरात्र.

हमीर – राज्यतृष्णेपेक्षा राणी रूपमतीविषयी त्या राक्षसाची विषयवासनाच त्या खुनाच्या मुळाशी होती ना? सारे रजपूत क्षुद्र स्वार्थाला बळी पडून, आत्मद्रोही बनले नसते, तर इराण अफगाणच्या धाडशी लुटारूंची या हिंदुस्थानाकडं वाकडी नजर फेकायची काय माय व्याली होती. रजपूतच एकमेकांची हाडं कडकडा चावायला सवकले, म्हणूनच अकराव्या शतकात महमद गझनीचा सोटा सोमनाथाच्या टाळक्यावर तडाड् कोसळला.

जयपाळ – हमीर, असा त्रागा करून, जुलमी सत्तेचं उच्चाटन होणार नाही. शांतपणानं..... विवेकानं.......

हमीर – बस् कर तुझ्या शांतीच्या न् विवेकाच्या गप्पा, बदअफलाद बनबिराच्या एका शब्दाचा तरी कुणाला निर्वाळा देता येईल काय? राजकुमार वयात येईतोवरच मेवाडची राज्यसत्ता मी चालवीन. नंतर बिनतक्रार सत्तासंन्यास करीन, अशी आपल्या साक्षीदार रजपूत सरदारांशी केलेली प्रतिज्ञा तरी त्या नीचनं पाळली काय? उलट, महाराजांच्या तेराव्याच्याच दिवशी कुमार उदयसिंहाचा खून पाडण्याचा त्या राक्षसानं धाडशी प्रयत्न केला. त्या प्रसंगी, त्या पन्नादाअीनं...... आहा, देवते पन्ना, तुझं नुसतं नामस्मरण केलं तरी हा चितोड न् मेवाडच काय, उभा भरतखंड उद्धरून जाईल.... त्या महान् देशाभिमानी पन्नेनं, आपला पोटचा गोळा बळी देऊन कुमाराला प्राणदान दिलं. जयपाळ, जयपाळ, कुठं ती त्या पन्नादेवीची राजनिष्ठा न् कुठं तुम्हा मिशाळ मर्दांची शांतीची नि वेवेकाची पुराणं.

जयपाळ – माझी विवेकाची भूमिका तुला क्षुद्र वाटणं साहजीक आहे. पण मातोश्री राणी रूपमतीच्या पातिव्रत्यावर त्या लांडग्याची झांप पडू नये, म्हणून, हमीर, या जयपाळानं आपल्या नाटकी राजनिष्ठेची ढाल आड धरलेली आहे.

हमीर – खरंच का हे जयपाळ? जयपाळ – श्री एकलिंगजी याला साक्ष आहे. अखंड रक्तपाताला सोकावलेल्या बनबिरासारख्या बोक्यापुढं नीच गुलामाला साजेल, अशा निष्ठेच्या नटवेपणानं नाचून, राणी रूपमतीच्या दुःखाचा कडेलोट सावरून धरताना, या हतभागी जयपाळाच्या मनाचे आतल्या आत काय धिंडवडे उडत असतील, याची हमीर, तुला कल्पना करता येत असेल तर करून पहा..... उद्या तर तो प्रळयच करणार आहे.

हमीर – काय करणार आहे? जयपाळ – परमारांचा पराभव करून आल्यामुळं, बनबीर विजयानंदानं अगदी बेहोष झाला आहे. राणी रूपमतीनं आपलं उघडउघड पाणीग्रहण करून, विक्रमाजिताच्या रक्तानं माखलेल्या सिंहासनावर बनबीर-पत्नी म्हणून भरदरबारात उद्या बसलंच पाहिजे, असे जबरदस्तीचे यत्न आता चालू आहेत.

हमीर – आमच्या मातोश्रीवर तो नराधम हात टाकील, तर जयपाळ, माझ्या आईच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो, उद्याचा सूर्य उगवण्यापूर्वीच हा हमीर त्याचं नरडं चिरल्याशिवाय राहणार नाही. जयपाळ – खुनाचा यत्न फसल्यावर, हद्दपार झालेल्या उदयसिंहाचा सुद्धा बनबिरानं पाठलाग चालवला आहे. सापडेल तिथं त्याला ठार मारण्यासाठी, गुप्त वेषाचे पटाईत मारेकरी, देशोदेशी रवाना झाले आहेत. कदाचित्..... या पूर्वीच बिचा-या उदयसिंहाची इतिश्री..... (एकदम नौबती कर्णे तुता-या वाजतात)

जयपाळ – हा. चल पळ इथून आता. बनबिराची स्वारी देवदर्शनासाठी राजवाड्यातनं निघाल्याची शिंगं वाजली. आता तू इथं कुणाच्या नजरेला पडलास, तर फुकट प्राणाला मुकशील. चल जा जा, लवकर जा. हमीर – उकिरड्याच्या मोलानं जीव गमावणारा हा हमीर नव्हे. (जयपाळाच्या कंबरेच्या पट्ट्याला झोंबतो) दे दे, जयपाळ, दे मला तुझा हा खंजीर. आता एकटाच चित्त्यासारखा उडी घेऊन, त्या अधमाच्या नरड्याच्या चिंधड्या चिंधड्या उडवतो.

जयपाळ – हमीर थांब. अशी लाट करू नकोस. तुझ्या या आकांडतांडवानं नजिकच्या राजवाड्यातले लोक धावून येतील आणि तू नि मी अचानक गोत्यात सापडलो का आपल्या सा-या मनोरथांचा डोलाराच जमीनदोस्त व्हायचा. जा. आल्या पावली परत जा.

हमीर – जातो.