काळाचा काळ

प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय खंड तिसरा

नाटक - काळाचा काळ

अंक पहिला

(स्थळ, स्थिती नि पात्रे : चितोड किल्ल्यातील श्री एकलिंगेश्वराचे देवालय. पूजा आटोपल्यावर पुजारी आणि इतर लोक आरती करताहेत.)

जटा भुजंग पिंगलत् स्फुरत्फणा मणिप्रभा कदम्ब कुंकुमद्रव प्रदिप्त दिग्वधूमुसे मदान्घ सिन्धुरस्फुरत् त्वगुत्तरीय मेदुरे मनोविनोदमद्मुतम् विमर्तु भूत भर्तरी अगर्व सर्व मंगला कलाकदम्ब मंजरी रसप्रवाहमाधुरी विजृम्भणा मधुव्रतम् स्मरांतकम् पुरांतकम् भवान्तकम् कृतातन्तकम् गजान्त कान्त कान्तकम् तमान्तकान्तकम् भजे जयत्वदम्र विभ्रम भ्रमद् भुजंग मत्स्फुरत् धगत् धगत् विनिर्भ्रमत् कराल काल हव्यवाक् घिमित् घिमित् घिमित् ध्वनन मृदंग तुंग मंगलत् ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिवः

(आरती पुरी होत असतानाच सरदार जयपाळ दर्शनाला येतो. एक भटजी घाईघाईने पुढे होऊन त्याला आरती दाखवतो. जयपाळ आरतीत मोहोर टाकतो. भटजी आशीर्वाद गुणगुणतो. चिरंजीव भव, विजयशाली भव.)

सर्वजण ओरडतात – श्री एकलिंगेश्वराचा जयजयकार, चितोडाधिपती बनबीर महाराजांचा विजय असो. (देवळापासून दूर अंतरावर बसलेला, दाढीमिशांचे जंजाळ वाढलेला, फाटके तुटके कपडे घातलेला हमीर कर्कश आवाजात गर्जना करतो. त्याचा सत्यानाश होवो. दुस-यांदा जयजयकार होताच पुन्हा ओरडतो. त्याच्या तोंडात माती पडो. ते आवाज ऐकताच सारे चकित होतात आणि इकडे तिकडे पाहू लागतात. जयपाळाला तो दिसतो. झपाट्याने तो त्याच्या जवळ जातो.)

जयपाळ – हा कोण वेडापीर इथं आलाय? चितोडच्या महाराजांना जयश्री चिंतन करताच, याच्या कां कपाळाला आठ्या? (हमीर पुन्हा हातबोटे चोळीत दात खात तेच निषेधाचे शब्द उच्चारतो.) पुन्हा तेच? काय रे? कोण तू? आमच्या बनबीर महाराजांचं नाव काढताच....

हमीर – त्याचा सत्यानाश होवो....... त्याचे कोळसे होवोत....... त्याच्या तोंडात माती पडो. जयपाळ – (तलावर उपसून) चूप रहा बेशरम. राजद्रोही. हमीर – राजद्रोही? (उठून समोर येतो.) कोण राजद्रोही? तू राजद्रोही........ तुम्ही सारे राजद्रोही.

जयपाळ – (त्याला ओळखून) कोण? माझा मित्र हमीर? काय रे वनवासामुळे तुझी स्थिती झाली ही. ये...... ये....... मित्रा, मला कडकडून भेट दे. (त्याला भेटायला पुढे होतो.)

हमीर – हां खबरदार मला शिवशील तर, वनवासानं मला प्रेतकळा आलेली असली, तरी हरामखोर धन्याची सेवा करणा-या गुलामांच्या भपकेदार पोषाकाचं पाप मला मुळीच परवडणार नाही. जयपाळ – हमीर, या पोषाकावरून माझ्या अंतःकरणाची.... त्यात रात्रंदिवस धगधगणा-या विवंचनेची...... किंमत करण्याचं धाडस करतोस तू? मोठी चूक करतो आहेस तू. या पोषाकाच्या आत हमिराच्या शुद्ध अंतःकरणासारखं स्वदेशनिष्ठ नि स्वराज्यनिष्ठ अंतःकरण धडधडत आहे.

हमीर – बस् कर तुझ्या स्वदेश नि स्वराज्यनिष्ठेच्या वल्गना. बाप्पा रावळाच्या तेजाचं, कुंभाराण्याच्या बीजाचं नि करुणदेवीच्या शीलाचं अस्सल रजपूत बियाणं आज हिंदुस्थानात असतं, तर जयपाळ, या जुलमी अत्याचारी नि खुनी बनबिराचा दास तर खास बनला नसतास. जयपाळ – तुला माझी भूमिका नीटशी उमगली नाही हमीर अजून. माझी राजनिष्ठा.....

हमीर – आग लाव तुझ्या राजनिष्ठेला. दगाबाजी खून, अत्याचारांच्या काजळीने काळं तोंड करून, मेवाडवर जुलमी सत्ता गाजवणारा तो बदमाष बनबीर, हाच तुझा राजा ना?

जयपाळ – चुकत आहेस, हमीर, चुकत आहेस तू.

हमीर – तर मग या अधमाच्या पायाची धूळ चाटीत कुलंग्या कुत्र्यासारखा इथं कां तूं पडून राहिला आहेस ? अत्याचारी जुलमांच्या घरटात मायदेशाची हाडं कडकडा पिचून तसंच त्यांचं पाठी पडत असताना, स्वतःच्या प्राणाची न् रुबाबाची पर्वा करणारे तुझ्यासारखे बेमान रजपूत बोकाळले, म्हणूनच बनबिरासारखे नराधम दासीपुत्र चितोडच्या छातीवर टांच देऊन उभे राहिले.

जयपाळ – हमीर, तोंड संभाळून बोल. माझ्याबद्दल तुझ्या काहीहि कल्पना असल्या, तरी मला बेमान रजपूत म्हटलेलं मुळीच खपणार नाही.

हमीर – कशाला खपेल? हो. इमानाच मुखवटा घालूनच हा चोरटा मेजवानीला आला ना? विक्रमाजित महाराजांनी दिल्दार मनमोकळेपणानं या पाप्याचं आदरातिथ्य केलं. आणि..... जयपाळ. त्या काळरात्रीच्या घोर प्रसंगाची आठवण कर. मेजवानीला सुरुवात होते न होते तोच या कृतघ्न