हिंदू धर्माचे दिव्य: Page 10 of 30

मुसलमानांची लोकसंख्या भराभर वाढली आणि त्याचे राष्ट्रीय महत्त्व वृद्धिगंत होऊन, त्याच्या अचाट कर्तबगारीचा महिमा कालपटावर अक्षयींचा खोदला गेला. (* मुसलमानी धर्म स्वीकारताना काही मोठा अवाढव्य विधी करावा लागत असे, असे मुळीच नाही. इस्लाम धर्माची तत्त्वे ज्याला मान्य झाली तो मुसलमान झाला; म्हणजे `जो स्वतःला मुसलमान म्हणवितो तो मुसलमान’ एवढाच काय तो विधि. पण अशा रीतीने आपद्धर्म म्हणून इस्लामी गोटांत शिरलेल्या कोट्यवधि हिंदूंना `जो स्वतःला हिंदु म्हणवितो तो हिंदु’ असला उलट उतारा देऊन हिंदु धर्माच्या माहेरघरी परत आणण्याची अक्कल आमच्या हिंदुधर्मप्रवर्तकांत असू नये, या आत्मघातकी परिस्थितीची वर्णन कोणत्या शब्दांनी करावे?) अंदाधुंदीच्या विस्कळीत लोकस्थितीत सर्व प्रकारच्या ऐक्याचा वढा जबरदस्त जोम केवळ एका व्यक्तीच्या व्यावहारीक धोरणाने अत्यंत अल्पावकाशात निर्माण झाल्याचे उदाहरण जगाच्या इतिहासात इस्लाम धर्माशिवाय दुसरे नाही. मुसलमानांच्या कर्तबगारीची कशीहि उलटसुलट छाननी करा, त्यात एक मुख्य गोष्ट विशेष आढळून येते ती हीच की धर्म आणि राज्य या दोन अन्योन्यपोषक गोष्टी त्यांच्या कर्तृत्वांत बेमालूम एकवटल्यामुळे धर्माच्या सबबीवर राज्य वाढले, आणि राज्याच्या सबबीवर धर्माचा प्रसार होऊन, अनुयायांच्या वाढत्या लोकसंख्येने जगतीतलांवर मुसलमानांची एक नवीन महापराक्रमी राष्ट्रीय सत्ता चालू झाली. इस्लाम धर्माभिमानी अरब धर्मप्रसाराकरिता स्वदेशाबाहेर जेव्हा हिंडू लागले, तेव्हां त्यांना जे जे भिन्न वर्णाचे व भिन्न धर्मांचे लोक भेटत त्या सर्वांस केव्हा जुलमाने, केव्हा लालुचीने तर केव्हा युक्तीने त्यांनी ग्रासून आपल्या जुटीत आणले. असा रीतीने इराणातले इराणी, तुराणातले तुराणी, मोंगोलियातले मोंगल, हिंदुस्थानातले आर्य, आफ्रिकेतले शिद्दी वगैरे झाडून सारे या नवीन धर्मात शिरल्याबरोबर एक झाले. त्यांना भाग्योदयाचा अभिनव राजमार्ग खुला झाला. वैयक्तिक पराक्रम गाजवून स्वतःच्या ब-यावाईट बुद्धीचा विकास करण्याची संधी मिळाली. एकजुटीने एकाच ध्येयाकरिता कस्सून उद्योग करण्याची नवीन उत्तेजक शिस्त लागली. जगाच्या पाठीवर वाटेल तिकडे मनमुराद भटकून पराक्रम गाजविण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य आल्यामुळे, निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या संस्कृतीचा आणि विद्येचा त्यांना पूर्ण परिचय होऊन, ते अत्यंत बहुश्रुत बनले. ते आपला मूळस्वभाव विसरले आणि एकजुटीने नवीन नवीन उद्योग करून ख-या खु-या लोकसंग्रहाच्या जोरावर स्वराष्ट्राची स्थापना करण्यास समर्थ झाले. नुसता त्यांचा धर्म एक झाला, एवढेच नव्हे तर, कोणत्याही ठिकाणी त्यांना उच्च संस्कृति आढळली तर तेथल्या लोकांना ते आपल्या इस्लाम धर्माच्या गोटात खेचून आणून त्यांची ती संस्कृतीहि आपलीशी करून टाकीत. वाटेल त्या परिस्थितीतही देशकालवर्तमानाचा विचार न करता हिंदूंप्रमाणे जुन्यासच चिकटून राहण्याची आत्मघातकी आणि राष्ट्रघातकी प्रवृत्ति इस्लामानुयायांनी साफ झुगारून दिली. दुस-यांतील चांगले असेल ते घ्यावे, त्यात नवीन सुधारणा करून त्याचा आपल्या राष्ट्रोद्धाराच्या कामी उपयोग करावा, हा खरा लोकसंग्रहात्मक गुरूमंत्र इस्लामांनी पाळला म्हणूनच त्यांचा भाग्योदय झाला. `आधी प्रपंच करावा नेटका मग पहावे परमार्थविवेका’ या धोरणी तत्त्वाची अंमलबजावणी मुसलमानांनीच केली. `मराठा तितुका मेळवावा, आपला महाराष्ट्र-धर्म वाढवावा’ ही समर्थांची शिकवण मराठ्यांनी दासबोधांतच गुंडाळून ठेवली. मुसलमानांनी मात्र `सापडेल त्यास मुसलमान करावा, आपला इस्लामधर्म वाढवावा. ’ ही महंमदाची आज्ञा अक्षरशः अंमलात आणली. खरा लोकसंग्रह इस्लामानेंच केला. आम्ही हिंदू मात्र लोकसंग्रहाच्या, एकराष्ट्रीयत्वाच्या, वेदाभिमानाच्या आणि भगवद्गीतेच्या कोरड्या गप्पाच अजून मारीत आहोत. वास्तविक पाहिले तर मुसलमानांनी या जगतीतलावर जो पराक्रम गाजविला तो क्रिस्त्यांनाही साधला नाही. राष्ट्रबंधनास धर्माची आवश्यकता किती आहे, देश काल वर्तमानाप्रमाणे वर्तन करण्यास धर्माने प्रत्येक व्यक्तीस किती व कसे पूर्ण स्वतंत्र्य देण्याइतकी तत्त्वांची उदारमनस्कता ठेवली पाहिजे आणि बदलणा-या कालाप्रमाणे बदलण्याची चिवट प्रवृत्ति लोकांत प्रसुत करून त्यांना आपला राष्ट्रप्रंपच प्रथम नीटनेटका थाटण्याची संधि का दिली पाहिजे, हे इस्लाम धर्मावरून शिकण्यासारखे आहे. भिन्न जातींच्या, भिन्न संस्कृतींच्या, भिन्न परंपरेच्या, भिन्न-भिन्न मनोवृत्तींच्या सर्वराष्ट्रीय लोकांना इस्लाम धर्माने एकत्र करून त्यांच्याकडून `न भूतो न भविष्यति’ असा पराक्रम कसा गाजविला, यांचे रहस्य आत्मोद्धारासाठी धडपडणा-या प्रत्येक राष्ट्राला आदर्शभूत असेच