हिंदू धर्माचे दिव्य: Page 6 of 30

जर खरोखर तुमच्या धमन्यांतून अजिबात नष्ट झाले नसेल, तर हिंदुधर्माच्या नरड्याला लागलेल्या कुकल्पनांच्या आणि संकुचित वृत्तीच्या ताती तडातड तोडून त्याला प्रथम मुक्त करा. त्याचे पूर्वीचे स्वातंत्र्य त्याला द्या. म्हणजे मग हिंदुधर्माचे साम्राज्य सा-या जगावर पुनश्च कसे भरारते ते पाहा. अनेक प्राणघातक दिव्यांतून आज हिंदुधर्म पार पडलेला आहे. हिंदुधर्माचे टोलेजंग बुरूज आज जरी प्रतिस्पर्ध्यांच्या तोफांच्या मा-याने जमीनदोस्त झालेले असले, तरी त्याचा सनातन पाया आजलाहि अभंग राहिलेला आहे, ही गोष्ट विसरू नका. याच पायावर सनातन हिंदुधर्माची पुनर्घटना करून त्याचे वैभव वृद्धिंगत करण्याचा यत्न आपण केला पाहिजे. ज्या हिंदुधर्माने अगदी सढळ हाताने सा-या जगाला आग्रह करकरून उत्तमोत्तम तत्त्वज्ञानाच्या मेजवान्यांवर मेजवान्या दिल्या, त्यालाच आज सात्विक पोषणाची मोताद पडावी, त्याला कन्झम्पशन् आणि हार्टडिसीझ लागावा, त्याने एकदा कायमचा राम म्हणावा म्हणून आगाऊच तिरडी मडक्याची व्यवस्था करून त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी वाट पाहावी, ही काळीज चरचर चिरणारी स्थिति अंतःपर कधीहि सहन न होणारी अशी नव्हे काय? याला उपाय काय? हिंदु म्हणविणा-या प्रत्येक लहान थोर व्यक्तीने या कमी कशी मेहनत घेतली पाहिजे? याची पद्धती ऐतिहासिक पुराव्यांनीच शोधून काढली पाहिजे. हिंदुधर्माचा –हास का झाला आणि तो कसा सुधारता येईल याची खरीखुरी विश्वसनीय माहिती इतिहास सांगेल. वर्तमानकाळाच्या ब-या वाईट परिस्थितीचे धागेदोरे भूतकाळात सापडतात आणि त्यांच्याच अनुरोधाने भावी काळ स्वर्गतुल्य किंवा नरकप्राय करण्याची कर्तबगारी आपल्या मनगटांत साठविलेली आहे. हिंदुधर्माला क्लैब्य का आले आणि हिंदुंच्या जगतविख्यात संस्कृतीला इतर संस्कृतीच्या पुढे मान का वाकवावी लागली. याचे उत्तर भूतकाळचा इतिहास स्पष्ट स्पष्ट देईल. हिंदुधर्मावर आजपर्यंत जी जी गंडातरे आली आणि ज्यांच्या दिव्यांतून त्याला `येन केन प्रकारेण’ निसटून जेमतेम जीव बचवावा लागला, त्यात इस्लाम धर्माची मोहीम ही मुख्य होईल. अर्थात् या मोहिमेच्या दिव्यांतून पार पडताना हिंदुधर्मप्रचारकांची आणि खुद्द हिंदुधर्माची स्थिति कशी होती, याचा ऐतिहासिक दृष्ट्या आपण नीट छेडा लावल्याशिवाय हिंदुधर्माच्या भावी पराक्रमाचा नकाशा रेखाटता येणार नाही. अर्थात ऐतिहासिक संशोधनासाठी अवश्य लागणारी निःस्पृहता आणि निर्भेळ सत्यनिर्णयार्थ लागणारी मनोवृत्तीची समता आणि निःपक्षपणा या गोष्टींचा बिनमुर्वत ब्रेक आमच्या विचारसरणीस लावून आम्ही आता अधिक पाल्हाळ न लावता पुणश्लोक महंमद पैगंबर आणि त्याने स्थापन केलेला इस्लाम धर्म यांच्या इतिहासाचे त्रोटक परंतु सूक्ष्म विवेचन करण्याकडे वळतो. साधारणतः पाहिले तर सुमारे ९०० वर्षांपूर्वी सिंधुनदीच्या अलीकडे एकही मुसलमान नव्हता. खरे मुसलमान म्हटले म्हणजे अरब. ते हिंदुस्थानात फारसे आलेच नाहीत. हिंदुस्थानात सध्या मुसलमान म्हणविणारे लोक अजमासे पांच कोटी आहेत. इराण व तुर्कस्थान या इस्लामी राष्ट्रांतील मुसलमानांची लोकसंख्या फक्त अडीच कोटी आहे. म्हणजे सम्राट पंचम जॉर्ज बादशहा यांच्या हिंदी साम्राज्यांत इस्लामी साम्राज्यापेक्षा मुसलमानांची वस्ती दुप्पट आहे. ही गोष्ट विशेष लक्षांत ठेवण्यासारखी आहे. हे असे का? हिंदुस्थानातच मुसलमानांची इतकी जास्त वस्ती का? खरे पाहिले तर प्रथम इकडे फार मुसलमान आलेच नाहीत; बरे जे काही आले त्यांनी बरोबर बायकाहि आणल्या नव्हत्या. परंतु राज्यलोभाने आणि धर्मप्रसाराच्या महत्त्वाकांक्षेने त्यांनी हिंदुस्थानात आपला संसार थाटताच हिंदु स्त्रियांशी लग्ने लावली आणि त्यांच्या वंशाचा येथे वेलविस्तार वाढला. शिवाय इस्लाम धर्माचा चांदतारा तलवारीच्या जोरावर हिंदुस्थान आक्रमण करू लागताच, बळजबरीने किंवा आपखुषीने बाटून मुसलमान झालेल्या लाखों हिंदूंची त्यातच भर पडली आणि अशा रीतीने हिंदूंच्या हिंदुस्थानात मुसलमानांची लोकसंख्या भराभर वाढत गेली. यावरून हे अगदी स्पष्ट होत आहे की, आजचे हिंदुस्थानातील मुसलमान म्हणविणारे आमचे देशबांधव हे पूर्वाश्रमीचे आमचे हिंदुबांधव होत. साष्टी प्रांतातल्या क्रिस्ती बांधवांप्रमाणेच हे आमचे सारे हिंदी मुसलमान पूर्वीचे अस्सल हिंदूच असल्यामुळे हिंदुस्थान आपला मायदेश आहे, हा अभिमान बाळगिण्याचा त्यांना हिंदूइतकाच अधिकार आहे, हे अधिक विशद करून सांगणे नको. इस्लाम धर्माचा मुख्य उत्पादक महंमद पैगंबर याचा अवतार, त्याची धोरणी कर्तबगारी