हिंदू धर्माचे दिव्य: Page 5 of 30

मात्र या संस्थेच्या भावी कार्यव्याप्तृत्वाचा आडाखा आगाऊच आजमावून ठेवून, त्याप्रमाणे डिफेन्सिवची तयारी आतापासूनच मोठ्या काळजीने चालविली आहे. हिंदु मिशनरी सोसायटी हा काळाच्या उदरांतून बाहेर पडलेला एक अद्भुत चमत्कार आहे. नवचैतन्याची ही एक धगधगीत ठिणगी आहे. हिंदुधर्माचा कासावीस झालेला प्राण वाचवून त्याचे पुनरूज्जीवन करणारी अमृतसंजीवनी आहे. हिचा प्रताप आज कळणार नाही. शिवाजी महाराजांच्या प्राथमिक प्रयत्नपरंपरेला नाक डोळे मुरडून त्यांचा धिक्कार करणा-या बड्याबड्या मराठे सरदारांप्रमाणे आज आमचे नामधारी आचार्य व शास्त्रीपुरोहित या अल्पवयी कोमल बालिकेकडे पाहुन खुशाल हांसोत किंवा तिची मनमुराद निंदा करोत, सरतेशेवटी शिवप्रभावापुढे जसे त्याच्या गर्विष्ठ प्रतिस्पर्ध्यांनी बिनशर्त माना वाकविल्या, त्याचप्रमाणे या हिंदु मिशनरी सोसायटीला हेच आचार्य आणि हेच शास्त्री पंडित चिरायु भव असा आशीर्वाद सद्गदीत अंतःकरणाने दिल्याशिवाय खास राहणार नाहीत. हिंदु मिशनरी सोसायटी ज्या कालोदरांतून यदृच्छेने बाहेर पडली, त्याच काळाच्या उदरांत तिचा भावी पराक्रम साठविलेला आहे. या सोसायटीचा पराक्रम वर्तमान काळाच्या इतिहासात सापडायचा नाही. तो भविष्य काळाच्या इतिहासांत रेडियमच्या अक्षरांनी लिहून ठेवलेला आहे. शेकडों मैल लांबवर पसरणा-या आपल्या विशाल भुजगणांनी रत्नाकरास भेटण्यासाठी फोफावर जाणा-या प्रचंड सिंधु गंगा महानदांच्या उगमाजवळील सूक्ष्म झिरपणा-या झ-याप्रमाणे सध्या या उदयोन्मुख संस्थेची स्थिति आहे. संस्थेचे सांप्रतचे स्वरूप व अवसान तिच्या कार्याच्या आणि ध्येयाच्या मानाने कितीहि अल्पतम भासले किंवा खरोखरीच असले तरी तिने जे आपल्या ध्येयाचे निशाण उंच फडकविलें आहे. त्या तिच्या उदात्त हेतूंनीच तिच्या स्मारकाचा पाय कायमचा बसविला आहे, ही गोष्ट नाकबूल करून चालायचे नाही. हिंदु मिशनरी सोसायटीच्या कर्तबगारीचा प्रश्न तिच्यातल्या कार्यकर्त्या मंडळीवरून न सोडवितां, तिच्या ध्येयांच्या उच्चतम भरारीवरूनच सोडविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास, या संस्थेचा भरतखंडाच्या कार्यभूमिकेवर जो अवचित अवतार झाला आहे, त्यांत हिंदुधर्माच्या भवितव्यतेची बरीचशी कठीण कठीण गणिते अगदी सुलभ व सोप्या रीतीने सोडविण्याची गुरुकिल्ली खास सापडेल. आजला हिंदुधर्म कोणत्या स्थितीत आहे? क्रिस्ती धर्माचा उदय होण्यापूर्वी किमानपक्ष चार हजार वर्षांवर ऋग्वेदादि चतुर्वेद आणि सांप्रतच्या मनूंतहि मोठमोठ्या पट्टीच्या तत्त्ववेत्त्यांच्या अकला गुंग करणारी आमची ती दिव्य उपनिषदे निर्माण करणारा आमचा हिंदुधर्म जिवंत आहे काय? मेल्या माणसाला जिवंत आणि नपुंसकाला मर्द बनविणारा भगवद्गीतेचा कोहिनूर ज्याच्या मस्तकावर अविच्छिन्न सनातन वैभवतेजाचा अभिषेक अजूनहि करीत आहे, त्या आमच्या हिंदुधर्माला जगात काही मान आहे काय? `मी हिंदु आहे’ असे मोठ्या हर्षाने आणि अभिमानाने सांगण्यात वाटणारी एकप्रकारची धन्यता तरी आज हिंदु म्हणविणा-यात राहिली आहे काय? सा-या जगतीतलावर सांप्रत रूढ असलेल्या अनेक धर्मांत प्रमाणभूत असलेला `एकमेवाद्वितीयम्’चा दिव्य मंत्र अत्यंत प्राचीन काळी ज्या उदार हिंदुधर्माने त्यांना घ्या घ्या म्हणून आग्रह करून शिकविला; अध्यात्म विद्येच्या गूढ तत्त्वांच्या सोपपत्तिक उलगड्यांचे भांडार उघडे ठेवून जगातील सर्व मानवजातीला ज्याने सर्वात्मैक्य भावाचा पहिला `श्रीगणेशा’ शिकविला; आणि ज्याच्या मुक्त ज्ञानभांडारातील रत्ने सर्व भूगोलावर उधळली असतां, त्यांतल्या एकेका रत्नाच्या भांडवलावरच एकेक नवीन धर्म ठिकठिकाणी निर्माण झाला, त्या हिंदुधर्माची आजच्य मन्वंतरांत काही मान्यता आहे काय? याचे उत्तर हेच की नाही, नाही मुळीच नाही! हरहर! आज हिंदुस्थानात कोट्यवधि हिंदु असून, त्यांना हे शब्द बोलवतात आणि लिहवतात तरी कसे? हिंदुधर्माला आज वाटेल त्या झोटिंगाने वाटेल तशा शिव्या द्याव्या, त्याची वाटेल तशी व्याख्या करून त्याची नालस्ती करावी, आणि त्यातील उदात्त तत्त्वांना वाटेल तसा बाष्कळ पेहराव चढवून त्यांची भर चव्हाट्यावर हेळणा करावी, ही परिस्थिती निमूटपणे सहन करणारे हिंदु प्राचीन आर्यांचे वंशजच असावे काय? ज्या हिंदुधर्माच्या सर्वव्यापी उदरांतूनच जगातील प्राचीन अर्वाचीन राष्ट्रांना निरनिराळ्या धर्ममतांचा पुरवठा झाला, त्याच्याच अवशिष्ट अनुयायांना आज हिंदुधर्म मरो, ख्रिस्ती धर्म तरो ही कृतघ्न शापवाणी ऐकत स्वस्थ बसण्याची पाळी यावी का? हिंदु बांधवहो, प्रसंग येऊ नये, आला. आता तरी डोळे नीट उघडा. आणि प्राचीन आर्यांचे रक्त