हिंदू धर्माचे दिव्य: Page 4 of 30

झाली आहे. नवजीवनाच्या बॉयलरमध्ये प्राचीन संस्कृतीच्या धगधगीत आचेने कढून कढून तयार झालेली अभिमव महत्त्वाकांक्षेची वाफ, पूर्वीचे स्वार्थी व संकुचित मनोवृत्तीचे आत्मघातकी साखळदंड खडाखड तोडून, त्रिकोणी हिंदी द्वीपकल्पाच्याच नव्हे, तर अखिल मानवजातीच्या सुखवर्धनार्थ आज चैतन्याच्या इंजिनात प्रविष्ट झाली आहे. प्रांतिक ऐक्याच्या कल्पनांचा भोवरा वाढत वाढत आज सा-या भरतखंडाला वेढू पाहत आहे आणि या चैतन्याचे इंजिन मुत्सद्देगिरीच्या धोरणी रूळांवरून असेच पुढेपुढे दामटीत नेल्यास, ही भारतीय ऐक्याची विद्युल्लता सर्व भूगोलालाही आपल्या बाहुपाशात घट्ट कवळून विश्वात्मक भावाचा आर्य प्रसाद सा-या जगाच्या तोंडात कोंबून, आमच्या हिंदुस्थानातील प्राचीनतम आर्यसंस्कृतीच्या सनातन मुरंब्याची लज्जत त्याला लावल्याशिवाय खास राहणार नाही. नवजीवनाची शक्ती फार अचाट. हिमनगासारखे गगनचुंबीत पर्वताधिपति तिच्या प्रवाहाला प्रतिरोध करू शकणार नाहीत.

अटलांटिक पॅसिफिकसारखे महोदधि नवजीवनाच्या चैतन्याला भिजवू शकणार नाहीत. तुफानी वावटळाचे वारे या दिव्य चैतन्याचा शेंडा बुडखासुद्धा कंपित करू शकणार नाहीत. त्रैलोक्याचाहि निमिषार्धात चक्काचूर करणा-या आकाशगामी मेघकन्या आपल्या ज्वलज्जहाल नेत्र या चैतन्याकडे फिरवू शकणार नाहीत. हे नवजीवनाचे चैतन्य म्हणजे परमेश्वरी अगम्य लीलेचा अवतार आहे. हे चैतन्य परमेश्वरी शक्तीने रसरसलेले आहे. नराचे नारायण याच हंगामात उदयास येणार. याच पर्वणीत मुक्याला वाचा फुटून पांगळेहि पर्वतांना ठेंगणे करणार. पूर्व पश्चिमेकडे तोंड फिरवून बसलेल्या लक्ष्मी सरस्वती या सवती सवती एकमेकींच्या हातांत हात घालायला या अमृतसिद्धी योगाची संधि पकडणार. कवींच्या प्रेमळ काव्य-ललकारीच्या आव्हानाला मान देऊन, हिंदुस्थानची व हिंदुधर्माची रात्रंदिवस काळजी वाहणारे अगम्यस्थलनिवासी संत याच वेळी उघडपणे प्रगट होऊन, आपल्या लाडक्या देशाचा व सनातन धर्माचा शीणभाग उतरण्याची खटपट करतील. या महात्म्या संतांच्या नि:सीम निष्काम कर्मयोगाच्या तपश्चर्येवरच आम्हा दीन दुबळ्या मानवांचा सामाजिक आणि राष्ट्रीय संसार चालावयचा असतो. आमच्या ऐहिक व पारलौकिक उन्नतीच्या नौकेचे सुकाणू जरी आमच्या हाती असले, तरी ती नौका अज्ञानपंकांत रूतूं न देण्यासाठी हे दिव्य महात्मे आपल्या तपश्चर्येची सर्व फळें आम्हा मानवांच्या कल्याणासाठी आज युगानुयुगे समर्पण करीत आले आहेत, असा आम्हां वेदानुयायी हिन्दुंचा विश्वास आहे. आज भरतखंडात जी जागृति झाली आहे; आत्मोद्धाराचा आणि आत्मोद्धाराबरोबरच जगदुद्धाराचा जो प्रश्न आज रात्रंदिवस हिंदी जनतेच्या अंतःकरण-कपाटावर सारखे धक्के देत आहे; आमची वाट चुकली आहे, आम्ही आत्मस्वरूपाला पारखे झालो आहोत, दिसते हे स्वरूप, भासते ही संस्कृति आणि करतो हे कर्म आमच्य पूर्वपरंपरेला अनुसरून नाही, अशी जी जागृति आज सा-या भरतखंडात उत्पन्न झाली आहे, तिच्या पाठीशी या संतांचीच इच्छाशक्ति आहे, हे विसरता कामा नये. अर्थात सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीच्या जोडीनेच हिंदु धर्म आणि सुधारणा हा प्रश्न तितक्याच नेटाने आमच्या विचारक्षेत्रांत संचार करू लागावा, यात आश्चर्य ते कसले? सध्या विचार सुरू झाले आहेत आणि आचारालाहि थोडा प्रारंभ झाला आहे. निरनिराळे विद्वान धर्मसुधारणा कशी करावी किंवा करतां येणे शक्य आहे, याबद्दलचे आपापले प्रामाणिक विचार बोलून दाखवूं लागले आहेत. हिंदु धर्माचे प्राचीन व्यापक व उदात्त रूप पार बदलून जाऊन त्याला सांप्रतचे अति संकुचित, क्षुद्र आणि हीनदीन स्वरूप कां प्राप्त झाले, याची प्रमेये सोडविण्यात कोणी गुंग झाले आहेत. हिंदु धर्माने आपली प्रचलित प्रतिगामी वृत्ति साफ झुगारून देऊन, चालू मन्वंतराच्या ओघाशी केवळ अनुगामीच नव्हे, पण समगामी कसे बनावे याचाहि मंत्र सांगत आज कित्येक महात्मे आपल्या कानाशी लागत आहेत. हिंदु मिशनरी सोसायटी सारखी संस्था अत्यंत व्यापक धोरणावर धर्माचे शुद्ध स्वरूप जनतेपुढे मांडून `देवा जगी वाढवि हिंदु धर्म’ अशी उच्च महत्त्वाकांक्षेची तुतारी फुंकीत पुढे सरसावली आहे. या संस्थेचा प्रारंभ नदीच्या उगमाप्रमाणे अगदी लहान आणि क्षुल्लक दिसत असला, तर तिचे बीज फार सकस आहे; इतकेच नव्हे तर जे हिंदुधर्माचे धोरणी प्रतिस्पर्धी आहेत. ज्यांच्या डावपेचावर या संस्थेने उघड उघड स्वारी करण्याचे आपले धोरण न डगमगता जाहीर केले आहे, त्यांनी