हिंदू धर्माचे दिव्य: Page 30 of 30

तर त्याला आता मिशनरी बनल्याशिवाय तरणोपायच नाही आज हिंदुंच्या उपनिषदांचा सर्व जगभर प्रसार झाला आहे. तुमची भगवद्गीता आज फ्रेंच, जर्मन, इटालीयन, रशियन वगैरे सर्व भाषांत भाषांतर होऊन, भगवान श्रीकृष्णाच्या अध्यात्म-मुरलीच्या हृदयवेधी मंजुळ ध्वनीने जगातील सर्व राष्ट्रांतल्या प्राचीन आर्यांच्या अर्वाचीन वंशजांना मनाने हिंदु बनवीत आहे. अशा प्रसंगी कोणी नको म्हटले तरी हिंदुधर्म हा जगाचा धर्म झाल्याशिवाय राहात नाही. संकराची फुसकी भीती संकरोत्पन्न खुशाल घालोत. भ्रष्टाचाराची काळजी भ्रष्ट खुशाल वाहोत. आत्महत्येच्या धमक्या देणारे शंकराचार्य खुशाल एखाद्या नदीनाल्यात जलसमाधी घेवोत. सवंग लोकप्रियतेसाठी धडपडणारे पत्रकार खुशाल या बोटावरली थुंकी त्या बोटावर नाचवीत बसोत. हिंदुधर्म सा-या जगाचा धर्म होणार, ही नवविचाराची ठिणगी आपला पराक्रम गाजविल्याशिवाय राहणार नाही. नव्या मन्वंतराचा हा संदेश कालेकरून पृथ्वीच्या दक्षिणोत्तर ध्रुवांतून सर्वत्र दणदणाट करील. आज हिंदुधर्म आपल्या तारणासाठी सर्व हिंदुंची मोठ्या काकुळतीनें करुणा भाकीत आहे. त्याच्या नवीन मिशनरी अवतारांत त्याला अनेक विरोधास तोंड द्यावे लागेल, याची सर्व हिंदुधर्माभिमान्यांनी जाणीव ठेवावी. अनेक दिव्यांतून पार पडत पडत आज हिंदुधर्म नवीन धोरणावर जगण्याचा यत्न करीत आहे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी, हिंदुदेशबांधवांनो, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत इतकी कळकळीची विनंति करून आणि विवेचनाच्या भरात उणाअधिक शब्द गेला असल्यास त्याबद्दल सर्व प्रकारच्या सर्व धर्मांच्या वाचकांची अत्यंत नम्रतापूर्वक क्षमा मागून, आम्ही आता दिवाळीच्या मंगलस्नानाच्या व्यवस्थेला लागतो. ईश्वर करो आणि हिंदुधर्मांचे साम्राज्य सा-या जगभर पसरून हिंदू दिवाळीचा दीपोत्सव एकसमयावच्छेदे करून सर्व राष्ट्रांत साजरा होण्याचा मंगल दिवस लवकर येवो ! !