हिंदू धर्माचे दिव्य: Page 14 of 30

तत्त्वाज्ञानाच्या गांभिर्याची आणि ऐश्वर्याची सर कोणत्याही धर्माला येत नाही. शिवाय त्यांतील नीतिशास्त्राची सात्विक शुद्धता आणि निरनिराळ्या संस्कारपूर्ण क्रियाकर्मादि विधींचा सोईस्करपणा आणि लवचिकपणा यांत तर तो दुस-या कोणत्याही धर्माला हार जाणार नाही. हा धर्म नदीच्या पात्राप्रमाणे आहे. कित्येक ठिकाणी इतका उथळपणा आढळतो की, लहान लहान मुलांनी सुद्धां त्यांत खुशाल डुंबत राहावे आणि त्यातील कित्येक ठिकाणे इतकी खोल आणि अगम्य आहेत की मोठ्य़ा मोठ्या पट्टीच्या पाणबुड्यांनाही त्याचा अंत लागणार नाही. मानवी प्राण्यांच्या मुमुक्ष वृत्तीच्या निरनिराळ्या भावनांना रूचेल आणि पचेल अशांच त्याची सोईस्कर ठेवण आहे. बरे या वैदिक धर्माची पूर्णावस्थाहि इतक्या उच्च संस्कृतीला जाऊन भिडली आहे की, त्याला इतर कोणत्याहि धर्मातून काहीहि मिळवण्यासाठी आवश्यकताच उरलेली नाही; तसा त्याने कधी यत्नहि केला नाही आणि हिंदु धर्माच्या सर्वांग सौंदर्यात आम्ही आणखी काही भर घालू; अशी कोती घमेंड इतर कोणत्याही धर्माला न शोभणारहि आहे. जसे या धर्माचे परिशीलन करावे तसतसा मनुष्याच्या बुद्धीवर अधिकाधिक प्रकाश पडत जातो आणि त्यातील तत्वार्थबोधाने अंतःकरण गारीगार होऊन जाते या वैदिक सनातन धर्माचे प्रत्येक तरुणाने नीट अध्ययन करावे. सुखाच्या समृद्धीचा हाच एक खरा राज मार्ग आहे. आणि आपत्प्रसंगी आत्मबळ वृद्धिंगत करून आमरण आपले संरक्षण करणारा हाच एक धर्म होय, हे त्यांच्या निदर्शनास आल्यावाचून खास राहणार नाही.’’ ज्या हिंदुधर्माने अर्वाचीन अनेक उप-या प्रतिबंधनाच्या शृंखला तडातड तोडून, हजारो मैलांवर, पृथ्वीच्या दुस-या गोलार्धावर राहणा-या मॅडम ब्लॉवट्स्की, कर्नल ऑल्कॉट, मिसेस अॅनी बेझंट, लेडबीटर इत्यादि शेकडो पाश्चात्यांच्याहि अंतःकरणाला आपल्या सात्विक मोहिनीच्या शरसंधानाने अचूक विद्ध करून या पुण्यवान भरतभूमीच्या दर्शनाकरिता खेचून आणले; ज्या हिंदुधर्माच्या वेदोपनिषदांच्या अखंड पारायणांनी मॅक्स मुल्लरसारख्या क्रिस्तानुयायाला अखेर अखेर पूर्ण संन्यासी बनविले आणि ज्या हिंदुधर्माची सनातन तत्त्वे महाभाग स्वामी विवेकानंदाच्या ओजस्वी वाग्गंगेतून भराभर कोसळू लागताच क्रिस्ती अमेरिकनांनी ती झटपट आपल्या कानांच्या ओंजळीने गोळा करून स्वानंद साम्राज्याच्या सुखानुभवाने ते तर्र झाले – नव्हे, उपनयन (Initaiation) विधिचीहि पर्वा न करतां ते अंतर्बाह्य हिंदु बनले; हिंदुधर्माची महती अधिक वर्णन करणे म्हणजे पाश्चात्यांच्या लाडक्या शेक्सपियरच्या TO PAINT THE LILY IN GOLD या वाक्याची कोणाला आठवण होणार नाही? हिंदुधर्म अत्यंत प्राचीन काळापासून ज्या ब्रह्मज्ञानप्राप्तीच्या अनेक मार्गाचा डंका गाजवीत आहे, ते ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी की वाटेल त्या टारगटाने चार चटोर पोरी चव्हाट्यावर आणवून त्यांच्याकडून सा-या जगाला मोक्ष देण्याची बाष्कळ बडबड करावी! अहो, नुसती एखादी नोकरी मागायला जातानासुद्धा एखाद्या अधिका-यापुढे किती विनयाने आणि दक्षतेने जावे लागते, तर मग अत्यंत प्राचीन असा जो जगातील सर्व धर्मांचा राजा, सर्व धर्मांचे मूळ, सर्व धर्मांचे माहेरघर जो सनातन वैदिक हिंदुधर्म त्याच्या राजवाड्यात जाऊन ब्रह्मज्ञानाच्या स्वराज्याची सनद मागतांना तुम्ही किती तीव्र मुमुक्षु वृत्तीने गेले पाहिजे बरे? हिंदुधर्म हा अगणित धर्मरत्नांनी खच्चून भरलेली खाण आहे आणि जगांतील प्रचलित सर्व धर्म हे याच खाणीतले तेजस्वी हिरे आहेत. बादशहाच्या किरीटावर जाऊन बसला म्हणून सा-या जगांत मीच काय तो एक तेजस्वी हिरा, मीच सा-या जगाला प्रकाशित करतो, माझ्या तेजाची सर कोणालाहि येणार नाही, अशी जर बाष्कळ वल्गना कोहिनूर हिरा करू लागला, तर त्याला आम्ही एवढेच सांगू, की बाबा कोहिनूर बांधवा, स्थानमहात्म्याने असा एकदम हुरळून जाऊ नकोस. ज्या गोवळकोंड्याच्या खाणीतून तुझा जन्म झाला, त्याच समृद्ध आणि श्रीमंत मातेच्या उदरात तुझ्यासारखे अनंत कोहिनूर निर्माण करण्याची धमक आहे. तिने आजपर्यंत तुझ्यासारखे अनेक कोहिनूर या जगावर पशाशाने उपसून उधळलेले आहेत. आणि अजूनही लागतील तितके, वाटेल त्य आकाराचे, वाटेल त्या घडणीचे आणि वाटेल त्या वजनाचे सवाई कोहिनूर निर्माण करण्यास तुझी गोवळकोंड्याची आई समर्थ आहे बरं ! ! हिंदुंच्या दिव्य धार्मिक ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करून करून अंतर्यामी पूर्ण