हिंदू धर्माचे दिव्य: Page 12 of 30

असतांना, मूर्ख महाराष्ट्रीयांनो कशाची करता स्वराज्याची अपेक्षा? तो एकटा शिवबा कोठकोठे पाहणार आणि करणार तरी काय काय? रायांनी करावे राजधर्म । क्षत्री करावे क्षात्रधर्म ।। ब्राह्मणी करावे स्वधर्म । नानाप्रकारें।। त्याची शिकस्त तो करीतच आहे. पण तुम्ही तरी आपापली कर्तव्ये कराल की नाही? राज्य नेलें म्लेंच्छक्षेत्री । गुरूत्व नेलें कुपात्री ।। आपण अरत्री ना परत्रीं । कांहीच नाही ।। रामराम!! अरे ही दुःस्थिती, हा तुमच्या धर्माचा –हास, प्रत्यक्ष तुमच्या राष्ट्रीय संघशक्तीचा –हास, तुमच्या सामाजिक सामर्थ्याला लागलेला वणवा तुम्हाला पहावतो तरी कसा? हे प्रतापगडचे श्रीभवानी आंबिके, धर्मांतर करून भडाभड लाखो हिंदु परधर्मात जात आहेत, तरी या मूढ हिंदुधर्मीयांचे डोळे उघडत नाहीत. आता तू तरी या रामदासाच्या आंतड्याला पडणारे पीठ पहा आणि देवांची राहिलीं सत्त्वें । तूं सत्त्व पाहसी किती ।। भक्तांसी वाढवीं वेगी । इच्छा पूर्णचि ते करी ।। महाराष्ट्रीयांनो, तुम्हांला जर खरोखर आत्मोद्धाराची काही चाड असेल, ``राजकारण जरी उदंड तटलें’’ असले तरी बाबांनो ``सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हांप्रति । संभाळली पाहिजे ।।’’ म्हणून मराठा तितुका मेळवावा । आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। ये विषयी न करितां तकवा । पूर्वज हासती ।। शहाणे करावे जन । पतित करावे पावन ।। सृष्टीमध्ये भगवद्धभजन । वाढवावें ।। अहाहा! यापेक्षां अधिक स्पष्टोक्ती समर्थांनी काय करावी? त्यांच्या उद्धारावरून इस्लाम धर्माच्या धार्मिक आगापेक्षां त्यांच्या व्यावहारिक बाजूने हिंदु धर्माची केवढी नासाडी केली, याचे अंतःकरण थरथरविणारे चित्र १७ व्या शतकांतल्या समर्थांना जसें स्पष्ट स्पष्ट समजत होते, तसे २० व्या शतकांतल्या निवळ विचक्षण चिकित्सामन्यांना उमजणे शक्य नाही. शिवाय, महंमदाच्या अत्यंत धोरणीपणामुळे त्याने अल्पावकाशांतच रानटी आरबांना एका धर्मदिक्षेच्या सबबीवर केवढ्या राष्ट्रीय महतीला आणून ठेवले, हे समर्थ जाणत नव्हते असे गृहीत धरणे, म्हणजे समर्थासारख्या अक्षरशः समर्थ लोकोत्तर विभूतीला महंमदापेक्षाहि खालच्या पायरीवर बसवून आमच्या मूर्खपणाचे व कृतघ्नपणाचे प्रदर्शन करण्यासारखेच होय. `शक्तीने मिळती राज्यें। युक्तीनें यत्न होतसे। शक्तीयुक्ती जये ठायीं। तेथें श्रीमंत धांवती’ हा सिद्धांत कंठशोष करून सांगणारे १७ व्या शतकांतले रामदास किंवा १४ व्या शतकातले विजयनगर साम्राज्याचे संस्थापक श्रीविद्यारण्य माधवाचार्य यांना इस्लामधर्माच्या भरभराटीची खरी मख्खी पूर्णपणे अवगत होती. म्हणूनच त्यांनी आपापल्या अनुयायांना मोठ्या कळवळ्याने कलियुगात संघशक्ति हाच आत्मोद्धार हा दिव्य मंत्र सांगितला. पतित बांधवांना पावन करून घ्या, मराठ्यांची संख्या वाढवून त्यांची संघशक्ती वाढवा, आणि महाराष्ट्र धर्माचा – हिंदु धर्माचा सर्वत्र प्रसार करा. हे महत्कार्य साधण्यासाठी नुसत्या महाराष्ट्रांतच किंवा हिंदुस्थानातच हा धर्मप्रसार करून स्वस्थ बसू नका, तर महंतें महंत करावे । युक्ति बुद्धीनें भरावे ।। जाणते करोनि विखरावे । नाना देशीं ।। हिंदुधर्माचे साम्राज्य जगभर वाढवा, हिंदुधर्माची सनातन सर्वव्यापी तत्त्वें जगाला शिकवा, पतित असतील त्यांना पावन करून घ्या आणि ज्या हिंदुस्थानाने पूर्वी एकदां सा-या जगावर जगद्गुरुपणाची सत्ता गाजविली त्याच हिंदुस्थानाच्या हिंदुधर्माला सा-या जगाचा गुरू करा ही समर्थांची समर्थ वाणी उर्मट महाराष्ट्राने धिक्कारली, त्याची विषारी फळे तो आज आपल्या आसवांनी चिंब भिजवून हुंदके देत देत खात आहे. उलटपक्षी महंमद पैगंबराच्या इस्लाम धर्माने रानटी अरबांचे काय स्थित्यंतर केले ते पहा. या धर्माच्या अनुयायांना धार्मिक, सामाजिक, राजकीय वगैरे बाबतीत कसलाही प्रतिबंध नसल्यामुळे, प्रत्येक व्यक्तीच्या कर्तबगारीचा विकास होऊ देण्यास कोणतीही अडचण नसल्यामुळे आणि धर्मप्रसाराच्या सबबीवर अनेक परंपरेच्या आणि अनेक भिन्नभिन्न, संस्कृतींच्या सर्वराष्ट्रीय मंडळींचा एक जबरदस्त बिरादरकीचा संघ अस्तित्वांत आल्यामुळे शास्त्र तत्त्वज्ञान वाङ्मय इत्यादी बाबतीत अरब पंडितांना खलीफांच्या पदरी राहून अलौकिक कीर्ति संपादन केली. या बाबतीतला त्यांच्या अचाट उद्योगाचा इतिहास पाहिला की त्यापुढे तत्कालीन क्रिती राष्ट्रे हीनदीन व रानटी दिसतात. इ.स. ७०५ च्या सुमारास अल्जबर ऊर्फ बीजगणित अरबानीच