हिंदू धर्माचे दिव्य: Page 2 of 30

कशी झाली याचा इतिहास तर प्रबोधनकारांनी संक्षेपाने सांगितला आहेच, पण हळूहळू ही देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या लोभी, स्वार्थी वृत्तीची, संपत्तीच्या संग्रहाचीच केवळ आणि समाजपराङमुख दृष्टीची केंद्रेच कशी बनली याचाही वृत्तान्त कथन केला आहे. ज्या सात्विक संतापाने त्यांनी भिक्षुकशाहीवर कठोर कोरडे ओढले आहेत, त्यातील रोखठोक भाषा आजही वाचकांना अंतर्मुख करणारी आहे. कालदृष्टय़ा प्रबोधनकारांचे हे लेखन आता जुने झाले आहे. सत्यशोधकी चळवळीच्या काळातील हे लेखन असल्यामुळे ते फार कठोर भाषेत णि संतप्त वृत्तीने लिहिलेले आहे असे क्वचित कोणाला वाटेल पण जेव्हा साध्या मलमपट्टीपेक्षा शस्त्रक्रियेनेच एखादा रोग बरा होण्याचा संभव असतो, तेथे शस्त्रक्रिया केलीच पाहिजे, हे कोणीही सूज्ञ मनुष्य मान्य करीलच. पण या संतापामागे आणि कठोर टीकेमागे या हिंदू समाजातील दोष नाहीसे व्हावेत आणि पुन्हा त्यास गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे हीच तळमळ आहे हे नाकारता येणार नाही. म्हणून सर्व दृष्टींनी या ऐतिहासिक लेखनाचे स्वागत करणे आवश्यक आहे. पहिल्या तीन खंडांप्रमाणेच याही खंडाच्या संपादन समितीतील श्री. पंढरीनाथ सावंत (निमंत्रक), श्रीमती नीला उपाध्ये, अर्जुन डांगळे, डॉ. मा. गो. माळी, प्रा. शेषराव मोरे, दि. र. भालेराव यांनी खंडाच्या संपादन कार्यार्थ घेतलेल्या परिश्रमाबद्दल मंडळ त्यांचे आभारी आहे. मंडळाचे सचिव, श्री. चंद्रकांत वडे यांनी वेळोवेळी वैयक्तिक लक्ष घालून हा खंड लवकर प्रसिद्ध व्हावा म्हणून प्रयत्न केले. तसेच मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाने या खंडाची छपाई उत्तमरीत्या करून दिल्याबद्दल मंडळ त्यांचेही आभारी आहे.

द. मा. मिरासदार

अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

बलिप्रतिपदा दिवाळी : १९९९ ९ नोव्हेंबर १९९९

प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय खंड चौथा

हिंदुधर्माचे दिव्य आणि संस्कृतींचा संग्राम

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

हिन्दु तितुका मेळवावा । आपुला हिन्दुधर्म वाढवावा ।। सर्वत्र विजयी करावा । सनातन हिन्दुधर्म ।।

हिंदु धर्माचें दिव्य. आणि संस्कृतीचा संग्राम `Without the missionary spirit there can be no continued vitality and growth of any Religion’ - Monier Williams (आवृत्ती २री) लेखक केशव सीताराम ठाकरे संपादक, प्रबोधन. प्रकाशक, पुरुषोत्तम महादेव जुवळे नरेंद्र पुस्तकालय, दादर-मुंबई.

(किंमत फक्त एक रुपया) प्रकाशक रा. रा. पुरुषोत्तम महादेव जुवळे नरेंद्र पुस्तकालय, दादर-मुंबई मुद्रक रा. रा. लक्ष्मण भाऊराव कोकाटे यानी पुणे पेठ सदाशिव घ. नं. ३०० येथे आपल्या `हनुमान’ छापखान्यात छापले. All rights reserved by the Author

आद्य हिन्दुमिशनरी प. वा. गजानन भास्कर वैद्य यांच्या दिव्यात्म्यास अर्पण असो के. सी. ठाकरे प्रकाशकांची विज्ञप्ति श्री. ठाकरे यांचे हें बहुमोल पुस्तक जनीजनार्दनाच्या सेवेला सादर करण्याचा सुमसंग, अत्यंत दीर्घ कालानेंच कां होईना, लाभत आहे, याबद्दल आम्हांला आनंद वाटतो. वास्तविक, हें पुस्तक डिसेंबर १९२२ मध्येंच प्रसिद्ध व्हावयाचें; परंतु मुद्रणालयाच्या अपरिहार्य अडणीमुळें व लेखकांचें कार्यबाहुल्यांमुळें आम्हांला आमचें आश्वासन पुरें करतां आलें नाहीं. तथापि, जनतारूपी जनार्दन या सकारण कालावधीकडे सहानुभूतीनेंच पाहील, अशी आम्हाला उमेद आहे. त्याचप्रमाणे, सध्यांच्या धामधुमीच्या काळांत विचारजागृति करून पुढील काळाकडे समतोल पाहण्याची दृष्टि देणा-या असल्या उत्कृष्ट ग्रंथाचा तो प्रेमाने आदर करील अशीहि आम्हाला आशा आहे. श्री. ठाकरे यांची प्रकृति अलिकडे कित्येक महिने बरी नसते. शिवाय त्यांची कार्यव्याप्तीहि अधिक, अशा स्थितींतहि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हें पुस्तक अत्यंत परिश्रमपूर्वक लिहून दिलें; व त्यामुळे आम्हाला जनसेवेची संधि मिळाली. श्री. ठाकरे यांचे आम्ही याबद्दल अत्यंत ऋणी आहों. ग्रंथ आणि ग्रंथकार यांची ओळख ग्रंथ आणि ग्रंथकार यांची ओळख करून देण्याकरितां चार शब्द लिहिण्याच्या विचारानें लेखणी हातात घेतली; परन्तु ग्रंथाची ओळख करून द्यावयाची म्हणजे इतकेंच म्हणावयाचें की, हा ग्रंथ वाचकांनीं मनोभावानें वाचावा. तो मला जसा मनोवेधक वाटला तसा तो वाचकांनाही वाटेल. ग्रंथकाराची ओळख करून द्यावयाची म्हणजे ते अभयानें लिहिणारे