देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें: Page 10 of 12

असेल, त्या सर्व विवेकवादी स्पृश्या-स्पृश्य हिंदुजनांनी आपल्या कडव्या निषेधाचा पहिला घाव या देवळांवरच घातला पाहिजे.

देवळांचे महात्म्य सफाई नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारण झालेल्या व होणा-या द्वैत भावनेचा या हिंदूस्थानांतून बीमोड होणार नाही. मूर्तिपूजा बरी की वाईट, खरी का खोटी, तारक का मारक इत्यादि मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी, देवळांतल्या देवांत कांहीं तरी विशेष देवपणा असणें आणि तसा तो अकिल्मिष भासणे अगत्याचें आहे. देवाचिये द्वारी। उभा क्षणभरी।। तेणें मुक्ती चारी, साधियेल्या ।। अशा भावनेचे अभंग कवनांत कितीहि गोड वाटले, तरी ते हिंदु देवळांच्या व देवांच्या बाबतींत शब्दशः भंगतात. शिवाय `द्वारी’ `क्षणभरी उभा’ राहणारा व राहण्याची शिफारस करणारा कवि मनाने भटी महात्म्याचा गुलामच असल्यामुळे देवळांच्या आंत देवांचे काय काय रंग ढंग चालू असावे याची त्या बावळटाला काय कल्पना असणार आणि कोणी करून दिलीच तर ती त्याला काय पटणार? देवळांत गेले की मग क्षणभर तापांतून मुक्त व्हावें, शांत व्हावें, घटकाभर जगाला विसरावें आणि देवाच्या चरणावर मस्तक ठेवून परमेश्वरी सृष्टीच्या अनंतत्वात विलीन व्हावें, असा अनुभव येण्याइतकें या देवांच्या मूर्तीत काय असतें? जो माणसांचा थोट तोच देवांचा थाट. ज्या माणसांच्या चैनीच्या गोष्टी त्याच देवांच्या, माणसांच्या भावना त्याच देवांच्या भावना. माणसांना थंडी वाजते, देवांना वाजते. गावात उन्हाळा कडकला की देवाला पंखा सुरू झालाच. शंकराच्या पिंडीवर गळणीचें गाडगे लटकलेंच. माणसांचा जनानखाना, देवांचा जनानखाना. भोजनोत्तर माणसांची वामकुक्षी, देवांनाहि तीच संवय, माणसें रात्री निजतात, देव सुद्धा शेजारती होतांच पलंगी पहुडतात. मग सकाळच्या काकड आरतीपर्यंत देव जागे व्हायचे नाहींत. सारांश, माणसांच्या सर्व भल्याबु-या विचार विकारांचा आरोप या दगड्या देवांवर होत असल्यामुळें, देव आणि माणूस यांतल्या भेदाची रेष युक्लीडच्या रेषेप्रमाणें `रुंदीशिवाय लांबी’ अशा `समजून चाला’ (Take it for granted) धर्तीचीच झाली आहे. `जसा भक्त तसा देव’ हें सूत्र वाचाबोलायला छान सुटसुटीत खरें, पण त्यामुळें ईश्वरविषयक भावना, धर्मविषयक आदर आणि नीतिविषयक चाड यांत माणसांची मनोवृत्ति खिळखिळी होऊन बसली आहे, याकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. अशाहि खिळखिळ्या भावनांच्या अवस्थेंत, देव म्हणजे हिंदुजनांचें देव आणि देवळें म्हणजे हिंदुजनांचीं देवळें. त्यांत नहिंदुंचा संबंध नाही हा सिद्धांत गृहीत धरला, `हिंदु’ म्हणविणा-या प्रत्येक स्त्रीं पुरुषाला, मग ती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असो. महार, मांग, धेड, अस्पृश्य असो नाहीतर शुद्धीच्या मार्गानें परावर्तित झालेली असो. त्या प्रत्येकाला हिंदु देवळांत जाऊन तेथल्या हिंदु देवांची यथाभाव यथासाहित्य स्वतः पूजा करण्याचा, निदान त्या मूर्तीच्या चरणांवर मस्तक टेकण्याचा धर्मसिद्ध अधिकार असलाच पाहिजे. हा अधिकार जेथेंजेथें नसेल, लौकिकी व्यवहारांतले जातिभेद, मतभेद, आचार-विचारभेद जर देवळांतहि धुडगूस घालीत असतील, आणि `अनाथाचा नाथ होसी तूं दयाळा’ अशा देवापुढेंहि जर आमचा माणूसघाणेपणाचा उकिरडा सदैव पसरलेला रहात असेल तर कोणाच्याहि मनोभावनांची पर्वा न करतां, कडवे सुधारक (radical reformer) या नात्यानें लोकशाहीची शपथ घेऊन, आम्ही स्पष्ट म्हणतों कीं, ही देवळें नसून सैतानखाने आहेत. हिंदूसंघातल्या माणसामाणसांतच असली दुस्मानी सुलतानी गाजविणा-या देवळांच्या पुरस्कर्त्याच्या शुद्धिसंघटणाच्या वल्गना किती दांभिकपणाच्या आणि लुच्चेगिरीच्या आहेत याचा वाचकांनीच विचार करावा.

सध्या लोकशाहीचें वारें वाहात आहे. व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची आज कोणाचीहि प्राज्ञा नाही. अशा वेळी हिंदु देवळांतही लोकशाहीची वावटळ घुसणें अगत्याचें आहे. राजकीय स्वातंत्र्याच्या वग्लना करणारांनीं इतर सर्व क्षेत्रांतल्या गुलामगिरीची आणि गुलामगिरीप्रवर्तक सर्व संस्थांची राखरांगोळी केली पाहिजे. हिंदुसमाजांत माणुसघाण पसरविणा-या देवळांची विल्हेवाट लावण्याचे तीन मार्ग आम्ही हिंदुजनांना सुचवीत आहों. पहिला मार्ग बहिष्काराचा. हा लिबरली बिरबलगिरीचा `मवाळी’ मार्ग आहे. हिंदूच्या देवळांत भटांशिवाय हिंदूच्या प्रवेशाच्या व पूजनाचा धर्मदत्त अधिकार जर लाथाडला जात असेल, तर ती देवळें `हिंदूंची’ नव्हेत, ती सैतानाचीं स्मशानमंदिरे समजून त्यावर बहिष्कार टाकावा. त्यांन आजपर्यंत फाजील दानधर्मावर जगविल्याच्या