देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें: Page 9 of 12

तरी देवळांतल्या दगडधोंड्यांना शिरा, केशरीभातचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच आहे. हजारो उमेदवार ग्रॉज्युएट तरुण उदरभरणासाठीं भया भया करीत फिरत असले, तरी अब्जावधि रुपयांचें जडजवाहीर व दागदागिन्यांनी देवळातल्या दगड धोंड्यांचा श्रृंगारथाट बिनतक्रार दररोज चालूच आहे. देशांतला शेतकरी कळण्याकोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला, तरी देवळांतल्या भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिला एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही. विद्येची चार अक्षरें शिकवा हो शिकवा, म्हणून शेकडा ९६ जिवांचा सारखा कंठशोष चालू असताही, देवळांच्या घुमटाखाली लाखो महामूर्ख भट गोसावडे, गंजड आणि टगे गंधभस्म रुद्राक्षांच्या पुण्याईवर पोट फुटून वांती होईपर्यंत परार्धावरी पल्ले धान्याचा बिनबोभाट फडशा पाडीत असतात. देवळांच्या छपराखाली ब्रह्मचा-यांचे वंश किती वाढतात, पति नसतानाहि किती पतिव्रता पुत्रवति होतात, किती गोसावडे सावकारी करतात, किती गुरुमहाराजांचे मठ गोकुळकाल्यांत कटिबंध बुडतात. आणि किती पळपुट्या छंगी भंगी टग्यांचे थर तेथें खुशाल चेंडू प्रमाणें जमतात या गोष्टीची न्यायनिष्ठुरतेनें जर कस्सून तपासणी होईल, तर मुसलमानांनी देवळांवर घाव घालण्यापूर्वी किंवा बोल्शेविझमवजा विचारांची वावटळ उठण्यापूर्वी अभिनव विचारक्रांतीचा तरुण हिंदु संघ निराशेच्या झटक्यांत या देवळांची राखरांगोळी करायला अस्तन्या वर सारून पुढें कधिं काळीं सरसावलाच, तर त्यांत आश्चर्य वाटायला नको. धर्मासाठी उभारलेल्या देवळांचा धर्म आज इतका सैतानी बनलेला आहे की, त्याचें उच्चाटण केल्याशिवाय हिंदु जनांचें अस्तित्व यापुढें बिनधोक टिकणें बरेंच मुष्किलीचें आहे. देवळें जर हिंदुधर्माची मंदिरें, तर तेथें अखिल हिंदु मात्रांचा प्रवेश अगत्य झालाच पाहिजे. परंतु, सामाजिक बाह्य प्रदेशांत भटांनी माजविलेला जातिभेद व जातिद्वेष या धर्ममंदिरातूनच उगम पावल्यामुळें, देवळें म्हणजे हिंदुच्या जातिद्वेताचें नरककुंडेच म्हटलीं तरी चालतील. स्वजातिवर्चस्वासाठीच जेथें भिक्षुकांनी देवदेवळांचे पर्वतप्राय दगडधोंडे आपल्या अचाट कल्पनेंतूनच प्रसविले, तेथें देवळ `हिंदुंची’ म्हणून जरी मनांत मिरविलीं, तरी ती `भटांची खास मिरास’ या भावनेनेच आजपर्यंत चालू आहेत.

धर्माची गंगा देवळांत, देवळांचा गंगाराम भट, आणि भट म्हणजे सर्व हिंदु समाजाचा जन्मसिद्ध पिता, गुरु न्यायाधीश, मोक्षदाता आणि भूदेव. अखिल हिंदु जनांनीं आपलें सर्वस्व फुंकून देवळांच्या आणि देवांच्या पायांवर ओतलें, तरी देऊळ आणि देव यांचा खरा मालक भटच. त्यांच्याशिवाय देव कोणाचीच पूजा घेत नाही. कोणी आडदांड भटेतर बळेंच करूं म्हणेल तर देव ती मान्य करीत नाही. लागलाच तो भंगतो. त्याला दरदरून घाम फुटतो. त्याला इन्फ्लुएंझा होतो. मग तो नवसाला फळत नाहीं शेजारतीला निजत नाही. काकडाआरतीला उठत नाहीं. नैवेद्यांचें ताट चाटीत नाहीं. पालखीत बसत नाही. देवाला एकादी देवी असली तर तिच्याहि रंगमहालात जात नाही. विडा खात नाही, खाल्ला तर गिळत नाही आणि थुंकतही नाही, असा मोठा हाहाकार उडतो. पोटापाण्याची काळजी नसलेल्या भट-दलालांच्याहि तोंडचे पाणी पळतें! कित्येक वेळा तुरुंगातून निसटलेल्या बिलंदर कैद्याप्रमाणे देवळांतून देव पटकन नाहिंसा होतो आणि पूनवडीच्या पोटेश्वर एकदम पैठणच्या पटांगणात फडेश्वर म्हणून उपस्थित होतो, असल्या माथेफिरू देवदेवींना ताळ्यावर आणण्याचें सामर्थ्य अवघ्या विश्वात फक्त एकट्या भट भूदेवांच्याच हातीं असल्यामुळें, भटेतर हिंदुजनांचा देव आणि देवळांची राहणारा संबंध किती जवळ आणि किती लांब असावा हें ठरविण्याची मुखत्यारी देवळांच्या उत्पत्ति काळापासून सर्वस्वी `भटार्पण’च राहिली, यांत कांही नवल नसलें, तरी त्यात भटेतर हिंदुंच्या गुलामी मनोवृत्तीचा इतिहास स्पष्ट चित्रित झालेला आहे. गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हा भटांचा `सनातन धर्म’ त्यांनी आजपर्यंत पोटापाड मेहनत करून टिकविला आहे. समाज क्षेत्रांत भिक्षुकशाहीला जगद्गुरुंनी हिंदु हिंदुतच स्पृश्य आणि अस्पृश्य अशी `सनातनी’ द्वैताची पोखरण घातल्यावर त्यांच्या दंडधारकांनी आणि `पवित्र’ बडव्यांनी स्पृश्य भागांतहि भट भटेतर भेदाची रामरक्षा रांगोळी ओढून ठेवण्याचा जोरकस यत्न करण्यांत, या हिंदुब्रव देवळांचाच प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे. भट भटेतर वादाची नरक नदी देवळांतूनच उगम पावलेली आहे आणि ज्यांना हा वाद अज्जीबात समूळ नष्ट व्हावा असें मनापासून वाटत