देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें: Page 8 of 12

सोमेश्वर. भसाड्या तळ्यावर देऊळ म्हणून भसाडेश्वर, बाळोबा पगडबंदानें बांधलें म्हणून बाळेश्वर, फाशीच्या वडाजवळ पिंडी सापडली म्हणून फांसेश्वर, असे शेकडो ईश्वर भटांनी निर्माण करून देवळापायीं आपल्या पोटापाण्याचा प्रश्न चबचबीत वंगणावर सफाईत सोडवून घेतला. काकतालीय न्यायानें पुजारी बनविलेल्या भटांची घराणीच्या घराणी त्या त्या देवळाचे वंशपरंपरागत वतनदार बनले. पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारों भोळसट हिंदूंनीं देवाला गांवें, जमिनी, दागदागिने आंदण द्यावी. ती आयतीच पुजारी भटांच्या पदरी पडत. नांव देवाचें आणि गांव भटाचें. एका भटी संस्थानांतल्या देवस्थानाला सालिना २०-२५ हजार रुपयांचे वर्षासन आहे. त्यातले जेमतेम ७-७।। हजार देवाच्या नांवानें कसे तरी कोठे तरी खर्ची पडतात. बाकीची रक्कम संस्थानाधिपतींच्या ढेकरांत गडप. देवस्थानचे दागदागिने वार्षिक उत्सवाला मात्र देवळांत दिसतात. तेवढा दिवस पार पडला कीं, मग सा-या वर्षभर ते पट्टराण्या घट्टराण्यांच्या अंगावर पॉलिश होत असतात. कित्येक देवळांचा तर असा लौकिक आहे की, देवाला भक्तानें वाहिलेल्या मोग-यांचा हार तासाच्या आंत गमनाजी जमनाजीच्या बुचड्यांत गज-याच्या रूपानें अवतरतो.

मारूतीच्या बेंबटात टिळकांची मूर्ती दिसण्याइतका किंवा दत्ताला बेफाम घाम सुटण्याइतकाच हा लोकोत्तर चमत्कार. यांत काय संशय? कित्येक देवळांतल्या देवांचे जमिन जुमल्यांचें उत्पन्न कोट्यवधि रुपयांचे असून, वार्षिक यात्रेचा खुर्दा लाखाच्या खाली जात नाही. या मलिद्यावर किती लक्ष भटांची ऐदी पोटे रांजणासारखी फुगत असतात आणि त्यांच्या आपापसांतील यादवींमुळे कज्जेदलालीचा धुडगूस चालत असतो. याची कमिशन द्वारा चौकशी केली, तर भयंकर विलक्षण प्रकार उघडकीस येतील. फौजदारी गुन्ह्यांची गेली ५० वर्षांची रिकार्डे तपासली तर लक्षावधि सामाजिक व नैतिक अत्याचारांच्या जन्मभूमीचा व कर्मभूमीचा मान आमच्या हिंदूच्या देवळांच्याच माथी मारावा लागेल. सारांश धर्माची देवळे धर्माची देवळे म्हणून हिंदु कितीहि नाचत असले तरी आजच्या देवळांचा धर्म असा चमत्कारिक व शिसारी येण्याइतका गलिच्छ बनला आहे कीं त्या पुढें शंकराच्या पिंडीच्या उत्पत्तीची `पवित्र पुराणोक्त’ पुष्कळच सभ्य ठरेल. या मुद्यावर विशेष स्पष्टोक्तीने लिहिण्या बोलण्याचा प्रसंग एकाद्या तापट माथ्याच्या भटेतरांवर न येता माबाप इंग्रज सरकारच्या एखाद्या कमिशनवरच येईल. तरच पवित्र भिक्षुकशाहीला सोनारानेंच काम टोचल्याचें सौभाग्य भोगायला मिळेल! देवळांमुळे आणि त्यांतल्या देवामुळें हिंदु समाजाची आत्मिक उन्नति किती झाली हें भटभिक्षुकांच्या लठ्ठ दुलदुलीत पोटांवरूनच ठरवायचें असेल. तर आजचा हिंदु समाज अध्यात्मिक मोक्षाला पोचल्याची थेट पावती द्यायला कांहीं हरकत नाही. असल्या जीवनमुक्त समाजाला या स्वराज्याच्या आणि सहकार-असहाकराच्या दलामली हव्या तरी कशाला? दहा वर्षांपूर्वीपर्यंत राजकारणी त्रांगड्यांच्या जोरावर हिंदूंचे सर्वागीण पुनरुज्जीवन आणि एकजिनसी संघटन करण्याची मिजास मारणारी भटें सुद्धां आज सामाजिक सुधारणेच्या तुणतुण्यावर आपल्या भिक्षुकी अकलेच्या छकड्या गाऊं लागली आहेत व देवळांनीं थेट परमहंस स्थितीला नेऊन भिडविलेल्या हिंदु जनांना हे राजकारणी आणि समाजकारणी नसते उपद्व्याप हवेत कशाला? पण ज्या अर्थी हे उपद्याप चालूं आहेत, त्या अर्थी नीति, न्याय आणि सामाजिक संघटणाच्या कामी हिंदूंची देवळें आणि त्यांतले देव म्हणून पूजलेले दगड धोंडे अखेर मातीमोल ठरल्याचेंच सिद्ध होत आहे.

सोमनाथाच्या टाळक्यावर महंमद गिझनीचा लत्ताप्रहर पडल्यापासूनचा हिंदु देवळांचा इतिहास पाहिला तर गंजड गोसावडे, ऐदी भिकारी, उनाडटप्पू गुंड आणि पोटभरू भट यांची चंगळ उडवण्यापलिकडे या देवळांनी हिंदुधर्म, हिंदुसमाज आणि न्यायनीति यांच्या प्रगतीला सपशेल कुंठविण्याच्या कुंटणपणापेक्षां विशेष कांहींहि केलेले नाही, हेंच दिसून येते. हिंदुस्थान दरिद्री झाला, मातीतून अन्न काढणारा शेतकरीवर्ग भिकेला लागला, देशी धंदे ठार मेले, मध्यमवर्ग नामशेष झाला, सुशिक्षित पदवीधरांची उपासमार बोकाळली इत्यादि इत्यादि वगैरे वगैरे आरडाओरड करण्यांतच राजकारणी अकलेच्या कवायती करणा-या ब्रह्मांड पंडितांनी हिंदुस्थानातील देवळांत केवढी अपार संपत्ति निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होतां, लुच्चा लफंग्या चोर जार ऐदी हलकटांच्या चैनीसाठीं कसा होत आहे. इकडे आतां कसोशीनें लक्ष देण्याची वेळ आली आहे. दुष्काळानें कोट्यवधि लोक देशांत अन्नान करून मेले,