देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें: Page 7 of 12

हिंदु काय म्हणून देवळांत जातात? बाप, आजे, पणजे गेले म्हणून जातात, का त्यांना एखादी गुप्त जादू अथवा मधुमुख विषघट असें कारस्थान त्यांना तेथें ओढून नेतें? हिंदु लोकांची देवळ्या देवांविषयी भावना जर अस्सल आणि आत्यतिंक प्रेमाची असती, तर हिंदुस्थानांत मुसलमानी बडग्याला एकहि देऊळ व एकहि देव खास बळी पडला नसता. अर्थात नाटकें, सिनेमा, तमाशांची थिएटरें हीं जशीं क्षणभर विरंगुळ्याची ठिकाणें, करमणूकच्या करमणूक आणि पटला कांहीं उपदेश तर पटला, नाहीं तर जागच्याजागीं निसटला. यापेक्षा देवळांची विशेष किंमत हिंदु लोकांनी मुळीच बाळगलेली दिसत नाहीं. तरीहि देव देवळांविषयीं शाब्दिक प्रेमाचा हिंदु जिव्हेचा धबधबा पहावा तों त्याच्या धडधडाटापुढें गिरसप्पा नायगाराच्या कानठळ्या बसतात! हें काय भटबंगाल आहे? हे भटबंगाल हिंदुस्थानच्या नकाशांत सांपडणारें नसून ते थेट भटांच्या पोटांत आहे. देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटापाण्याचें गुप्त मर्म आहे. या मर्माचें वर्म अफाट भटेतरांना कधींच उमगू नये, म्हणून भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे. गीता व उपनिषदादि आचारविचार-क्रांतिकारक आणि सत्यशोधन ग्रंथ कितीहि असले तरी देवळांवर देह जगविणा-या या भूदेवांचा विशेष मारा या पुराणांवरच असतो. पुराणांचा पाचकळपणा प्रगट करण्याचें येथें प्रयोजन नाहीं. पुराणांच्या पचनीं पडलेला प्रत्येक प्राणी ईश्वरविषयक कल्पनेंत इतका पागल बनतो कीं, दगड्या देवाच्या पायाऐवजीं भटाच्याच पायावर टाळकीं घासतो आणि त्याचे पाय धुतलेलें पाणी `पवित्र तीर्थ’ म्हणून घटाघटा पितो.

देवळांत कथा, कीर्तने, पुराणें, प्रवचनें होतात पण. सर्वांची झाप छिनाल भागवतावर आणि पाचकळ पुराणांवर, या पुराणांच्या श्रवण मनन निदिध्यासाने हिंदु स्त्रीपुरुषांच्या मनांवर कसकसले घाणेरडे व विकृत परिणाम आजपर्यंत झाले. आज होत आहेत यापुढें होतील, याची नीटशी कल्पना राज्यकर्त्या इंग्रजांना आणि अम्मलबजावणी व न्याय चौकशी खात्यांवरच्या त्यांच्या ऐ.सी.एम. गो-या बृहस्पतींना होणेच शक्य नाही. म्हणूनच भटी पुराणांतून केलेल्या भटेतरांच्या बीभत्स नालिस्तीच्या दंशांच्या वेदना त्यांना भासत नाहीत. आणि एखाद्या जागृत सुधारक भटेतराने त्या वेदना व्यक्त करण्यासाठी उघड उघड जोडे पैजार करून भिक्षुकशाहीची शेंडी गदगदा हलविली, तर त्याचें खरें रहस्य अजमावण्याची या परक्या गो-या न्यायाधीशांना कांही भावनाच नसते. अर्थात त्यांच्या न्यायाचा काटा. धोब्यांच्या आडव्या उभ्या घावाप्रमाणे, पुराण-मंडणावर, म्हणजेच भिक्षुक भटाच्या जानव्यांत ब-याच वेळां अडकून पडतो. देवळांचे माहात्म्य पुराणांनीं वाढविले `पुराणें म्हणजे शिमगा’ असे पुष्कळ विचारवंतांचे म्हणणें आहे. पुराणे म्हणजे शौचकूप, असे आमचे मत आहे. पुराणांत कांहीं गोष्टी चांगल्या आहेंत, असें काही भेदरट सुधारकहि म्हणतात. असतील शौचकूपांत पडलेल्या मोहरा. पुतळ्या ज्यांना उचलायच्या असतील त्यांनी खुशाल उचलाव्या. आम्ही त्यांचा हात धरूं इच्छित नाहीं. पुराणें म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जिवावर जगणा-या देवळांत काय काय पातकांच्या गिरण्या सुरूं असतात. याची कल्पनाच केलेली बरी. देवळें म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागि-या. देवळाशिवाय भट नाहीं आणि भटाशिवाय देऊळ नाही. असा एक सनातनी नियमच ठरून गेला. ह्यामुळें पुराणप्रसव्या भटांनीं देवळांचीं संख्या भरंसाट वाढविण्यासाठी देवांचीहि देवसंख्या वाढवीत वाढवीत ३३ कोटींवर नेऊन भिडविली. त्यात पुन्हा देवांमध्येहि श्रेष्ठ कनिष्ठपणाच्या जाती उत्पन्न केल्या. विष्णुपुराणात विष्णु श्रेष्ठ, बाकी देव लुच्चे. गणेशपुराणांत गणोबा श्रेष्ठ, बाकी देव कुचकामी.

देवीपुराणात देवी श्रेष्ठ, बाकी पुल्लिंगी देव सारे बदमाश, अशी देवतादेवतांतच लठ्ठालठ्ठी लावून दिली आणि प्रत्येक देवाच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्तसंघ हिंदु समाजात चिथाऊन दिले. त्यामुळे प्रत्येक देवाचें देऊळ, या अहमहमिकेनें सा-या हिंदुस्थानभर देवळांचा मुसळधार वर्षाव सुरू झाला. निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायांत जरी आडवा उभा विस्तव जाई ना, तरी सर्व देवळांत भट मात्र अभेदभावानें देव मानवांतला दलाल म्हणून हजरच. बाप भट जरी रामाचा पुजारी असला तरी लेक-भट रावणाच्या पूजेला तयारच. शिवाय एकाच गावात एकाच देवीची अनेक देवळें निर्माण करण्याचाहि एक शिष्टसंप्रदाय पडला. शंकराची पिंडी जरी एकाच रंगाढंगाची असली, तरी सोमवार-पेठेंत देऊळ म्हणून