देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें: Page 6 of 12

कशी? महंमद गिझनीच्या वेळेपर्यंत हिंदूंची देवळें म्हणजे अनंत भल्याबु-या त्रांगड्यांची पेवें बनलेली होती. हा वेळ पावेतों मुसलमान स्वारीवाल्यांना देव किंवा देवळें फोडण्याची कल्पना, खुमखुम किंवा वेड मुळींच माहीत नव्हतें. देव आणि देवळें फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथानें लावलेली आहे.

सोट्यांच्या तीन दणक्यांत पिंडीखालीं जर अपरंपार द्रव्य आणि सगळ्या राजकारणी गुह्याचे कागदपत्र मिळाले, तर असल्या घसघशीत बोहाणीच्या जोरावर देवळें फोडण्याचा धंदा सर्रास चालू न करायला ते धाडशी मुसलमान मूर्ख किंवा हिंदु थोडेच होते? चालूं घडीचा मुसलमानांचा देवळें फोडण्याचा व देव बाटविण्याचा प्रघात `पीछेसे आयी और आगे बढी’ असल्या वृत्तीचा केवळ `बं भोलानाथ’ आहे. त्यापेक्षा त्यांत विशेष कांहीं नाहीं. भिक्षुकशाहीचा भट म्हणजे धर्माचा संरक्षक. त्याचा पालनकर्ता, भट जिवंत तर धर्म जिवंत, भट ओंकारेश्वरावर गेला कीं धर्म तेव्हांच जाणार सोनापुरांत. `ब्राह्मण वर्गानेंच आजपर्यंत धर्म जगविला’ ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल- मवाळ – गबाळ – टवाळ भटांची आरोळी. देवळें म्हणजे धर्मांचीं आगरें. धर्माची गंगा येथेच उगम पावते. त्या उगमावरच भटांचें आसन. देवळांत तर प्रत्यक्ष देव. सा-या विश्वाचा स्वामी. `चराचर व्यापुनी’ आणखी वर जो `दशांगुळें उरला’ ते हिंदूंच्या देवळांत जाऊन भरला. असल्या देवांचे कोण काय करणार? देव मनांत आणील अगर त्याचा कट्टा भक्त – देव मानवांतला जन्मसिद्ध सनदपट्याच्या दलाल भट – त्याला मनांत आणायला लावील, तर डोळ्याची पापणी लवते न लवते तोंच सा-या विश्वाची होळी होईल, असा ज्या देवाचा पराक्रम. युद्धक्षेत्राच्या आणि संसाराच्या लढाया लढण्यापूर्वी प्रत्येक वीर या देवापुढें कापराची पोती जाळून त्याचा व त्याच्या (पूज्य) दलालाचा आशीर्वाद घेत असे. अशा त्या जगच्चालक सर्वपराक्रमी कर्तुमकर्तु अन्यथा कर्तुम सोमनाथावर ज्यावेळी महंमदानें सोटा उगारला, त्यावेळीं रजपूत राजांच्या घिसाड दक्षिणांवर टोणग्यांप्रमाणे चरणारे हे देवधर्म-संरक्षक भट होते कोठें? ते सारे पंचा सावरून आधींच सूं बाल्या करीत पळाले होते. सोमनाथ म्हणे मोठें जागृत कडकडीत दैवत. पण या दैवताचा कडकडीतपणा आणि जागृतपणासुद्धा ऐन प्रसंगी वायबार ठरला. जेथें देवच स्वतःचें संरक्षण करू शकला नाहीं, तेथें भटांनी तरी का हकनाक प्राण द्यावे आणि भट दलालांच्या मार्फत राजकारणापासून तो जनानखान्यापर्यंतची दलाली देवाशीं - किंवा देवाच्या नांवावर करण्यास सवकलेल्या हिंदु राजांनी देवासाठी व देवळासाठी काय म्हणून शस्त्र उचलावें? सगळीच जेथें बडवेगिरी, तेथें धर्माच्या पोकळ नांवासाठी आणि पापपुण्याच्या पाचकळ कल्पनेसाठीं कोण कशाला आपला जीव धोक्यांत घालतो? जोंपर्यंत प्रसंग आला नाहीं. तोपर्यंत लघुरुद्र महारुद्र चालूं आहेच. गचगचीत तूप पोळीचे ढीग पानांवर आयते येऊन पडत आहेत आणि दक्षिणेच्या मोहरा पुतळ्यांनी कडोसरी तट्ट फुगत हे. तोंपर्यंत देवांचा आणि देवळांचा धार्मिक दरारा आणि भट दलालांच्या धर्म प्रवचनाचा खरारा! पण प्राणावर बेतली तर देवाला कोण पुसतो आणि देवळांसाठी कोण लेक रडतो! मानला तर देव नाहींतर धोंडा आणि मानलें तर देऊळ नाहींतर कुंटनखाना!

देवाच्या मूर्तीसाठी आणि देवळांच्या कीर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासांत कोण, दाखवून देईल, त्याला वर्षभर आमची माला फुकट देण्यात येईल. म्हणे ब्राह्मणांनीं धर्म जगविला! आता या आमच्या धर्मांच्या देवळात कसला धर्म वावरत असतो, हे पाहिलें पाहिजे. मूर्तिपूजा अथवा प्रतिक पूजा `अनादिमध्यांतमनंतवीयम्’ अशा परमेश्वर चिंतनार्थ उपयोगी पडणारें एक सुटसुटीत साधन म्हणून कांहीं काळ क्षम्य ठरेल व आजपर्यंत ठरलेंहि. परंतु देवळांतली ही मूर्ती म्हणजे देव नव्हे, केवळ धोंडा, भातुकलीच्या खेळांतल्या बाहुलीसारखी क्षुद्र वस्तु. ही वस्तुस्थिती पुजारी भटदलालापासून तों तिच्यापुढें कपाळें घासणा-या भक्तिणीपर्यंत सर्वांना स्वच्छ माहीत असते. असल्या धोंड्यांची पूजा प्रार्थना करून आत्मोन्नती होणें शक्य नाही आणि प्राणावर बेतली तर हा श्रृंगारलेला दगड स्वतःचें किंवा भक्तांचें मुळींच संरक्षण अगर तारण करूं शकत नाहीं, हे प्रत्येक हिंदुमात्राला कळत असूनहि देवळांतल्या घंटा बडवायला सांज सकाळ कोट्यवधि