देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें: Page 5 of 12

लेण्यांत एकेका उग्र देवाची अगर देवीची देवळें उगवली आणि त्यांना कोंबड्या बक-यांच्या कंदु-यांनी संतुष्ट करणा-या भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्याइतक्या फुगल्या.

यावेळी अठरा पुराणांचीहि भटी-पैदास झालेली असल्यामुळें, हिंदु समाजातल्या व्यक्तीमात्राची नातीगोतीं जरी जातिभेदाच्या घरटांत वस्त्रगाळ भरडली गेली होती. तरी देवांच्या आणि देवींच्या गोतावळ्याची जाळीं सताड मोकाट सुटलेली होती. माणसांप्रमाणें देवांच्याहि मागें बायकामुलांचीं लचांडें निर्माण झाल्यामुळें, पार्वती ही जरी जगन्माता – सा-या विश्वाची आई – असली, तरी ब्राह्मण कवीच्या कल्पनेच्या मुर्वतीसाठी तिचे गंजड शंकराशी लग्न लागून, कधी स्मशानांत तर कधी हिमालयांत, भैरव पिशाच्चादि सेवक गणांच्या संगतीत तिला संसार करणें भागच पडलें. सृष्टिविधात्या ब्रह्मदेवाला, सृष्टि उत्पन्न झाल्यावर, विष्णूच्या बेंबटांतून खेचून काढणा-या भिक्षुकशाहीनें असली देव देवींची गोतावळ्यांची लफडी इतकीं निर्माण केलेली आहेत की, त्याच्या वंशवेलांत सद्धर्माचाहि थांग आज लागणें मुष्किलीचें होऊन बसलें आहे. फार दूर नको. लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पहा. ही वास्तविक बौद्धांची, तेथल्या त्या ओ-या, ते दिवाणखाने, ते स्तूप, सा-या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा. तेथें बाहेर एक देवी प्रगट झाली. तिचे नांव एकवीरा. हिला वेहेरची देवी असेहि म्हणतात. ही म्हणे पांडवांची बहीण. हिच्यासाठीं भीमानें एका रात्रीत हीं लेणीं कोरून काढली. हिचा दुसरा इतिहास काय, तर ही रेणुका, परशुरामाची आई. स्वतः परशुरामच जेथे अमानुष क्रौर्याचा पुतळा व पुरस्कर्ता तेथे त्याची ही एकवीरा मातोश्री बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार? चैत्री पौर्णिमेची कार्ल्याची जत्रा मोठी दांडगी. हजारो मराठे, कोळी, बरेचसे कायस्थ प्रभू वगैरे भटेतर लोक यावेळी तेथे नवस फेडायला जाता. नवसापायीं शेळ्यामेंढ्यांचे कळपच्या कळप फडशा पाडून हीं कार्ला लेणी रक्तांत न्हाऊन निघतात. जो प्रकार कार्ला येथें, तोच प्रकार इतर सर्व लेण्यांत. जेथे असले बोकडखाऊ देवदेवींचे देऊळ नाहीं, तेथे प्लेझर पार्टीसाठी जाणारे लोक सुद्धां कंदुरी केल्याशिवाय परत येत नाहीत. अहिंसावादी बौद्ध लेण्यांत अखंड सुरू असलेले हे `देवळी’ प्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच नव्हे काय? सारांश, भिक्षुकशाहीचा प्रतिस्पर्धी विषयीचा द्वेष पिढ्यानपिढ्या टिकणारा असतो, हे विसरता कामा नये.

मनुस्मृति पुराणें आणि देवळे असा तीन पेडी फांस हिंदुसमाजावर लटकावून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या सवत्या सुभ्याचें सोवळें वर्चस्व आजवर टिकवून धरलेले आहे. या मर्मावर कोणी घाव घालतांच जात सुधारक दुर्धारक भटें सापांसारखी कां फुसफुसतात. याचें अझून ब-याच बावळट शहाण्यांना आणि भोळसट भटेतरांना मोठें आश्चर्य वाटतें. मनुस्मृति, पुराणें आणि देवळें या तीनच गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत. या तीन गोष्टी नष्ट करा. जाळून पोळून खाक करा कीं भिक्षुकशाही रसातळाला गेलीच! प्रदर्शनासाठी तिचा वाळवून ठेवलेला नमुनाहि हातीं लागणार नाहीं. पण हा सोन्याचा दिवस उगविण्यापूर्वी ब्राह्मणांनीं या तीन महापातकांबद्दल भटेतरांच्या मनावर डागलेली धार्मिक पापपुण्याची मोहिनी नाहीशी करणें फार कठीण काम आहे. देवळांचा उपयोग पूर्वी प्राचीन काळीं कदाचित चांगला होत असेल. धर्मप्रसाराचें व धर्म रक्षणाचें कार्य या देवळांनीं किंवा त्यांतल्या धोंड्यादगड्या देवदेवींनीं आजपर्यंत काय केलें, ते इतिहासावरून दिसतच आहे. गिझनीच्या महंमदाचा सोट्याचा तडाका सोमनाथाच्या टाळक्यावर पडेपर्यंत हिंदूंचे देव म्हणजे इंपिरियल बँकेचे बाप असावे, अशी पुसटसुद्धा कल्पना कधीं इतिहासाला आलेली नव्हती. त्या वेळेपर्यंत लघुरुद्र, महारुद्राची रात्रंदिवस अखंड बोंबाबोंब करणारे हिंदु आणि पराक्रमी राजे सोमनाथाच्या पिंडी खालच्या भुयारांत संपत्ति सांठविण्याचा `धर्मवान्’ धंदा करीत असतील, हें महंमद गिझनीला जसें बिनचूक कळलें, तसें फुटक्या कपाळाच्या सोमनाथालाहि कळलें नसावें असें वाटतें. म्हणूनच महंमदाच्या बजरंगी सोट्यांचे थाड थाड थाड एका मागून दोन तीन तडाके खाईपर्यंत त्याला आपल्यावरील प्रसंगाची कल्पना आली नाहीं. कल्पनेचें मंदिर टाळकें तेच कडाड फुटल्यावर कल्पना तेथे राहणार कशी? आणि प्रामाणिक वेश्येप्रमाणें राहिलीच तर सोमनाथाला ती कळणार