देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें: Page 4 of 12

मायघरच वाटे, काटा रुतला जा देवळात. नवरा रुसला, जा देवळात बायको पळाली जा देवळांत, दुखण्यातून उठला जा नवस घेऊन देवळांत, अशा रीतीने देवळांत हजारो भानगडी चालत असत. ब-यासाठीं देऊळ आणि वाईटासाठींहि देऊळच असा प्रकार होता. राजाच्या राज्याभिषेकापासून तों नाठाळ नवतींच्या ना-याचें नाळ्यावर नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडी देवळांतच होऊ लागल्या. आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानांत, इसवी सनाचा उदय होईपर्यंत, धार्मिक क्षेत्रांत नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतीची वादळें अखंड चालूं होतीं.

आपमतलबी भिक्षुकशाहीनें नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूंच ठेविला होता. (ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्याचसाठी भूतलावर अवतरलेली आहे) सांपडेल त्या पशूचा यज्ञ, सोमरस प्राशन, गोमांस भक्षण येथपासून ऋग्वेदी आर्यांच्या आचार विचारांत क्रांति होत होत, बुद्धोतर काळी बहुतेक हिंदू समाज `अहिंसा परमो धर्म’वाला निवृत्तमांस बनला होता. धर्म आणि ईश्वर विषयक कल्पनाहि पार उलट्या झालेल्या होत्या. परंतु स्थूल मानानें इसवी सनाच्या २-या ३-या शतकांपर्यंत हिंदु जनांत व हिंदुस्थानांत देवळे घुसलेली नव्हती. जीर्णमताभिमानी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीनें नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून, भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या २-या ३-या शतकांत महाभारत, रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीनें फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या कालच्या कोणत्याही वाङ्मयांत देव आणि देवळें आढळून येत नाहींत. नाहीं म्हणायला, बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या अमदानीपासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठीं आणि स्वाध्यायासाठीं ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ मंदिरें हीं अस्तित्वांत आलेलीं होतीं. पुढें पुढें या संघ मंदिरांत महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धांच्या हीनयान पंथाने सुरूं केल्या. हिंदुस्थानांत देव-देवळांचा उगम शोधीतच गेले, तर तो या बौद्ध विहारातच बिनचुक सापडतो. नंतर इसवी सनाच्या ७-८ व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनांत सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या उर्फ रजपूतांच्या पाठबळानें बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्या सुरल्या बौद्धांना देशधडीला लावले. लक्षावधि लोकांना मसणवटींत पार धुडकावले.

या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीहि हिराऊन घेण्यात आली. अशा रीतीनें हिंदुस्थानांत हिंदु समाजांत अगदी पहिल्यानेंच आद्य शंकराचार्यानें अस्पृश्यता निर्माण केली ठिकठिकाणच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध-मूर्तींचा उच्छेद केला आणि तेथें शंकराच्या पिंड्या थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींनाच थोडाबहुत फरक करून त्यांना शंकरमूर्तीचा बाप्तिस्मा दिला. अशारीतीनें बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळांत झाले. जोपर्यंत चिलीमच नव्हती तोपर्यंत गांजाची जरूर कोणालाच नव्हती. देवळांच्या चिलमी निघाल्यावर निरनिराळ्या देवांचा गांजा पिकवायला हिंदूंच्या तरळ कल्पनेला कसला आयास? शंकराची देवळें निघतात न निघतात, तोंच गणपति सोंड हालवीत, मारूती गदा झेलीत, बन्सीधर कृष्ण मुरली मिरवीत एकामागून एक हजर. समाजबहिष्कृत पडल्यामुळें अस्पृश्य ठरलेल्या लक्षावधि लोकांनीहि आपल्या जिवाच्या समाधानार्थ म्हसोबा, खैसोबा, चेंडोबा असे अनेक ओबा देव साध्या दगडाना शेंदूर फांसडून निर्माण केले. आद्यशंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनरुज्जीवित केलेली भिक्षुकशाही जसजशी थरारूं लागली. तसतशी जातिभेदाची आणि देवळांची पैदास डुकरिणीच्या अवलादीला बरें म्हणूं लागली. हिंदूंच्या देवळांची उत्पत्ति ही अशी झालेली आहे. शंकाराचार्यांनीं ब्राह्मणी धर्मांच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला. त्यांतल्या सुडाची नांगी इतकी भयंकर जहरी व खुनशी होती कीं, चालू घटकेपर्यंत बौद्धधर्माचा दिवसाढवळ्या अपमान व उपहास करीत आहे. हिंदुजनांच्या मनांत बौद्धद्वैषाचें पेरलेलें भिक्षुकशाही विष आज कसें थैमान घालीत असतें, हें वाटेल त्या बौद्ध लेण्यांत पाहून घ्यावें. वास्तविक या विहारांत किंवा लेण्यांत महात्मा बुद्धाचे बौद्ध भिक्षु `अहिंसा परमोधर्म’ चें तत्त्वचिंतन आणि भूतदया क्षमा, शांति या सात्विक गुणांचा परिपोष व प्रसार करीत असत. शंकराचार्यांचा भिक्षुकी हात या विहारांवरून फिरतांच त्यांची खाडकन स्मशानें बनली. ते गरीब जनसेवक बौद्ध भिक्षु रसातळाला गेले. त्यांचा अहिंसावाद हवेंत वितळला. ताबडतोब प्रत्येक