देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें: Page 3 of 12

या ठिकाणीं तर उद्या त्या ठिकाणीं वसाहत करणारे धाडसी भटके होते. आर्यांनीं ऋग्वेद रचनेपर्यंत, म्हणजे निसर्गपूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची कांही तरी ठळक रूपरेषा आखली होती. पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेंत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते. आस्ते आस्ते ते निश्चित धर्मकल्पना बनविण्याच्या घटनेत होते. तथापि आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय, `धर्म’ शब्द उचारतांच आज आपल्या ज्या कांही भावना होतात, त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता. आर्यांनी पंजाब सर केल्यावर आणि त्यानंतर अनेक शतकें त्यांच्या धर्मकल्पनेंत देवळे घुसली नव्हतीं. त्यांच्या संघ-व्यवस्थेंत राजन्यांच्या (क्षत्रियांच्या) पाठोपाठ उपाध्यायांचा भिक्षुक भटांचा, वर्ग जरी निर्माण झाला होता, तरी देवळांची कल्पना कोणालाच स्फुरण पावलेली नव्हती.

या बाबतींत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघांनीच प्रथमतः पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते. इजिप्त आणि मेसापोटेमियांत शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली. त्याचवेळीं प्रत्येक शहरांत एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो. हीं देवळे सामान्यतः राजवाड्यांनजीकच असत. मात्र देवळाचा घुमट राजवाड्याच्या घुमटापेक्षां विशेष उंच बांधण्यांत येत असे. देवळांचा हा प्रघात फिनीशियन, ग्रीक व रोमन शहरांतहि पुढें पसरत गेला. इजिप्त आणि सुमेरप्रमाणेच आफ्रिका, युरप आणि आशियाच्या पश्चिम भागांकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतीचें पाऊल पडत गेलें, तेथें तेथें देवळांची उत्पत्ती प्रथमतःच ठळकपणे इतिहासात दृष्टीस पडते. अखिल मानवाच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासांत देवळांची कल्पना ही अशी प्रथमच जन्माला आलेली आहे. या सर्व देवळांत आंतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असे, त्यांत अर्ध पशू व अर्धमानव अशा स्वरूपाची एक अक्राळ विक्राळ अगडबंब मूर्ती बसविलेली असे. त्याच्या पुढें एक यज्ञकुंड असून देवाला द्यावयाच्या बळीचीं त्यावर कंदुरी होत असे. ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचें प्रतिक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे वसतिस्थान म्हणून मानण्यांत येत असे. देऊळ नव्हतें तोपर्यंत देव नव्हता. अर्थात त्याच्या सेवेक-यांचीहि गरज नव्हती व उत्पत्तीहि नव्हती. पण देवळांत देव येऊन बसल्यावर त्याच्या पूजाअर्चेसाठी शेकडो भट आणि भटणी, तेलबत्तीवाले, झाडूवाले, कंदुरीवाले, धूपार्ती, शेजार्तीवाले असे अनेक लोक निर्माण झाले. प्रत्येक जणाचा पेहेराव निराळा. लोकांतले शिष्ट लोकमान्य काय ते हे. आर्यांप्रमाणें, जो क्षत्रिय तोच ब्राह्मण, तोच गृहपती यजमान, वेळ पडेल तसें काम करणारा, ही पद्धत या लोकांत नव्हती, यांनी आपापला एक निराळाच ठराविक व्यवसायाचा संघ बनविला. भट म्हणजे भट. मग तो कंदुरी करायचा नाहीं. कंदुरीवाला निराळा.

सारांश, प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनविली; आणि बहुजन समाजांतले पुष्कळ हुषार लोक देवळाच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात घुसले. भटाचें काम दगड्या देवाची पूजा आणि यज्ञांतल्या कंदु-या यथासांग करावयाच्या. हे यज्ञयाग दररोज न होता कांहीं ठराविक दिवशींच व्हावयाचें. लोकांची भटकी वसाहत-प्रवृत्ती आता बरीच शिथिल होऊन, त्यांना शहरवासाची चटक लागत चालली होती. सहा दिवस काबाडकष्ट केल्यावर सातवा दिवस विश्रांतीचा असावा, त्याचप्रमाणें वर्षातले कांहीं दिवस सण मानावे, अशी प्रवृत्ती होत गेली; आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणते हें ठरविण्याचा मामला देवळांतल्या भटोबाकडे असे. तीथवार, सण, खडाष्टक, फडाष्टक इत्यादि भानगडी देवळांमधूनच लोकांना कळत असल्यामुळें, देऊळ म्हणजे त्या काळाचें चालतें बोलतें कॅलेंडर उर्फ पंचागच म्हटलें तरी चालेल. पण आणखीही ब-याच गोष्टी या प्राचीन देवळांत घडत असत. लिहिण्याची कला याचवेळीं अस्तित्वांत आली होती. त्यामुळें शहरांतली व खेड्यापाड्यांतली हरएक गोष्ट समारंभ किंवा बरा वाईट प्रसंग देवळांतच टिपून ठेवण्यांत येत असे. देऊळ म्हणजे सार्वजनिक रिकार्ड हापीस. ज्ञानभांडारहि येथेंच. सणवारींच लोकांच्या टोळ्यांच्या टोळ्या देवळांत जात असत असे नव्हे, तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी तेथें एकेकटीही जात असे. त्या काळचे भटजी वैद्यकी आणि छांछुंही करीत असत. त्याची प्रवृत्तीहि परोपकारी असे. त्यामुळें सर्वांना देऊळ म्हणजे एक