देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें: Page 12 of 12

या प्रदर्शनांमुळे हिंदुजनांच्या धार्मिक उत्क्रातींचा इतिहास चांगला अभ्यासता येईल. रिकामी पडलेली देवळे आणि त्याची कोट्यवधि रुपयांची उत्पन्ने यांचा हिंदु समाजाच्या सुधारणेसाठीं व प्रगतीसाठीं कसकसा उपयोग करावयाचा, हे ठरविण्यासाठी एक अखिल भारतीय हिंदु मंडळ नेमावे. अशी कांही योजना झाल्यास पंथ मत पक्ष भेदांचा निरास होऊन देवळांचा अनेक सतकार्यांकडे उपयोग होईल. सार्वजनिक वाचनालये, संशोधन शाळा, वेधशाळा, शास्त्रीय प्रयोगशाळा, दवाखाने, अनाथाश्रम, सोशल क्लब, व्याख्यानमंदिरे, तालीमखाने, सहभोजनशाळा इत्यादि नाना प्रकारच्या देशोद्धारक गोष्टींकडे देवळाचा सदुपयोग अभेद भावानें करता येणे शक्य आहे. शुद्धी संघटनाचे कामहि तेथे उत्तम होईल. सारांश, हिंदु समाजांत माणूसघाण पसरविणा-या देवळातल्या बागूलबोवा किंवा बागुलबाईच एकदा उचकून मध्यवर्ती प्रदर्शनात जाऊन बसली की हिंदुसंघटनांचा मार्ग पुष्कळच मोकळा होईल. या कामी त्यागाची इतकीहि धडाडी हिंदु जनांना दाखविता येत नसेल तर स्वराज्यालाच काय, पण जगायलाहि ते कुपात्र ठरतील, यांत मुळीच संदेह नाही. तो सच्चिदानंद परमेश्वर अखिल हिंदु भगिनीबांधवांना देव-देवळाची धार्मिक गुलामगिरी रसातळलाला नेण्याची प्रेरणा देवो, एवढी अनन्य भावानें प्रार्थना करून. हा बराच वाढलेला विचार आचारक्रांतीसाठी वाचकांच्या चरणी रूजू करतो.