देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें: Page 11 of 12

मूर्खपणाबद्दल एक सणसणीत तोंडात मारून घ्यावी आणि यापुढें त्यांना जगविण्याचा किंवा नवीन देवळांच्या पैदाशीचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रयत्न न करण्याविषयीं `आईची शपथ’ घ्यावी. हा उपाय खरा. पण त्यातहि एक उपाय आहे. या पयानें देवळांचे पापी डोल्हारे जमिनदोस्त होण्यास कालावधि लागेल, आणि तोंपर्यंत हिंदुंच्या जिवनांत अधिकाधिक किडे पडण्याचा क्रम मात्र मुळींच बंद पडणार नाहीं. दूरदृष्टी भटांनी प्रत्येक देवस्थानाची गंगाजळी इतकी तुडुंब ठेचून भरलेली आहे कीं, सा-या भटेतर दुनियेने देवळांवर जरी बहिष्कार घातला, तरी देवळांचा `वर्णाश्रनी’ सनातन सवता सुभा भटजात बिनबोभाट आणखी दहा शतकें चालवील. अखिल ब्राह्मणेतर दुनिया जरी निसर्गं धर्मानुसार आपल्या मातेच्याच उदरी जन्मत असली, तरी एकटी ब्राह्मण जातच फक्त ब्रह्मदेवांच्या तोंडातून जन्मलेली असल्यामुळे, त्या चार तोंड्या सृष्टी विधान्याची सारी इलमबाजी ब्राह्मण जातीतं बिनतोड धगधगत असते. अशा इलमी जातीच्या सवाई ब्राह्मणदेवांना असा नाहींतर तसा पेंच घालण्याच्या कामीं कोण मानवाचा का विरोध करूं शकेल? जुने देव आणि जुनी देवळें किफायतशीर होणार नाहींत, या दूर धोरणाने, त्यांनी अतांपासूनच नव्या धर्तीच्या देवळाचा उपक्रम सुरू केला आहे. आज जे पुतळे दिसत आहेत, नवीन नवीन बनत आहेत, आणि त्यापायीं जनतेचे लक्षावधि रुपये कायदे ठाकठीक चापातून बिनबोभाट दडपले जात आहेत, त्याकडे किंचित विचारपूर्वक पहा, म्हणजे आमच्या शंकेची मुख्खी समजून येईल.

आज मुंबईच्या बॅकबेवर दिसणारे साखळ दंडाचे चार खांब थोड्याच वर्षांत टोलेजंग देवळांत रूपांतर पावतील, आणि बाबूलनाथी घुमटाच्या उंचीशी स्पर्धा करणा-या त्या देवळांतल्या टिळकेश्वर भक्तांच्या नवसाला २४ तासांतून ४८ वेळ भसाभस प्रसन्न होऊ लागेल. तात्पर्य, बहिष्काराचा हा मार्ग दिसतो तितका खटकेबाज उपायाचा नव्हे. दुसरा मार्ग वहिवाटीला धाब्यावर बसवून, किंबहुना वहिवाटीचा चेंदामेंदा करून हिंदुत्वाच्या ठळक सबबीवर अखिल हिंदु जनांनी देऊळप्रवेशाचा आणि देवपूजेचा अधिकार धिटाईने बजावावा. वहिवाट ही रूढींचीच सख्खी बहीण, तिची पर्वा षंढ, गुलाम आणि मूर्ख यांनीच करावी `आम्ही हिंदू आहोत. आम्हांला देवळात शिरून देवदर्शन घेण्याची परवानगी देता कां हो,’ म्हणून लेखी तोंडी आर्जव वेंगाडणी करणा-या उमरावतीच्या हिंदूत आणि `आम्ही स्वराज्याला पात्र आहोंत, आम्हाला देता का हो स्वराज्यः’ म्हणून काँग्रेसी वेंगाडणी करणा-या हिंदी लोकांत काय फरक! स्वराज्याचा प्रश्न माशांने गिळलेल्या माणकाचा, तर देवळाचा प्रश्न भटाने गिळलेल्या धर्माचा. धर्मात सरकार हात घालीत नाहीं, अशी एक गैर समजूत रूढ आहे. धिटाईने देवळांत प्रवेश करण्याच्या अगर देवपूजेच्या बाबतींत जर भटांच्या बाजूने सरकारी कायदा आडवा येत असेल, तर भटेतर अखिल हंदुजनांच्या हिंदुत्वाचा तो अपमानच होय. असा अपमान सहन करण्यापेक्षां सत्याग्रह करून मेलेले काय वाईट? मात्र, हा निर्वाणीचा प्रश्न दगड्या देवदेवींची पूजा करण्यास हापापलेल्या अंधश्रद्धाळू हिंदुंचाच आहे. नवमतवादी सुधारकांना देवदेवळांची गुलामगिरी यापुढे साफ नको आहे.

कोणत्याही गोष्टींचे प्राचीनत्व मानवी प्रेमाशी घट्ट चिकटून बसते. ती गोष्ट त्याज्य असली तरी मग तिचा त्याग करणे माणसाच्या जिवावर येते, पण त्यागाशिवाय कोणत्याही बाबतींत प्रगति होणे शक्य नाही. हा सनातन निसर्ग धर्म आहे. अर्थात हिंदु समाजाला हिंदु समाज म्हणून इतर मानव वंशाच्या चढाओढींत मर्दाप्रमाणे टिकाव धरावयाचा असेल, तर सामाजिक संघटनेत द्वैताचे व द्वेषाचे विष कालवणा-या देवळांचा प्रेमा दूर झुगारून देणेच अगत्याचे आहे. देवळे आपल्या मूळ धर्मापासून कां चेवली? तर तो भटाभिक्षुकांच्या एकमुखी सत्तेखाली गेली म्हणून देळांत भट का घुसला आणि शिरजोर झाला? तर देवळांत एक कोणी तरी दगड्या देव बसला म्हणून. देवामुळे भट आणि भटामुळें देवळें अर्थात देवाचीच उचलबांगडी केली, तर भटाला व त्याच्या एकमुखी सत्तेला कायमची गति मिळून देवळांच्या इमारती व त्यांची उत्पन्ने हव्या त्या देशकार्यासाठी आज मोकळी होतील. हिंदुस्थानांतल्या सगळ्या मूर्ती व पिंड्या जमा करून एखाद्या मोठ्या मध्यवर्ती शहरांत त्याचे एक कायम प्रदर्शन करावे. म्हणजे भावी हिंदु पिढ्यांना आणि इतिहास संशोधकांना