देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें: Page 2 of 12

जो नंगा नाच चालूं आहे. आत्मस्तोमांच्या टिकावासाठीं भिक्षुकशाहीची जीं कारस्थानें गुप्तपणानें सुरूं आहेत, आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणें भटेतर लोक या कारस्थानांत जे फटाफट चिरडले जात आहेत, त्यावरून हिंदु समाजाचें भविष्य फारसें उज्वल नाहीं, असें स्पष्ट नमूद करायला या लेखणींस फार कष्ट होत आहेत.

निराशाजनक अशाहि अवस्थेंत हिंदुसमाज जगविण्याचे कांहीं राजमार्ग आमच्या धर्मबांधवास सुचविणें हेंच वास्तविक प्रबोधनाचें आद्य कर्तव्य आहे. राजमार्गाच्या आमच्या सूचना इतर डळमळीत सुधारकांप्रमाणें मोहरी एवढी गोळी आणि बालदीभर पाणी अशा नाजूक होमिओपॅथिक मासल्याच्या केव्हांही नसणार. प्रबोधनाच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या (शस्त्रक्रियेच्या). पत्करल्या तर प्रयोग करून पहा. तात्काळ दुःखमुक्त व्हाल. नाहींतर होमिओपॅथिक गुळण्या, भटांचे संघटणीं काढे निकाढे, पुराणप्रवचनांच्या, लेक्चरबाजीच्या मलमपट्ट्या आणि पक्षोपपक्षांची वातविध्वंसक नारायण तेलें आहेतच. बसा चोपडीत जन्मभर! आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे. त्यामुळें आमच्या सर्वांगीण हलाकीचें मूळ भटांच्या पोटांत आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे; हे शेंकडा दहा लोकांना पटतां पटतांच एक शतक काळाच्या उदरांत गडप झालें. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडांत देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ति ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदुधर्माची ही अगदी अलिकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचें जे आलय – वसतिस्थान – ते देवालय. आमचें तत्त्वज्ञान पहावें तों देव `चराचर व्यापुनि’ आणखी वर `दशांगुळें उरला’. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती! बोरीबंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहांत किंवा ताजमहालांत जाण्याचा जसा प्रसंग येतो, तसा `चराचर व्यापूनी दशांगुळें उरलेल्या’ देवाला सारें जग ओसाड चाकून हिंदूंच्या देवळांतच ठाणें देण्याचा असा कोणता प्रसंग ओढवला होता नकळे. बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून परागंदा होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासांत देवळांचा कोठेंच कांहीं सुगावा लागत नाहीं. मग तोंपर्यंत आमचे हे हिंदु देव थंडीवा-यांत कुडकुडत आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठें होते? विद्वान संशोधकांच्या मतें आर्यांच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तींत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्षे धरलीं, तर इतकीं वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठें? आजचा त्यांचा देवळांतला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवांना सकाळची न्याहरी, दुपारी पंचपक्क्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण! याशिवाय दिवस सुना जायचा नाहीं. याशिवाय काकडआरत्या, माकड आरत्या, धूपार्त्या, शेजार्त्या, आहेतच.

कोट्यवधि गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धाळु हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यांत गोणपाटाचें ठिगळहि मिळण्याची पंचाईत; पण आमच्या देवांना छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांशिवाय भागायचेंच नाहीं. खुशालचेंडू श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणा-या देवांची स्थिति देवळें निर्माण होण्यापूर्वी कशी असावी, याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय? आमची खात्री आहे कीं, देवळें नव्हतीं तेव्हां आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेंच मसणवटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी, या राहणींतून आपला उद्धार व्हावा आणि काकड-माकड आरत्यांचे आणि घंटानगा-याचें ऐश्वर्य आपणांस लाभावें, म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली; तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीनें त्यांना तुरुंग वजा देवळांतली भटमान्य राजविलासी राहणी लाभली. देवळें आणि देव यांची आज कशीं विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी, या दोन संस्था मूळ अस्तित्वांत कशा आल्या, याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणें जरूर आहे. यासाठी आर्यसंस्कृतीच्या जोडीनेंच इजिप्त आणि मेसापोटेमियाकडे परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपानें समालोचन केला पाहिजे. आर्यांप्रमाणेंच सेमेटिक लोक गुरेंढोरें पाळून, आज