देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें

प्रबोधनकारांची स्पष्ट छाप असणारं हे पुस्तक. असं पुस्तक लिहिणारा दुसरा कोणी झाला नाही, होण्याची शक्यताही नाही. ब्राम्हणवादी व्यवस्थेवरचा हा घणाघात प्रत्येक विचारी व्यक्तीने वाचलाच पाहिजे, असा आहे. यातील अनेक मतं स्फोटक आहेत, पण ती वाचल्यावर त्यावर टीका होऊ शकते पण कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. ही छोटीशी पुस्तिका अनेक अर्थांनी क्रांतिकारी ठरली.

------------------------------------------

प्रबोधनकार ठाकरेकृत नवमतवादी माला देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें. पुष्प १ ले किंमत एक आणा मुद्रक व प्रकाशक- नारायण प्रभाकर वैद्य श्रीदत्तात्रय छापखाना, ९९ रविवार पेठ, पुणे शहर

------------------------------------------

देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें कोणतीहि वस्तुस्थिती अथवा कल्पना प्रथमतः कितीहि चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली, तरी काळ हा असला इलमी जादूगार आहे की आपल्या धांवत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून, त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेला सुद्धां उलटी पालटी करून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद्य कशी ठरते, याचेंच पुष्कळांना मोठें कोडें पडतें. पण तें उलगडणें फारसें कठीण नाही. काळ हा अखंड प्रगमनशील आहे. निसर्गाकडे पाहिलें तरी तोच प्रकार. कालचें मूल सदा सर्वकाळ मूलच रहात नाही. निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेंहि अंतर्बाह्य एकसारखें वाढतच जातें आणि अवघ्या १८ वर्षांच्या अवधींत तेंच गोजिरवाणें मूल पिळदार ताठ जवानाच्या अवस्थेंत स्थित्यंतर व रूपांतर झालेलें आपणांस दिसतें. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळें झपाझप मागें पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना, ती जर दगड धोंड्याप्रमाणें अचेतन अवस्थेंत असेल तर, प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यांत काहींच चुकीचे नाही. जेथें खुद्द निसर्गच हरघडी नवनव्या थारेपालटाचा कट्टा अभिमानी, तेथें मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा. जुनें ते सोनें ही म्हण भाषालंकारापुरती कितीहि सोनेमोल असली तरी जुन्या काळच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजारांत विकल्या जाणे कधींच शक्य नाही. उत्क्रांतीच्या प्रवाहात वहाणीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाहीं, तर कालगतीच्या चक्रांत त्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्याशिवाय राहावयाच्या नाहीत.

निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी कांटेकोर असतो. काळाची थप्पड दिसत नाही. पण त्याच्या भरधांव गतीपुढें कोणी आडवा येतांच छाटायला मात्र ती विसरत नाहीं. प्रवीण वैद्याची हेमगर्भ मात्रा वेळीं एखाद्या रोग्याला मृत्यूमुखांतून ओढून काढील. पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षेवांचून सुटायचा नाहीं. पूर्वी कोणेकाळीं मोठ्या पुण्यप्रद वाटणा-या किंवा असणा-या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील, तर केवळ जुनें म्हणून सोनें एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणींचे देव्हारे माजविणें, म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखें आहे. अर्थात् असल्या कुचाळीचा परिणाम काय होणार, हें सांगणें नकोच. काळाच्या कुचाळक्या करण्यांत हिंदु जनांनी दाखविलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधःपातांत स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदु समाज `समाज’ या नांवाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गौडबंगाल आणि हिंदु संस्कृति म्हणजे एकबिन बुडाचें पिचकें गाडगे या-पेक्षा त्यांत विशेष असें काहींच नाहीं. उभ्या हिंदुस्थानांत दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाहीं. यामुळें धर्म संस्कृति संघटण इत्यादि प्रश्नांवर पुराणें प्रवचनांची तोंडझोड उठविण्याइतकी त्यांची फुप्फुसें अझून बरींच दणकट राहिलीं आहेत. म्हणून पुष्कळ बावळटांना अझून वाटतें कीं हिंदू समाज अझून जिवंत आहे. एकूण एक व्यक्ती द्वैतानें सडून गेलेली स्वच्छ दिसते, तरी `द्वैतांतच अद्वैत आहे’ म्हणून शंख करणारे तत्त्वज्ञानीही काहीं कमी आढळत नाहींत. परंतु वास्तविक स्थिती विचारवंताना पूर्ण कळलेली आहे. `द्वैतांतच अद्वैत’ अजमावण्याची भटी योगधारणा आमच्या सारख्या सुधारकांना जरी साधलेली नाहीं, तरी कालचक्राशीं हुज्जत खेळणा-या हिंदु समाजाचें भवितव्य अजमवण्यासाठी ज्योतिषीबुवांचे पायच कांहीं आम्हाला धरायला नको. सभोंवार परिस्थितीचा