दगलबाज शिवाजी : Page 10 of 14

प्रत्येक देशी संस्थानाकडे क्षुद्रतेच्या दृष्टीने पाहण्याची जी एक प्रवृत्ति खुद्द हिंदु लोकांतच फैलावले आहे, ती सुद्धां या इंग्रेजी आनुवंशिक संस्कृतीच्या शाबरी सांसर्गाचाच परिणाम होय. आयर्लंडच्या भवितव्यतेत क्रांति घडविणारा डि. व्हॅलेरा आणि इटलीच्या भाग्याची घटना करणारा मुसोलिनी यांच्याविषयी नित्य बाहेर पडणारे आंग्लोद्गार विचारात घेतल्यास,परोत्कर्षसहिष्णुता आणि इंग्रजी मनोवृत्ती यांची छत्तिशी स्पष्ट सिद्ध होते. या छत्तिशीत शिवाजी दगलबाज ठरला तर त्यातहि त्या राष्ट्रवीराचा सन्मानच होत आहे कारण ------------------------------------------------------------ शिवाजी विजयी दगलबाज होता हिंदुस्थानांत एक वेळ दगलबाज आर्यांनी कम-दगलबाज अनार्यांना पादाक्रांत केले. त्यानंतर, हिंदू राज्यकर्त्यांची दाणादाण उडवून मोंगलांनी आपली दगलबाजी वरचढ ठरविली. पुर्तुगेज, फ्रेंच, डच व इंग्रेज यांमध्येही परस्पर दगलबाजीच्या शर्यती लागून, त्यात अखेर इंग्रेजाचा घोडा पहिला आला. काही वर्षे दख्खनच्या मुसलमानीशाह्या `आम्ही पट्टीचे दगलबाज’ म्हणून महाराष्ट्रभर आपल्य सत्तेचा धुमाकूळ घालीत होत्या. शिवाजीने बोलबोलता त्या सत्तेला उद्धस्त करून खुद्द दिल्लीच्या काळजाला हात घातला आणि मुसलमानांपेक्षा आम्ही म-हाठी दिढी दुपटी दगलबाज आहोत, याची जाहीर नौबद रायगडावरून ठोकली. पुढे म-हाठशाही दगलबाजीचा धौशा पेशव्यांनी थेट अटकेला नेऊन भिडविला. अखेर इंग्रेजांच्या मार्जार-तपश्चर्येवर नियतिदेवीची बहाल मर्जी झाली. त्यांनी म-हाठे, मोंगल, सीख, राजपूत इत्यादि सर्व दगलबाजोपदगलबाजांना आपल्या तंत्रशक्तीने चीत करून ब्रिटीश सत्तेच्या बिनमुखी स्थापनेने, चालू युगात. इंग्रज म्हणजे दगलबाजाग्रणी ऊर्फ मास्टर डिप्लोमॅट्स हा सिद्धांत बिनतोड प्रस्थापित केला. आज इंग्रेजाच्या दगलबाजीला जोड नाही आणि तोडहि नाही. आज तिला अवघे त्रिभुवन थोडके पडले आहे. सर्व जगातले राजकारण आज इंग्रेजी दगलबाजीच्या पाणपोयीवरच आपल्या उलट सुलट पेचांचे पाणी पीत असते. या पाण्याला पाणी पाजण्याचे पाणी आज कोणांतही नसल्यामुळे, इंग्रजेतर सर्व राष्ट्रे पाण्यापेक्षा पातळ झालेली आहेत. आज पाश्चिमात्य इंग्रेज लोक ठरवतील ती पूर्व ठरत आहे. ब्रिटीश साम्राज्याचा हा विस्तार व दरारा प्रस्थापित करण्याच्या कामी लक्षावधि इंग्रेजांनी स्वार्थाचा होम केलेला असल्यामुळे, त्याच्या पायात पडलेल्या अनंत अत्याचारांना व घातपातांना आज मानवी स्मृति कवडीचेही महत्त्व देत नाही. यावर कित्येक अशी शंका काढतील की जी कामे नीतिग्रंथांत अकर्मे अथवा कुकर्मे म्हणून गणली जातात, ती उघड माथ्याने आचरून नरपति, हयपति, छत्रपति, चक्रवर्ति इत्यादि अत्युच्च पदाला पोहचणा-या पुरुषांना थोर का मानावे? केवळ ते जबरदस्त सत्ताधीश बनतात म्हणून की काय? नीति, न्याय, सदाचार यांना लाथाडून मिळविलेल्या श्रेष्ठ पदाची महति जगाने काय म्हणून वानावी, आणि इतिहासाने ती मानावी? हव्या त्या अमानुष अत्याचारांवर व घातपातांवर केवळ राजकारणाची सफेदी चढताच त्यांच्या क्रौर्याची आणि राक्षसीपणाची तीव्रता वितळून जाते, तर मानवतेचा सुरक्षितपणा म्हणजे एक भयंकर धोक्याचा सौदाच म्हटला पाहिजे! वाटेल ते कुकर्म राजकारणाचा शिक्का पडताच, चलनी नाण्याप्रमाणे जर जगाच्या बाजारात बिनतक्रार चालते, तर नीतिशास्त्र म्हणजे नाटक का तमाशा? सत्कर्म ते सत्कर्म आणि बदकर्म ते बदकर्म! सकृद्दर्शनी ही शंका वाजवी दिसते. परंतु – त्यात एक `परंतु’ आहे आणि या `परंतु’चे कोडे शेकडा ९९ प्रापंचिकांना उलगडत नसल्यामुळे, कर्म कोणते आणि अकर्म कशाला म्हणावे, याचा समाधानकारक निर्णय त्यांना लावता येत नाही. संसाराच्या रोजच्या क्षुद्र दलमलीतसुद्धा `हे बरे का ते खरे’ `असे करू का तसे करू’ आणि `कसे करू काय करू’ याचा माणसाला उलगडा होत नाही मोठमोठ्या पंडितांचीहि निर्णयशक्ती पुष्कळ वेळा लंजूर पडते. अशा वेळी मोहग्रस्त माणूस वाटेल त्यावर वाटेल ते आरोप करून, आपल्या संशयी मनाचे कसे तरी समाधान करून घेतो. अहिंसा सत्य, अस्तेय, कायावाचामनाची शुद्धता आणि इंद्रिय-निग्रह ही पांच सनातन नीतिधर्माची तत्त्वे खरी; परंतु त्यांच्याहि आचरणात अपवादांची अनेक स्थळे आहेत. सामान्य नियम आणि अपवाद यांचा पायाशुद्ध आणि विवेकमान्य विचार नीतिशास्त्राने मुळीच केलेला नाही, असे खास नव्हे. अहिंसा परमो धर्मः ही गोष्ट कितीहि खरी असली तरी जगाच्या व्यवहारात कर्तव्याची अशी अनेक क्षेत्रे आहेत