दगलबाज शिवाजी : Page 9 of 14

क्षुद्रांकडून अमानुष कृत्ये घडतात, नाही असे नाही. म्हणून काय या सा-या स्वराज्य व स्वधर्म सेवकांना क्षुद्र लेखायचे? हे अत्याचार त्यांनी काय स्वार्थासाठी केले? स्वार्थच मानायचा तर तो इतका महासागरासारखा आहे की, त्यांत त्यांच्या दोषांचे प्रमाण म्हणजे दर्यामें खसखस! कोणत्याहि राज्यसत्तेच्या पायातले दगडधोंडे माती उकरून पहा, त्यात खून, रक्तपात, अत्याचार, विश्वासघात यांशिवाय दुसरे काहीच आढळणार नाही. परराज्यांच्या मुंड्या मुरगाळल्याशिवाय स्वराज्याची मान ताठ बसत नाही, परक्यांच्या घरादारांच्या होळ्या केल्याशिवाय आपल्या राजसत्तेच्या महात्म्याची दिवाळी साजरी होत नाही. बळी तो कानपिळी कम-दगलबाज ऊर्फ बेअकक्ल लोकांनी सवाईसोट्या दगलबाज लोकांच्या सत्तेखाली निमूटपणे चेचले जावे, हा निसर्गाचा दण्डकच आहे. तात्पर्य, दगलबाजी हा यच्यावत् सर्व राज्यसंस्थापकांचा मुख्य सदगुण आहे. हा सदगुण ज्यांच्या आंगी विशेष तेच पुरुषोत्तम प्रत्येक देशाच्या नवमन्वंतराचे शककर्ते म्हणून इतिहासात चिरंजीव होऊन बसले आहेत. विश्वासघात, बेइमान, खून, अत्याचार, जाळपोळ इत्यादि गोष्टी पौराणिकी ग्रंथांच्या किंवा शाब्दिक वादाच्या क्षेत्रात अत्यंत अमानुष मानलेल्या असल्या, तरी राजकारणी क्षेत्रांत त्यांची सदगुणांतच गणना होत असते. शांतीसाठी महायुद्ध ही शब्द योजना तरी किती परस्परविरोधी? रक्तपात टाळावे म्हणून रक्तपात. चो-या बंद व्हाव्या म्हणून घरादारांवर दरवडे. राजावर प्रेम करावयास शिकवण्यासाठी राजद्रोहाच्या खटल्याची सत्रे. ही वाक्ये सकृद्दर्शनी नागव्या विरोधाभासाची दिसतात. पण त्यातच वास्तवीक राजकारणी दगलबाजीच्या सदगुणांचे खरे बीज आहे. नदीच्या मुळाप्रमाणे आणि ऋषीच्या कुळाप्रमाणे कोणत्याहि राजसत्तेचे मूळ शोधण्यात अर्थ नाही. या मुळात कसकसली खते पडलेली असतात, त्याचे पृथःकरण भल्याने करू नये. म्हणूनच राजकारणपटु आंग्ल मुत्सद्दी एडमंड बर्क याने `सर्व राजसत्तांच्या उगमांवर पावित्र्याचा पडदा सोडून देणेच श्रेयस्कर आहे’ असा इषारा दिलेला आहे. राजकारणांत कितीहि घातपात आणि दगलबाजी असली, तरी अखेर ते विजयी व्हावे लागते. ते विजयी झाले तरच त्या दगलबाजीवर आणि घातपातावर पडदा पडतो. इंग्रेजीत एक सूत्र आहे :- `One murder makes a villain, thousands a warrior’ एक खून केला की माणूस खुनी ठरतो, आणि त्याने हजार खून पाडले की तो वीर योद्धा म्हणून गणला जातो. या छोट्या सूत्रांत बडा वेदान्त आहे. स्वदेशाच्या स्वातंत्र्यांसाठी राजकारणी दगलबाजीने झगडणाराला यशापयशाची पर्वा नसली, तरी त्याची केव्हाहि हमी देता येत नाही. बोलून चालून ती सट्टेबाजी. `सरळ पडे दान, त्याची जगात ताठ मान’, `दान पडे वाकडे, त्याच्या जिवावर साकडे.’ यंग टर्की नावाची एक पार्टी काढून राजक्रांति करू पाहाणारा केमालपाशा सुरुवातीला `अपस्टॉर्ट अनार्किस्ट’ उपटशुंभ बंडवाला म्हणूनच मानला गेला होताना! पण त्याच्या शिकंदर नशिबाने त्याच्या तलवारीला सरळ दान देताच, आज त्याचा महिमा केवढा वाढला तो पहा आणि वाकडे दान पडलेल्या रिफांचा पुढारी अबदुल करीम याची काय अवस्था झाली ती पहा. दोघांचे उद्देश एकच. दोघेहि मर्द लढवय्ये. दोघेहि पट्टीचे राजकारणी दगलबाज. पण यशापयशाच्या चढत्यापडत्या झोल्यात एक `जवानमर्द मुस्तफा’ बनला आणि दुसरा बाबू चष्मेवाल्याच्या सदरात पडला! एवढा मोठा शककर्ता चक्रवर्ति नेपोलियन, सा-या युरोपातले राजेशाहीचे मुकूट टाचेखाली चिरडणारा लोकशाहीचा प्रणेता. पण अखेर स्वदेशद्रोह्यांच्या कारस्थानामुळे वाटरलूच्या समरांगणावर त्याचे हुकमी दान हुकताच इंग्रेज जेत्यांनी त्याची कशी काय विल्हेवाट लावली? इंग्रेजी राजनीताचे खरे स्वरूप या एकाच गोष्टीवरून फार स्वच्छ कळून येते. हिंदुंची राजनीति पडत्या प्रतिस्पर्ध्यांचा सन्मान राखते, तर प्रतिस्पर्धी पराभूत होताच आंग्ल राजनीति त्याला रसातळाला नेते. भारतीय महायुद्ध संपल्यावर विजयी पांडवांनी धारातीर्थी पतन पावलेल्या कौरवांना श्रद्धापूर्वक तिलांजुली व पिंडदान केले. इंग्रेजाच्या सांकृतिक इतिहासांत श्रद्धेची ही भावनाच नसल्यामुळे, ते कधी आपल्या पराभूत प्रतिस्पर्ध्याला पिंडदान तर करणार नाहीतच, पण दुसरा कोणी ते करील तर तेहि त्यांच्या प्रवृत्तीला परवडत नाही. नेपोलियन, जोन ऑफ आर्क, शिवाजी वगैरे थोरथोर राष्ट्रवीर वीरांगनाबद्दल आंग्लेतिहासकार जे इतक्या क्षुद्रतेचे आणि उपहासाचे उद्गार काढतात, त्याचे मूळ या त्यांच्या आनुवंशिक संस्कृतीत आहे. आजला