दगलबाज शिवाजी : Page 8 of 14

लाज आणली. क्रिश्चन धर्माच्या प्रसारार्थ उरल्यासुरल्या अनाथ मुसलमान विधवांची पोर्च्युगीज पुरुषांबरोबर बळजबरीची लग्ने ठोकून, गोव्यातील लोकविश्रुत हाफकास्ट पोर्च्युगीज प्रजा निर्माण केली. वेढ्यात सपडलेल्या किंवा लढाईत जिंकलेल्या वृद्ध, मुले व स्त्रियांबद्दल शिवाजीचा दयावंत दण्डक मशहूरच आहे. हिंदू देवळांच्या विध्वंसनासाठी नोरोन्हाने केलेली साष्टीतली कत्तल क्रिस्ती धर्माच्या व येशू क्रिस्ताच्या `प्रेमपूर्णत्वा’ला कशी काय साजली शोभली, हे क्रिस्ती धर्ममार्तडांनीच सांगावे. मुसलमानांच्या मशिदीबद्दल शिवाजीने हेच क्रिस्ती धोरण ठेवले असते, तर म्युझिक बिफोर मॉस्क मशिदीपुढे वाद्यांचा प्रश्न आज निघालाच नसता. पण शिवाजी म्हणजे हिंदुधर्माचा मूर्तिमंत मोहरा! पवित्र कुराण हाती पडताच तो त्याची पालखीत वाजतगाजत सन्मामपूर्वक परतवणी करीत असे. दक्षिणेतील कित्येक मशिदींना शिवाजीने दिलेली वर्षासने आजही चालू आहेत. दुसरे पुर्तुगेज अरेराव म्हणजे आजविडो साहेब `हिंदुस्थानात त्याने केलेला दुष्टपणा अतर्क्य आहे. सीलोनांतील जयप्राप्तीत त्याने आयांकडून त्यांची मुले जात्यात घालू दळिली, शिपायांकडून काही मुले भाल्याचे टोकांवर नाचवून, त्यांचे हाल पाहून तो आनंद मानी.’ धर्मप्रसारासाठी साधूंचे पेहराव केलेल्या क्रिश्चन हरामखोरांची राजकारणी कृष्णकृत्ये आम्ही पामर हिंदूने काय वर्णन करावी? युरोपियन संस्कृतीच्या व क्रिश्चन धर्माच्या तोंडाला आचंद्रार्क काळीमा फासणा-या इंक्विझिशनचे अत्याचार क्रिस्ती धर्म व सत्ताप्रसारक अरेरावांनी हिंदी लोकांवरहि गाजविण्यास कमी केलेले नाही. डच लोकांनी आंबोयना येथे इंग्रज लोकांची केलेली कत्तल आणि टॉवरसन, बोमन्ट, जॉनसन, जॉन क्लार्क प्रभृतींवर केलेले पाशवी अत्याचार वाचले, तर दगडालाही पाझर फुटेल. पलित्याने सर्वांगाला डागण्या देणे, उलटे टांगणे, पायास हातास कोपरावर खाकेत मेणबत्त्यांचे चटके देऊन मांस बाहेर काढणे, त्या जखमा धुवायच्या नाहीत, औषधपाणी करायचे नाही, मग त्यात किडे पडून दुर्गंधी सुटायची व किडे सर्व शरीरावर वळवळत फिरायचे असल्या `आंबोयना’ अत्याचारांची इंग्रेजाची आठवण कशाने बुजणार? पुर्तुगेज आणि डचांपेक्षा फ्रेंच आणि इंग्रेज जरा विशेष शहाणे. दगडापेक्षा वीट मऊ यांनीही अत्याचार केले नाहीत, असे नाही. पण, डावपेचाच्या दगलबाजीवर यांचा भर विशेष. शारीरिक अत्याचारांपेक्षा बौद्धिक अत्याचारावर त्यांची धोरणे फार. रॉबर्ट क्लाईव्हने वाटसन साहेबाची खोटी सही करून उमीचंदाला तर धडधडीत बनावट दस्तऐवजाने फसविले. वॉरन हेस्टिंग्जने अयोध्येच्या बेगमांचा केलेला छळ व इतर अत्याचार तर जगप्रसिद्धच आहेत. लॉर्ड डलहौसीने कलमांच्या फटका-याने आणि तू नाही तर तुझा बाप अशा सबबीवर मोठमोठी देशी राज्ये भराभर ब्रिटीश सत्तेच्या पचनी पाडली. ५७व्या बंडातल्या हिंदी लोकांवरील इंग्रेजी अत्याचारांनी पुर्तुगेज डचांच्या आठवणीलाहि मागे सारले. परवाची जालियनवाला बागेची कत्तल म्हणजे आंबोयनाचीच प्रतिमा नव्हे काय? या सर्व अत्याचारांच्या कृतघ्नतेपुढे आणि क्रौर्यापुढे शिवाजीने केलेला अफझुलखानाचा वध म्हणजे ढेकूण चिरडण्याइतकाच क्षुद्र ठरेल. शिवाजीवर किंवा सर्रास हिंदु नृपतींवर दगलबाजीचे आरोप करणा-या इंग्रज इतिहासकारांना रॉबर्ट क्लाईव्ह, वॉरन हेस्टिंग्ज, लॉर्ड डलहौसी इत्यादि अनेक राजकारणी महापुरुषांची कारस्थाने साजरी गोजरी वाटण्याचे आम्हाला तरी एवढेच कारण दिसते की, त्यांनी `दगलबाजी’ या ऊर्दू-मराठाशब्दाला `डिप्लोमसी’ हा एक गोंडस इंग्रजी शब्द प्रचारात आणलेला आहे. त्याच्या पोटात स्वर्गनरकासह सारे विश्व पचनी पडले तरी त्याला अजीर्ण म्हणून कधी व्हायचेच नाही. ---------------------------------------------------------------------------------- डिप्लोमसी ऊर्फ दगलबाजी ही राज्यक्रांतीची जीवनदेवता आहे. हिच्या उपासनेने स्वराष्ट्राच्या भाग्यसिंधूला अपरंपार भरती आणणा-या सर्व डिप्लोमॅटांची क्षुद्र लौकिकी नीतीच्या चव्हाट्यावर चिकित्सा करणे चिकित्सकांच्या क्षुद्र मनाचे द्योतक होय. डिप्लोमॅट ऊर्फ राजकारणी दगलबाजांना संसारी नीतीच्या दण्डकाखाली खेचले, तर पृथ्वीवरील कोणत्याही चक्रवर्ति नृपतीच्या आणि लोकशाहीब्रुव राज्यसत्तेच्या तोंडाला फासायला काळ्याशिवाय दुसरा रंगच उरणार नाही. अर्थात् स्वराज्य-संस्थापक आणि साम्राज्य-प्रसारक राष्ट्रवीरांच्या चारित्र्याकडे पहाण्याची ही दृष्टीच चुकीची आहे स्वदेशाच्या सौभाग्याचे आणि स्वातंत्र्याचे अत्युच्च आणि व्यापक ध्येय साधण्यापलीकडे राष्ट्रवीरांना स्वतःचा स्वार्थ असा काहीच नसतो. स्वार्थाचा संन्यास करू कोट्यवधी स्वदेश बांधवांच्या हितासाठी झगडतांना, त्यांच्या हातून घडतील त्या ब-या वाईट कृत्यांची परीक्षा संकुचित अशा संसारी नीतीच्या दुर्बिणीतून करणे, सपशेल चुकीचे आहे. पुष्कळ वेळा राष्ट्रसेवेच्या व्यापक ध्येयासाठी झगडणा-या जातीवंत