दगलबाज शिवाजी : Page 7 of 14

की जिचा पाया दगलबाजीवर उभारलेला नाही. सत्यव्रताची आणि न्यायाची मिजासच मारायची, तर एका राष्ट्राने दुस-या राष्ट्राला, गो-या लोकांनी काळ्या लोकांना, आणि पाश्चिमात्त्य लोकांनी पौर्वात्य लोकांना हव्या त्या उपायांनी जिंकून गुलाम करायचे, हा तरी कोठल्या गावचा न्याय? माणसांनी माणसांना ठेचून त्यांच्या गुलामगिरीवर स्वतःच्या जेतृत्वाची शेखी मिरविणे, हीच मुळी सृष्टीच्या नियमांची जेथे धडधडीत पायमल्ली, तेथे त्याच गुलामगिरीचे लोण सफाईत परतविण्यासाठी कोणी काट्यानेच काटा काढला, तर त्यांत दगलबाजी ती कसली? जगाची रहाटीच जर उलट्या पावलांनी चालत आहे तर सुलटे चालण्यांत शहाणपणा कोणता? करत्याची करणी आणि मारत्याची तलवार हीच जगाच्या जगण्याच्या धडपडीची गुरुकिल्ली आहे. याच गुरुकिल्लीने शिवाजीने महाराष्ट्राच्या नशिबाला चिकटलेली इस्लामी गुलामगिरी उध्वस्त करून, आपल्या मातृभूमीला हिंदवी स्वराज्याचे स्वातंत्र्य दिले. यात चुकले कोठे? दगलबाजी ती कसली? अत्याचार कसले? खून तरी कसले? आणि विश्वासघात तरी कोठे घुसले? खटास खट भेटे, तेव्हाच मनीचा संशय फिटे. हिंदू लोक आचंद्रार्क मुसलमानी सत्तेचे गुलाम राहणार काय? शिवाजीच्या या प्रश्नाला तत्कालीन प्रस्थापित राज्यसत्तेने `होय होय होय’ अशा मगरूरीच्या प्रतिध्वनीचे उत्तर दिले. त्यावर `कल्पांत करीन, पण ही मगरूरी टिकू देणार नाही. हिंदू स्वतंत्र झालाच पाहिजे.’ अशी शिवाजीने धडाडीची उलट सलामी दिली. हिंदु-स्थान आणि त्यावर राज्य-सत्ता म्हणे मुसलमानांची! या दगलबाज परिस्थितीचा नायनाट करण्यासाठी शिवाजीला सवाई दिढी दुपटी दगलबाज बनल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. प्रस्थापित मुसलमानी राज्यसत्तेचा विध्वंस हीच ज्यानें आपल्या कर्तव्याची दिशा ठरविली, ज्या कर्तव्यांत त्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थाचा आमूलाग्र संन्यास केला आणि ज्या कर्तव्यसिद्धांवर कोट्यावधि जीवांचा ऐहिक मोक्ष अवलंबून होता, त्या कर्तव्यासाठी – त्या गुलामगिरीचा कण्ठ काडकन् फोडतांना, अफझुलखानाचा काय, पण शिर्के, मोरे, जाधवासारखे स्वजातीय कंटक आडवे येताच, त्यांचेही खून पाडणे, शिवाजीच्या राष्ट्रधर्माला आणि राजकारणी नीतीला मुळीच विसंगत नव्हते. फार काय, पण विजापुराहून अफझुलखान आला, त्याच प्रतिज्ञेने व तयारीने शिवाजीचा प्रत्यक्ष बाप शहाजी जरी आला असता, तरी हिंदवी स्वराज्यस्थापनेच्या महत्कर्तव्यासाठी शिवाजीने त्याचाहि कोथळा फोडून, आपल्या हाताने आपल्या मातोश्रींच्या कपाळचे कुंकू पुसायला कमी केले नसते. राष्ट्रोद्धाराच्या पवित्र कर्तव्यक्षेत्रात ध्येयाच्या सिद्धीसाठी `आडवा आला की काप’ हाच जेथे नीतीचा दण्डक आहे, तेथे `मातृदेवो भव, पितृदेवो भव’ या संसारी लोकांच्या आंबटवरणी नीतीचे नियम काय होत? दगलबाजीशिवाय राज्यसत्ता नाही आणि उलट्या काळजाशिवाय राजकारण नाही. स्वराज्यस्थापनेसाठी आणि परदेश जिंकून साम्राज्यवृद्धी करण्यासाठी आजपर्यंत दगलबाज्या केल्या नाहीत कोणी? सर्वांनी केल्या. कोणीहि नाकाला जीभ लावण्याचा खटाटोप करू नये. स्वतंत्र अमेरिकन संस्थानांची प्राणप्रतिष्ठा; ब्रिटीश रक्ताच्या लोकांनी ब्रिटीश सत्तेला उलथूनच केली ना? कोठे गेला तो रक्ताचा जिव्हाळा त्या वेळी? आर्यांनी जसा अनार्यांचा बीमोड करून हिंदुस्थानात तंगड्या पसरल्या, तद्वत् याच अमेरिकन वसाहतवाल्यांनी रेड इंडियनांच्या कत्तली व विध्वंस केला, तो शुद्ध युनिवर्सल ब्रदरहूड (विश्वबंधुत्वा)च्याच भावनेने काय? मुसलमानांनी सत्तामदाच्या धुंदीत हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचे बरेच तिखटमिठाचे वर्णन आपण बखरी; नाटके, कादंब-यांतून वाचतो. परंतु पोर्तुगीज, डच, इंग्रेज, फ्रेंच या क्रिस्ती राष्ट्रांच्या अरेरावांनी हिंदुस्थानात केलेल्या अत्याचारांपुढे ते कःपदार्थ ठरेल. पुर्तुगीजांचा प्रपितामह वास्को द गामा याने आपल्या दुस-या सफरीत झामोरीनच्या वतीने स्वागत देण्यास आलेल्या ब्राह्मण वकिलाचे कान कापून तेथे कुत्र्याचे कान शिवले. आपल्या पुर्तुगीज राष्ट्राचा दरारा दाखविण्यासाठी बेसावध कालीकट बंदरावर तोफांचा भडीमार केला. बंदरांतील जहाजे लुटून, त्यांच्या ८०० नावाड्यांचे नाक कान कापले सोट्यांनी दात पाडले. तोडलेले सर्व अवयव ताटात भरून त्या ब्राह्मण वकिलाबरोबर `याची भाजी करून खा’ या निरोपासह झामोरीनकडे पाठविले. शिवाजीने अशा प्रकारची राक्षसी कृत्ये कधी कोठे केलेली असल्यास त्याच्या निंदकांनी खुशाल पुरावे पुढे आणावे. आल्फान्सो आल्बुकर्कने तिमय्या गरसप्पा नावाच्या देशद्रोही हिंदु राजाच्या मदतीने गोवा काबीज केल्यावर, आपल्या सत्तेचा वचक दाखविण्यासाठी तेथल्या मुसलमान रहिवाशांची व निरपराधी बायकामुलांची सर्रास कत्तल करून दिल्लीच्या नादीरशहालाहि