दगलबाज शिवाजी : Page 6 of 14

खाली वर उजेडच उजेड आणि तेजच तेज. वाचकहो, असल्या गप्पा लुच्या गप्पिष्ठांनी माराव्या, पोटभरू किंवा रिकामटेकड्या लेखकांनी लिहून प्रसार कराव्या आणि बावळट श्रोत्या वाचकांनी नंदीबैलाप्रमाणे माना हालवून मान्य कराव्या, यापेक्षा त्यात विशेष काहीच नसते. कोण गोमाजी द्रव्यप्राप्तीच्या शर्यतीत काय काय लपंडावांनी भरारतो, याचा तपशील पुष्कळांना अवगत असतो. परंतु व्यवहाराची मायाच अशी मायावी आहे की त्या तपशिलांचा उच्चार कोणी फारसे करीतच नाही. त्यात पुन्हा त्यां गोम्यासोम्याला लक्ष्मी प्रसन्न झालेली! मग काय, सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते. अर्थात संपत्तीच्या झगझगाटाखाली दडलेला पापांचा आणि घातपातांचा भगभगाट उकरण्याच्या अव्यापारेषू व्यापारात पडण्याची लोक सहसा तसदी घेत नाहीत.

वकिलांचे वाडे विद्धत्तेच्या विजयावर वसले जातात काय? स्मृतिग्रंथांत वकिलांच्या वृत्तीविषयी घातलेले नीतिनिर्बंध जर अक्षरशः पाळले जाते आणि विद्यमान सरकारांनी ठरविलेल्या वकीली फीच्या कोष्टकांतच जर त्यांचे द्रव्यप्राप्तीचे प्रमाण मर्यादित राहते, तर बाराबंदी बंडी, मांडपंचा आणि गांधी टोपी पलीकडे एकाहि वकिलाचे ऐश्वर्य फुगले नसते. नोकरी चाकरी किंवा अर्थोत्पादनाचा कसलाही लौकिकी धंदा न करता, फक्त `देशभक्त’, म्हणून व्याख्यानबाजी आणि लेखनबाजी करीत जगणा-या अनेक ब्राह्मण लोकांनी ठिकठिकाणी मोठमोठे वाडे बांधले आहेत, आणि सावका-याही सुरू केल्या आहेत, त्या काय सा-या `वंन्दे मातरम्,’ राष्ट्रगीत पारायणाच्या तात्कालीक फलश्रुत्याच मानायच्या की काय? अंगावर खादीच्या चिंध्या पांघरून देशासाठी भिक्षा मागत गावोगाव व खेडोपाडी भटकणा-या संभावित भिक्षूकांच्या सौभाग्यवती गोटपाटल्यांत चमकताना दिसतात, त्या काय खादीच्या आडव्या उभ्या ताणाच्या तणावावर की काय? लिमिटेड कंपन्यांची आणि देशी बँकांची दिवाळी वाजवून, कफल्लक अवस्थेत नादारीची सनद पटकविणा-या `थोर’ माणसांच्या नशिबी नादारोत्तर काळी सुद्धा मोटारी, बंगले, शेतवाड्यांचे ऐश्वर्य तसेच चिकटून राहिलेले आढळल्यास, तो देखील नीतिमत्तेचा एक श्रुतिस्मृतिपुराणोक्त दिग्विजय मानायचा की काय? नीतिनियमांची पुराणे आणि लौकिकी व्यवहारांची गुप्त अर्धगुप्त वा उघडगुप्त धोरणे, यांचा समन्वय लावण्याचे काम म्हणजे या जगातला एक ब्रह्मघोटाळाचा होय. तात्पर्य, लौकिक व्यवहार जसा दिसतो, तसा वास्तवीक मुळीच नसतो, म्हणूनच बावळट माणूस बोलता बोलता सपशेल फसतो. जीवो जीवस्य जीवनम्. मोठ्या माशाने धाकट्या मासोळीला मटकावून जगावे. ज्ञान्यांनी अज्ञान्यांची घरेदारे लुटून आपले वाडे शृंगारावे. जबरदस्तांनी कमकुवतांना जिंकून दास बनवावे. सत्य, न्याय, प्रेम, अहिंसेची कास बळकट धरणा-या नामर्द षंढांना युक्तिबाज, दगलबाज बाजीरावांनी हासत हासत चिरडून जमीनदोस्त करावे. ज्याच्या हाती शिकार त्याने पारधी म्हणून मिरवावे. हाच जेथे सृष्टीत चाललेल्या `जगण्याच्या धडपडी’चा आत्माराम, तेथे एका चोराने दुस-या चोरावर दगलबाजीचा आरोप करावा. ही तरी दगलबाजीच नव्हे काय?

--------------------------------------------

दगलबाज नाही कोण?

दुनियाच जेथे जातिवंत दगलबाज, तेथे दगलबाजी शिवाय जगणारे प्राणी म्हणजे षंढ, हिजडे, नामर्द, विद्वान आणि गुलाम हेच होत. या लोकांशिवाय, नेटका प्रपंच करून मरण्यापूर्वी वेळ सापडलाच तर परमार्थ-विवेकाचा फेरफटका करणारे छोटे दगलबाज संसारी, रोजच्या संसारांतल्या जगण्याच्या धडपडीत जे जे उत्पात करतात, त्यांचा विचार केला म्हणजे उलट्या काळजाच्या रंडीबाज (वारांगनेव) राजकारणांतल्या बड्या दगलबाज दिग्गजांच्या उत्पातांचे प्रमाण सहज कळून येईल. साध्यासुध्या संसारांत एकमेकांच्या मुंड्या मुरगाळल्याशिवाय जर संसा-यांना जगताच येत नाही; कापड मोजतांना गजाला आणि माल तोलताना तराजूला हिसका दिल्याशिवाय जर आमच्या व्यापारांतला अपमृत्यू टळत नाही; आणि ख-या खोट्याची भेसळ केल्याशिवाय, न्यायदेवतेने दिलेली न्यायाची कांजी पिण्याची जर मनुष्याच्या जिभेला सवयच नाही; तर कोट्यावधि लोकांच्या संसाराच्या बरेवाईटपणाचा जिम्मा घेणा-या राजकारणी संसाराच्या नायकाला शक्तीयुक्तीबुद्धीची ठेवणे कसल्या मनोवृत्तीच्या साच्यातून ओतून काढणे अगत्याचे असते, याची कल्पनाच करावी. जित-जेतृत्वाची घडामोड घडविणारे राजकारण हेच मुळी जेथे हरामखोरीच्या सट्टेबाजीचे क्षेत्र, त्या क्षेत्रांत स्वदेशाच्या भवितव्यतेचे खेळखेळणा-या खेळाडूंनी, इंद्रधनुष्यालाहि चक्कर येईल असा भरंसाट चित्रविचित्र रंगांत, हरामखोरीची आणि दगलबाजीची जुव्वेबाज रंगपंचमी खेळू नये, तर काय `सत्य वद धर्मचर’ वाल्या बेदर्द गोसावड्याप्रमाणे राखेच्या ढिगाराची फाल्गुनी पौर्णिमा करावी? जगात आजपर्यंत अशी एकहि राज्यसत्ता झालेली दाखविता येणार नाही