दगलबाज शिवाजी : Page 5 of 14

कृत्यांची परीक्षा कोणत्या दृष्टीकोणाने केली पाहिजे, इत्यादि महत्त्वाच्या मुद्यांची आणि या वकीलांची फारकतच असल्यामुळे, त्यांनी साध्या संसा-याला लागू पडणा-या नीतिनियमांच्या कक्षेत या राष्ट्रसंसा-याला ओढावे, यांत त्यांच्या बुद्धिमांद्याशिवाय विशेष काहीहि निष्पन्न होत नाही. राष्ट्रसंसा-यांना कर्तव्याकर्तव्याची जी बिकट त्रांगडी सोडवावी लागतात, ती ते कोणत्या भूमिकेवरून कशी सोडवितात, याचे परोक्ष ज्ञान या लौकिकी नीतिवंतांना नसल्यामुळेच, ते `जन्माला आला हेला, कसा तरी जगून मेला’ अशा साध्यासुध्या संसा-याच्या भूमिकेवरून शिवाजीसारख्या राष्ट्रसंसा-याच्या कर्माकर्माचे परीक्षण करण्याच्या पोरकट फंदांत पडतात. सतत पाच वर्षे युरपियन महायुद्ध मर्दुमकीने खेळविणा-या जर्मन कायझर वर खटला भरण्याच्या पाचकळ वल्गना असल्याच क्षुद्र बुद्धिची अवलाद होय. ही क्षुद्र बुद्धीची उर्फ नीतीची चाड बाळगणारांनी खुशाल धंदेवाईक पुराणिक म्हणून मिरवावे. पण त्यांनी स्वराज्यसंस्थापक राष्ट्रवीरांच्या चारित्र्याची चिकित्सा करू नये. ते त्यांचे क्षेत्र नव्हे तो त्यांचा अधिकार नव्हे. वाकड्या दरांत वांकडी मेढ ठोकणारेच पुरुषोत्तम राष्ट्रवीर होऊ शकतात. ते साधुसंताचे आणि `सत्य सदा बोलावे’ वाल्यांचे तोंड नव्हे. साधुवृत्तीने आणि संसारी नीतीने राज्ये कमाविल्याचा दाखला इतिहासात नाही.

राज्याची प्राणप्रतिष्ठा म्हणजे टाळकुट्या साधुसंतांची भजन-प्रतिष्ठा नव्हे. त्यांतल्या त्यात गुलाम बनलेल्या देशाची महिरलेली मनोवृत्ति चैतन्यपूर्ण करून परकीय सत्तेच्या मुडद्यावर स्वराज्याचा पाया उभारणारा वीर साधुवृत्तीचा असून भागतच नाही. असे आजपर्यंत कधि कोठे घडले नाही, पुढे कधि कोठे घडणार नाही. ``एका गालावर कोणी चापड मारली तर लागलाच दुसरा गाल पुढे कर’’ या क्रिस्त धर्माज्ञेप्रमाणे युरपस्थ क्रिस्तीजन अक्षरशः वागते, तर त्यांना हिंदुस्थानचे साम्राज्य कधीच मटकावतां आले नसते. महंमद गिझनी पासून तो थेट बाबर हुमायून पर्यंतचे लोक जर नुसते माळा ओढणारे आणि नमाज पडणारे मुल्ला मौलवी असते तर मोंगल साम्राज्याची स्थापना होतीच ना. त्याचप्रमाणे सत्य, नीति, वचन, इमान असल्या साधुवृत्तीच्या फाजील फंदांत रजपूत जर निष्कारण गुरफटले नसते, तर त्यांचाही अधःपात इतक्या लवकर खास झाला नसता आणि शिवाजी जर दगलबाजांतला दगलबाज, लुच्चातला लुच्चा, खटांतला सवाई खट आणि उद्धटांतला दिढी दुपटी उद्धट नसता, तर त्यालाही म-हाठी स्वराज्य यावज्जन्मांत स्थापन करता आले नसते. नेहमीचा व्यवहार पाहिला तरी सतीच्या घरी बत्ती आणि वेश्येच्या घरी झुले हत्ती, हाच प्रकार चालू असतो. सत्य, न्याय, समता, प्रामाणिकपणा इत्यादी तत्त्वे पुराणांसाठीच जन्माला आलेली आहेत. लिहिण्या बोलण्यांत त्यांची फोडणी फार खमंग लागते. एखाद्या गोमाजीच्या चारित्र्यावर थोरपणाची सफेदी चढवून, त्याच्या चरित्राचे ग्रंथ ‘विक्रीला लायक ठरविण्याच्या कामी, ही तत्त्वे लेखक बखरकरांना शाई लेखणी इतकीच उपयुक्त असतात. परंतु, प्रत्यक्ष व्यवहारांत या तत्त्वांनी आजवर एकाहि मनुष्याचा भाग्योदय केल्याचे उदाहरण आढळणार नाही. अमक्या तमक्याने म्हणे ५ दिडक्यांवर भाजीविक्याचा धंदा आरंभून १५ वर्षांत तो लक्षाधीश झाला! फलाण्याने डोक्यावर टोप्याचे शिप्तर घेऊन टोप्या विकता विकता, अमुक वर्षांत फेरीवाल्याचा म्हणे कोट्याधीश झाला! गोम्यासोम्या म्हणे रस्त्यावर खडीच्या पाट्या वाहात होता, तो आज हिंदुस्थानातल्या सगळ्या रेल्वेचा कंट्राक्टर होऊन, रोल्स रॉईसशिवाय पाऊल बाहेर टाकीत नाही! दहा वर्षांपूर्वी हातात एक फुटका लोटा घेऊन नागडा उघडा भटकत आलेला मारवाडी म्हणे मोडतोड तांबा पित्तलवर आज अब्जाधिपति बनला! आणि-आणि लोकांना दाखवायचे भासवायचे काय? तर हे सगळे नरमणि सत्यं वद, धर्म चर इत्यादि गुणांच्या भांडवलावर बडे भांडवलवाले बनले! हे सारे वस्त्रगाळ नीतिमत्तेचे पुतळे. पाप म्हणून यांच्या गावी नाहीच. व्यवहाराच्या खाच खळग्यांवरून जाताना ना कधि यांचा पाय पापाच्या पिसावर पडला, ना कधि घातपाताच्या वळणावर अडला. यांनी प्रत्येक कर्म देवाधर्माची जाणीव ठेऊन केलेले. यांचे इमान? आहा! ते काय विचारावे? सगळे हरिश्चंद्राचे अवतार! स्वप्नात दिलेली वचने सुद्धा जागे झाल्यावर फडशा पाडणारे! पापभीरूत्वाच्या काचेच्या सीलबंद बरणीतल्या या सा-या धर्मवान् सत्यवान नीतिवान् शीलवान् कापट्या! बिचा-यांना पापाची नुसती झुळूक सुद्धा कधि चाटून गेलेली नसायची. किटसन दिव्याची मॅन्टलेच ही! आरपार उभा आडवा