दगलबाज शिवाजी : Page 3 of 14

कृत्यांना पुराणांच्या पोतड्यातील राम कृष्णांच्या तत्सम कृत्यांचा पाठपुरावा दाखवून, `या देवाच्या लीला, माणसांना कसच्या कळणार!’ म्हणून शेरा ठोकून स्वस्थ बसतो. शिवाजीला कोणी दगलबाज म्हटले की आमच्या नाकाचा शेंडा फुरफुरू लागतो. पण शिवाजी दगलबाज कसा नव्हे? का असू नये? याचा मात्र विवेकशुद्ध विचार आम्हाला कधी सुचायचा नाही. रूढ पौराणिकी मताची पर्वा न करता हा विचार खुलासेवार आज चर्चेला घेतला आहे. ---------------------------------------

शिवाजीवर अहिन्दूंचे आरोप तरी काय आहेत? याची यादी प्रथम घेऊ या. शिवाजीवर पहिला आणि ठळक आरोप म्हणजे राजद्रोहाचा. त्याने विजापूरच्या अदीलशाहीविरुद्ध म्हणे बण्ड उभारले. कोणत्या तरी प्रस्थापित राजसत्तेला मूठमाती देऊन तेथे नवीन सत्ता स्थापणा-या कोणत्याहि चक्रवर्तीची आणि सम्राटाची या आरोपातून सुटका होणे शक्य नाही. इंग्रेजांनी तरी म-हाठी साम्राज्य घशात घालताना काय अशा मोठ्या हुतुतूच्या लढाया दिल्या, तर युद्धांतील विजयाच्या निर्णयावर त्यांची या आरोपातून सुटका होते! त्यांनी तर मराठ्यांच्या घरात शेकडो कटांची पोखरण घालून, आज याला फोड उद्या त्याला बनव, परवा तिस-यालाच चवथ्याच्या उरावर घाल, अशाच घालमेली केल्या ना! मग इंग्रेजांनी म-हाठ्यांचा राजद्रोह केला, अशी भाषा का पुढे येत नाही! तर आज हिंदुस्थानांत इंग्रेजी राज्य जबरदस्त आहे. नवीन राज्ये कमविणारांवर राजद्रोहाचा आरोप करणा-या मतिमंद मूर्खांनी इतके तरी लक्षात ठेवावे की नवीन देऊळ बांधतांना जुन्या देवळाला आमूलाग्र उलथून पडावेच लागते. ब्रिटीश रक्ताच्या ब्रिटीशांनीच अमेरिकेतून ब्रिटीश सत्तेची उचलबांगडी करून नवीन संयुक्त अमेरिकन संस्थानांची स्थापना केली. मग जॉर्ज वॉशिंटन हा सुद्धा मोठा दगलबाज राजद्रोही मानला पाहिजे. नंबर २ – शिवाजीनें अफजुलखानाचा `खून’ केला. जणू काय अफजुलखान म्हणजे एकादा बावला किंवा श्रद्धानंदच! नंबर ३ – शिवाजी आग्र्याच्या बादशाही कैदेतून पळाला, म्हणून तो दगलबाज, असले हे आरोप केवळ बुद्धिभ्रष्टता अगर जातिवंत दुष्टावा यातूनच निर्माण होत असतात. राजद्रोह दगलबाजी विश्वासघात इत्यादी आरोप करणारे शहाणे स्वतःची भूमिका तर विसरतातच, पण हे आरोप कोणी कोणावर कोठे केव्हा आणि का करावे, याचा विवेकहि त्यांच्या गावी नसतो. मुसलमानांनी शिवाजी विरुद्ध हात बोटे चोळली तर त्यात काहीतरी वाजवीपणा आहे. कारण, शिवाजीने दक्षिणेतल्या मुसलमानी सत्तेच्या चांदता-यालाच आचंद्रार्क अर्धचंद्र दिला! पण इंग्रज म्हणजे न्यायाचा सागर आणि हिस्टॅरिकल परस्पेक्टिवचा आगर! त्यांनी शिवाजीवर खुनाची आणि दगलबाजीची एवढी आग का पाखडावी? असा एकसुद्धा इंग्रेज इतिहासकार आढळत नाही की ज्याने अफझुलखानाच्या वधाचा पराचा पारवा करून शिवाजीवर शिव्यांची लाखोली वाहिलेली नाही. प्रतापगडच्या मुकाबल्यात अफझुलखानाने आपल्या प्रतिज्ञेच्या संकेताप्रमाणे शिवाजीचाच कोथळा काढला असता, तर त्याविषयी निस्पृहपणाची मिजास मारणा-या इंग्रेज इतिहासकारांनी काय उद्गार काढले असते, याची कल्पनासुद्धा बरीच मनोरंजक होईल. इंग्रेज हा असा एक विलक्षण प्राणी आहे की त्याला इतरांच्या डोळ्यांतील कुसळ चटकन् दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातील मुसळ मात्र मुळीच दिसत नाही. न्यायबुद्धीची यांची घमेंड जगप्रसिंद्धच आहे; परंतु त्यात एक मख्खी आहे. आपमतलबासाठी इंग्रेजी न्याय कधि पृथ्वीइतका फुगेल, तर कधी सुईच्या डोळ्यांतून सफाईंत निसटून टाचणीच्या टोकावर तांडवनृत्य करील.

शिवाजी एक वेळ राहू द्या; बोलून चालून तो हिंदू. पण नेपोलियन बोनापार्ट तर युरपियनच ना? त्याच्या चारित्र्याचे सार काढतांना विद्यमान सुप्रसिद्ध इतिहासकार एच. जी. वेल्स आपल्या `औटलाइन्स ऑफ धी हिस्टरी ऑफ धी वर्ल्ड’ नामक महाग्रंथांत काय अक्कल पाघळतात ती पहा – It would be difficult to find a human being less likely to arouse affection. One reads in vain through the monstrous accumulations of Napoleonic literature for a single record of self forgetfulness. Laughter is one great difference between man and lower animals, one method of our brotherhood, and there is no evidence that Napoleon ever laughed. Nor can we imagine another of the most beautiful