दगलबाज शिवाजी : Page 2 of 14

बाणांचा पिसारा स्वकीयांच्याच पंखाचा होता. दारच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षां घरच्या विरोधकांशी झगडण्यातच शिवाजीच्या अर्ध्याअधिक हिंमतीचा होम करावा लागला. अशा अवस्थेतहि शक्तियुक्तिची पराकाष्ठा करून, शिवाजीने महाराष्ट्राला स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा सोहळा दाखवून, मराठ्यांना पशूवृत्तीतून माणसांत आणून बसविले. जी गोष्ट एका काळी अखिल महाराष्ट्राला अशक्य वाटत होती, आजहि जी पुन्हा अशक्य अशक्य अशक्य म्हणून परिस्थिती आम्हाला दटावून बजावीत आहे, ती नेमकी गोष्ट शिवाजीने शक्य करून दाखविली. या एकाच कारणासाठी महाराष्ट्राने शिवरायाला अखंड आठवले पाहिजे आणि तसा तो आठवीतहि आहे. परंतु, शिवरायाच्या चरित्राकडे महाराष्ट्र आज ज्या दृष्टीने पहात आहे ती आमच्या हाडीमासी भिनलेल्या अवतार-कल्पनेने आरपार बुरसटून गेलेली असल्यामुळे, शिवरायाच्या विकृत चरित्र-चित्राच्या भजनी आमची टाळकुटी भावना फुकट खर्ची पडत आहे. इतकेच नव्हे, तर त्यामुळे शिवाजीच्या राष्ट्रोद्धारक विराट व्यूहाबद्दल आम्हाला फारसा गंभीरपणाहि वाटेनासा झाला आहे.

शिवाजीचा स्वराज्योपक्रम म्हणजे ईश्वरी संकेताने आणि `समर्थांच्या’ कृपेमुळे सहजगत्या घडून आलेला एक नवलाईचा चमत्कार, इतक्या हलक्याफूल भावनेने आम्ही त्या प्रचंड प्रबोधनाकडे पहात आहो. पुराणांच्या पारायणाने पंगु बनलेल्या आमच्या मनोवृत्तीला, शिवचरित्राची कमावणि कसकसल्या भयंकर दिव्व्यातून होत गेली, याची जाणीवहि होईनाशी झालेली आहे. शिवचरित्रातील मोठमोठे प्रसंग म्हणजे बाल-कृष्णाच्या पूतनाकर्षणाप्रमाणे `ईश्वरलीला’ वाटतात. कोणत्याहि पुरुषोत्तमाच्या चारित्र्यावर एकदा का अवतार कल्पनेचा सफेदा चढला आणि त्याची सर्व लहानमोठी बरीवाईट कृत्ये `ईश्वरीलीला’ सदरात पडली की त्या चरित्रापासून आत्मोद्धारार्थ लागणारे स्पिरिट मनुष्याला केव्हाहि प्राप्त होत नसते. रामकृष्णांची उज्वल चरित्रें आज आमच्या व्यवहारांत कवडीमोल होऊन बसली आहेत, याचे तरी कारण हेच. रामविजय हरिविजय, पांडवप्रताप हे ग्रंथ म्हणे चातुर्मासांत सोवळ्याने वाचायचे आणि श्रोत्यांनी झोपांच्या डुलक्यात ऐकायचे. का? तर म्हणे तेवढेच पुण्य गाठी! मराठी महाभारत कपाटाच्या शोभेला. टिळकांचे गीतारहस्य देव घरात फक्त पूजेला. का तर टिळक म्हणे शेषशायी चतुर्भुज भगवान्! टिळकांना भगवान बनविल्याशिवाय आम्हा नादान हिंदूंच्या भाविकपणाचा भाव कसा वाढणार? जिकडे पहाल तिकडे पौराणिकी दृष्टीचा अडथळा शिवाजीचा काळ होऊन आज अडीचशे वर्षे झाली, तरी देखील त्याच्या चारित्र्याला जगाची एकमुखी मान्यता अझून मिळालेली नाही. महाराष्ट्राला तो परमेश्वरावतार वाटत असला, तरी एकट्या हिंदूशिवाय इतर सर्व जगाला तो दगलबाज, डोंगरांतला उंदीर, उपटशुंभ असाच वाटतो. पुण्यात कै. शाहू महाराज करवीरकरांनी शिवाजी मेमोरियलचा धाडशी प्रयोग केल्या दिवसापासून राज्यकर्त्या इंग्रेजी नोकरशाहीची शिवाजीविषयी भाषा किंचित नरमलेली आहे. निदान ओठांवर तरी बरीच साखर चमकते, मग पोटात काय असेल ते पोट जाणे! परंतु शिवछत्रपतीची जगमान्यता अझून जवळजवळ साशंकावस्थेतच आहे, असे कबूल केल्याशिवाय सुटका नाही. याचे कारण काय? राष्ट्रवीरांची कीर्ती जगविश्रुत करण्याची कामगिरी वास्तवीक इतिहासकारांनी करावयाची असते. परंतु आमचे म-हाठी इतिहासकार अथपासून इतिपर्यंत एकजात पुराणिक.

पौराणिकी साच्याशिवाय त्यांची विद्वत्ता कशांतही ठाकठीक बसायची नाही. प्रथम शिवाजीला ते परमेश्वराचा अवतार बनवतील, कौसल्येप्रमाणे जिजाबाईला दिल्लीपति मोंगलाच्या वधाचे डोहाळे पाडतील, तेव्हां कोठे त्यांना `शिवसंभव’ दिसायचा. थोडासा सत्याचा धागा, त्यांवर यांच्या कल्पनेच्या कोलांट्या उड्या! ना त्यांत विवेक, ना चिकित्सा, ना साक्षेप. येथून तेथून भावनावशतेचा खरकटवाडा, शक्याशक्यतेचा विचार नाही, परिस्थिती-परिक्षणाची दृष्टी नाही, फार काय पण, मानवी स्वभाव ओळखण्याचीहि अक्कल नाही. काय म्हणे. ``शिवाजी सोळा वर्षांचा झाला नाहीं तोच त्याने आडदांड लोकांची संगत धरून देशांत पुंडाई आरंभिली.’’ ही आमच्या शिवरायाच्या चरित्राची सुरुवात आणि ती क्रमिक इतिहासपुस्तकातून आमच्या मुलांना पढवायची. आडदांड लोकांची संगत धरून देशात पुंडाई आरंभणा-याला जर स्वराज्य स्थापन करता येते, तर आज गावोगावचे गुंड राष्ट्रवीर का बनत नाहीत? या सर्व दोषामुळे आमच्या जुन्या बखरी आणि सध्याचे इतिहासग्रंथ शिवाजीच्या जगमान्यतेच्या कामी नालायक ठरलेले आहेत. आमच्या लाडक्या हीरोबद्दल कोणी वाईट बोलला तर त्याच्या विधानाला समर्पक प्रत्युत्तर देण्याऐवजी आम्ही नुसत्या शिव्याश्रापांवरच आमच्या इतिहास-विषयक प्राविण्याचे प्रदर्शन करतो. नाहीतर आमचा हीरो ईश्वरावतारच असल्यामुळे त्याच्या सर्व ब-या वाईट