निवडक प्रस्तावना : Page 6 of 7

माझ्या नजरेसमोर झालेली असल्यामुळेच, मला वाटते, प्रस्तावना लिहिण्याचे काम त्यांनी माझ्याकडे सोपविले असावे.

वास्तविक प्रस्तावना लिहिण्याचा प्रघात हे सुद्धा असेच एक नादी फिसाट आहे. हवी कशाला प्रस्तावना? उत्कृष्ट छपाईच्या प्रकरणवार ग्रंथाचे घोडेमैदान अगदी हाताशी असता, ‘‘अहो, हे मैदान पहा, याची लांबी-रुंदी इतकी आहे, येथे अमुक तमुक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत,’’ हे अगदी बोट दाखवून सांगण्यात स्वारस्य ते काय? काष्ठपांचालिका म्हणजे कळसूत्री बाहुल्यांच्या खेळापासून सुरुवात करून लळितांच्या क्षेत्रांत मनोरंजनाच्या काय काय मौजा असत, त्याचे काही जुने उतारे चालू जमान्यातल्या विनोदाशीही स्पर्धा करणारे आढळतील. गोंधळ प्रकरणातील गोंधळ्यांची जुनी गाणी आजही त्या निरक्षरांच्या काव्यचातुर्याची साक्ष देतील. कलगी-तुऱ्याचा इतिहास जोशीबुवांनी अगदी हिरिरीच्या तन्मयतेने चित्रण केला आहे. तमाशा विषयावरची त्यांची माहिती वाचताना आपण किचिंत्काळ जुन्या जमान्यांतच वावरत असल्याचा भास होईल. एकनाथांच्या भारूडांवरून आजकालच्या उपहासगर्भ गद्य-पद्य-लेखकांना बुरखेबाज पण संभावित उपहास व्यक्त करण्याच्या क्षेत्रात आपण नक्की कोठे होतो, याचा पडताळा पाहता येईल. गवळणीच्या प्रांगणांत पाऊल टाकताच, तेथे श्रीकृष्ण-राधेचे दर्शन नक्कीच ठरलेले. जुन्या रसाळ शाहिरांनी राधा-कृष्णाचा रंगविलास रंगविण्यात वापरलेले आषुकमाषुक रंग, पेशवाईतल्या शाहिरांनी किती नि कसे भडक केले होते. त्याचाही मासला रसिकांना येथे भरपूर आढळेल. आधुनिक तमाशे आणि सध्याच्या शाहिरी वाङ्मयाचे स्वरूप, येथवर भरपूर उदाहरणांसह माहिती देऊन, जोशीबुवांनी मऱ्हाठी रसिकांच्या हातात एका उपेक्षित लोकरंजनी विभागाचा रसाळ नि गोड मेवा या ग्रंथान दिलेला आहे. त्याचा आबालवृद्ध रसिकजन कौतुकाने आस्वाद घेतील असा मला विश्वास वाटतो.

मुंबई २८ दि. २८ फेब्रुवारी १९६१ प्रबोधनकार ठाकरे *** संजय- प्रबोधन शाहीर-वसंतविहार प्रस्तावना गेले ६ महिनें मी स्वतः प्रतिकूल परिस्थितीशीं झगडतच, कांहीं व्यावहारीक चुकांबद्द्ल, शारिरीक मानसिक व सांपत्तिक आपत्तींचें प्रायश्चित भोगीत होतो. क्रांतीच्या या वावटळींत सांपडलों असतां, मनाची खंबीरता, वृत्तीची स्थिरता आणि शारिरीक क्लेश भोगण्याची सहनशीलता तरि अव्यंग व अभंग रहावी, म्हणून मी महाभारतांतर्गत ’विराटपर्व’ व ’उद्योगपर्व’ यांचा चिकित्सक चिंतनपूर्व स्वाध्याय करीत होतो या स्वाध्यायाचा मजवर फारच उत्तेजक परिणाम झाला. नॄशंस कौरवांच्या कारस्थानामुळें महापराक्रमी पांडवांनी १२ वर्षे दुःसह वनवास व १ वर्ष प्राणांतिक अज्ञातवास भोगतांना दाखवलेली कृष्णभक्ती, सत्यप्रीति आणि ध्येयरति माझ्या हॄदयाला केवढी प्रबोधक झाली, त्याचें वर्णन करण्याची शक्ति या लेखणींत मुळींच नाहीं. विशेषतः उद्योगपर्वात कृष्णशिष्टाईच्या वेळीं माता कुंतीनें पांडवांना धाडलेला ’प्राचीन कहाणी’ रुप दिव्य संदेश- म्हणजे देवी विदुलेनें आपल्या संजय नामक पुत्रास केलेला दिव्य उपदेश- मी वाचूं लागतांच माझी वृत्ती घटकाभर तद्रूप झाली, मनावर पोलादी कवच चढलें, ’प्रयत्न हाच परमेश्वर’ या मंत्रानें हृ फुरफुरुं लागलें, संकटांची छाया वितळूं लागली, सार्याल दुनियेचें स्वरुप बदललेलें दिसलें, आणि लहर लागेल तेव्हां माणसांच्या दैवाच्या कवट्या उलट्या सुलट्या फिरवण्यांतच आपल्या अस्तित्वाची शेखी मिरविणारे शनि मंगळादि ग्रहोपग्रह ’ प्रयत्न प्रयत्न प्रयत्न’ याच एका शब्दाचा टाहो फोडीत आहेत कीं काय , असा मला भास होऊं लागला.

ही कल्पित कादंबरी नव्हे, शब्द्लालित्याचा पसारा नव्हे, प्रिय वाचका, हा माझा जागृतावस्थेंतला प्रत्यक्ष अनुभव आहे. ’संजय-प्रबोधन’ अर्थात माता विदुलेचा संजयास दिव्य बोध, या इतिहासाला महर्षि व्यास यांनी ’जय’ ही संज्ञा दिलेली असून, किंकर्तव्यमूढ राष्ट्रानें वा व्यक्तीनें हा ’जय’ चिंतनपूर्वक वाचल्यास, म्हणजे त्यांतील प्रबोधक विचारांचा प्रत्यक्ष आचारांत परिपाक उतरविल्यास त्या राष्ट्राचा व व्यक्तिचा भागोद्य झालाच पाहिजे, अशी महर्षी व्यास मुनींची ग्वाही आहे. शाहीर वसंतविहार यांनीं माझ्या विनंतीस मान देऊन व्यासमुनींचा हा दिव्य ’जय’ मंत्र आपल्या ईश्वरदत्त वाणीनें रंगवून दिला, म्हणूनच तो मला आजच्या किंकर्तव्यमूढ महाराष्ट्रापुढें, नवमतवादी दिवंगत शाहीर ’गोविंदाग्र्ज’ यांच्या पुण्यतिथिच्या दिवशीं आत्मप्रबोधनार्थ मांडता आला. तरूण महाराष्ट्राला हा ’दिव्य जय’ जयशाली होवो, एवढीच महत्वाकांक्षा बाळगिणारा- महाराष्ट्र तरुणांचा सेवक, केशव सीताराम ठाकरे, संपादक प्रबोधन. प्रबोधन कचेरी पुणें शहर. २३ जानेवारी