निवडक प्रस्तावना : Page 5 of 7

विद्यार्थीगृहाची कल्पना अशीच एकांड्या नादांतून अवतरली. तसाच तो साताऱ्याचा भाऊराव पाटील. त्याला दलित नि मागास वर्गाच्या मुलांमुलींच्या साक्षरतेच्या नादाने अगदी वेडे केले होते. त्याच्या प्राथमिक धडपडीत मी असल्यामुळे, स्पष्टच सांगतो, त्याला त्या नादाने वेडच लावलेले होते. त्या वेडातूनच आज सातारा जिल्हा नि बहुतेक दक्षिण महाराष्ट्र या भागात शाळा-कॉलेजांच्या विस्तीर्ण शाखांचा प्रचंड वटवृक्ष निर्माण झाला आहे. मऱ्हाठ्यांचा हा नादीपणा महाराष्ट्राचे एक अमोल लेणे आहे. इतर प्रांतीयांना या नादाचे मर्म नीटसे उमगत नसल्यामुळेच, मऱ्हाठी नाद्यांनी ते छांदिष्ट, फिसाटखोर, एककल्ली आणि हट्टाग्रही समजतात. या ग्रंथाचे लेखक श्री. विनायक कृष्ण जोशी हे असेच एक नादी आहेत. मुंबई इलाख्याच्या सरकारी रिकार्ड हापिसांत नोकरी करणारे आजवर शेकडो झाले. इमाने इतबारे नोकरी करावी आणि पेन्शनीचे थालिपीठ चघळीत जगवेल तोवर जगावे, यापेक्षा फारसे कोणी इतर भानगडीत पडायचे नाहीत. व्हाईट कॉलरवाल्या पांढरपेश्यांना हवी कशाला ती तेथल्या रद्दीची चिवडाचिवड? पण जोशीबुवांचा खाक्या न्यारा. त्यांनी आपले काम सांभाळून, मुंबई इलाख्यांतील वृत्तपत्रांविषयी हाती लागेल ती माहिती संकलित करण्याचा नाद लावून घेतला. तपशिलांचे कागदच्या कागद एकटाकी एका दमात लिहून त्यांच्या जाडजूड चोपड्या बनवल्या. कितीतरी वर्षे त्यांचा हा छंद चालला होता. सेवानिवृत्त होताच त्यांनी अखिल भारतीय वृत्तपत्रांचा बारीकसारीक तपशीलवार इतिहास मराठी भाषेत लिहिण्याचा उपक्रम केला. प्रचंड बाड तयार झाले. त्याचे पुढे काय करायचे? प्रामाणिक उद्योगी लेखकांपुढे नेमका हाच त्रांगड्याचा सवाल पडत असतो. घाम गाळून खूप खूप लिहिले, पण त्याची छपाई कोण करणार आणि प्रकाशात तरी ते आणणार कोण? आजकालच्या प्रकाशकांना शालेय पुस्तकांपलीकडे पाहण्याची नजरच राहिलेली नाही. साळ्याची गाय माळ्याचे वासरू करून जोशीबुवांनी वृत्तपत्रांचा इतिहास, खंड १ला, हा साडेपाचशे पानांचा ग्रंथ छापून प्रसिद्ध केला. असल्या संशोधनी ग्रंथाला गिऱ्हाईक-वाचक किती मिळाले, कोण जाणे? पण रेसचा घोडा लावावा, तद्वत् अचानक महाराष्ट्र सरकारकडून या ग्रंथाला दोन हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.

अल्पसंतुष्ट जोशीबुवांना तेवढाच श्रमपरिहार झाल्याचे सार्थक वाटले. आजचा हा लोक-नाट्याची परंपरा ग्रंथ थेट तसाच जोशीबुवांच्या एकनिष्ठ एकतान नादीपणाची फलश्रुति आहे. आणि ग. ल. ठोकळ प्रकाशन संस्थेने तो प्रकाशित करण्याचे श्रेय घेतले, याबद्दल—जोशीबुवा तर त्यांचे आभार मानतीलच पण—मीही त्यांना धन्यवाद देतो. आजकाल सांस्कृतिक कार्यक्रमांचे उधाण बरेच आलेले आहे. त्या उधाणांत रंगणाऱ्या कितीकांना संस्कृती नि सांस्कृतिक यांचा बिनचूक अर्थ समजत उमजत असेल, कोण जाणे! वृत्तपत्रांच्या इतिहासाने चिकित्सक बुद्धीला पाणीदार धार आलेल्या जोशीबुवांनी या विषयाचा तपशीलवार इतिहास संशोधण्याचा नाद धरला. एरवी सामान्य दिसणारा हा गृहस्थ वृत्ने जसा दिलदार, तसा रंगेलही आहे. एकदा एखाद्या विषयाचा ध्यास त्यांनी घेतला, की मग ‘अहो येता जातां वदनिं वदतां घास गिळतां’ त्यांना तोच एक छंद. बारीकसारीक तपशील मिळवण्यासाठी जोशीबुवा अचानक कोठे फिरतीला जातील, कोण-कोणाच्या गाठीभेटी घेतील, पोवाड्यांची, लावण्यांची, वगांची बाडेच्या बाडे उतरून घेतील ते सांगता येणार नाही. जोशीबुवांची खोली म्हणजे अनेक विषयांवरील जीर्णजीर्ण संदर्भ ग्रंथांच्या ढिगांचा रद्दीखानाच म्हणावा लागेल. उठल्यापासून झोपेपर्यंत हा नादी संशोधक त्या ढिगाऱ्यांतच अगदी वाळवीसारखा वळवळत असायचा. मध्यंतरी त्यांनी शाहीर हैबतींचे चरित्र छापून काढले. त्याच्या शाहिरी नि आध्यात्मिक कवितांचा संग्रह मिळविला. कित्येक दिवस नि रात्र त्यांतले अध्यात्म हुडकण्यात घालविली. तज्ज्ञांपाशी चर्चा-चिकित्सा केल्या. दोनतीन वेळा हैबतीच्या गावी जाऊन त्याचा फोटो पैदा केला. प्रस्तुतची लोकनाट्याची परंपरा शोधून ताळेबंद लावण्यासाठीही जोशीबुवांनी अनेक शाहिरांच्या नि सोंगाड्यांच्या गाठीभेटी घेतल्या, तमाशे पाहिले. कै. भाऊ नारायणगावकर आणि बापू नारायणगावकर यांच्याशी कलगी-तुऱ्यांचे अध्यात्म समजावून घेण्यासाठी बरीच पायपीटही केली. याशिवाय, या विशाल विषयांवर पौर्वात्य आणि पाश्चात्य चिकित्सक पंडितांनी कोठकोठे काय काय लिहिले आहे, त्या परभाषीय संदर्भ-ग्रंथांची झाडाझडती घेतली. विचार-विनियमयाच्या नि चर्चा-चिकित्सांच्या अनेक दिव्यांतून गेल्यावरच हा लोकनाट्य-विषयक ग्रंथ तयार झालेला आहे. विविध परिश्रमांची ही परवड