निवडक प्रस्तावना : Page 4 of 7

अंतिम फलप्राप्ती. मानवतेच्या उद्धाराचे हेच एक आणि अखेरचे हुकमी पेनिसिलीन. येथेही मला त्यांचा तत्त्वनिष्ठेपेक्षा किंवा बुद्धिवादापेक्षा, त्यांचा जातिवंत कलावंतपणाच उठावदार दिसतो. गुलाबाच्या फुलाच्या आकर्षक रंगारूपावर नि त्याच्या सुगंधावरच कलावंत मोहित होतो. त्याचे काटे किंवा मुळाशी पडलेले दुर्गंधयुक्त खत यांचा तो विचारच करीत नाही.

नंजाप्पाच्या अमदानीत कैद भोगीत असताना, सोबतच्या काही खेडूत कैद्यांना माधवरावजींचे कम्युनिझमचे पुराण चुटकीसरसे मानवले आणि ते सारे एका रात्रीत पट्टीचे कम्युनिस्ट बनले! असल्या साध्यासुध्या घटनेनेही त्यांची कम्युनिझमवरची श्रद्धा बलवंत होते. सारांश माधवरावजी सत्यशोधक खरे, पण त्यांचा सत्यशोधनाचा प्रवास अजून पुरा झालेला नाही. भेटेल तो टप्प्याचा दगड त्यांना पृथ्वीच्या अंतिम सीमेचा वाटतो, काही का असेना, नव विचाराच्या प्रत्येक अवस्थेत आपली नेकी, निष्ठा आणि श्रद्धा, आचार-विचार-उच्चारांच्या उंच पातळीवर तोलून धरण्याची त्यांची शिकस्त वाखाणण्यासारखी नाही, असे मी तरी म्हणणार नाही. हे पुस्तक वाचताना जागोजाग माधवरावांचा कलावंतपणा वाचकांना ‘भले भलें’ म्हणायला लावील, आधी त्यांची बालबोध भाषाशैली हेच मोठे आकर्षण. ते जसे बोलतात, तसेच लिहितात. त्यामुळे पुस्तक वाचीत असतानाही जणू काय ते अगदी आपल्या शेजारी बसून आपल्या हालअपेष्टांची, विचाराच्या दुभंगणीची, मनाच्या कालवाकालवीची, उत्तेजनाची नि उल्हासाची वर्णने गुलगुल तळमळीने आपल्याला सांगत आहेत, असाच भास होतो. प्रचारासाठी उभा महाराष्ट्र पायदळी घातला. कोकणात गेले असताना तेथल्या निसर्गाची त्यांनी या पुस्तकात काढलेली शब्दचित्रें वाचकांना अलगद उचलून नेमके त्या जागी ठेवतील इतकी सहजसुंदर आणि ठसकेदार वठली आहेत. मऱ्हाठ्यांच्या मायबोलीचे अलीकडे संस्कृतनिष्ठ सावरकरी बामणांनी चालवलेले वस्त्रहरण पाहून, पुण्याच्या ब्राह्मणाची भाषा ही मऱ्हाठी भाषाच नव्हे, असा डॉ. जयकर यांनी दिलेला निवाडा माधवरावजींना-माझ्याप्रमाणेच-बिलकूल शिरसावंद्य आहे.

अल्पशिक्षित अथवा अडाणी बहुजनसमाजाला चटकन समजेल अशीच आमच्या मायबोलीची रचना आहे आणि माधवरावजींनी ती फार कसोशीने कामवलेली आहे, याबद्दल त्यांचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच. अनेक पांढरपेशे सोबती माधवरावजींच्या स्नेहीवर्तुळात आले, आज येथे एकही उभा नाही. सगळे आले तसे गेले. या घटनेतला का? अझून त्यांना उमगलेला दिसत नाही. इतके असूनही त्यांनी माझ्यासारख्या एका पांढरपेश्याला या पुस्तकाविषयी समालोचन म्हणा, अभिप्राय म्हणा, काय वाटते ते लिहून पाठवण्याची विनंती केली, यालाच मी दिलदारी (स्पोर्टमनशिप्) म्हणतो. आणि ती माधवरावांत भरपूर आहे. ते कोणीही असले अथवा उद्या झाले, तरी त्यांची दिलदाल वृत्ती हेच अखेर त्यांच्या जीवनाचे अभेद्य कवच ठरणार आहे. माधवरावजी आता साठीच्या घरात आले आहेत. माझेही वयमान आता अस्ताकडे कलंडलेले आहे. बागल घराण्याचा नि माझा स्नेहसंबंध त्यांच्या दिवंगत थोर वडिलांनी जोडलेला आहे. चारही (अरेरे, आता तीनच!) बागल बंधूंचे माझ्यावर अकृत्रिम आदराचे प्रेम आहे. माधवरावासारख्या क्रांतिकर्मा स्नेह्याच्या चरित्र चारित्र्याबद्दल मला काय वाटते, ते या पुस्तकाच्या समालोचनाच्या निमित्ताने व्यक्त करण्याची आयती चालून आलेली संधी मी का म्हणून दवडावी? आत्मवृत्ताच्या निमित्ताने माधवराव बागलांनी लिहिलेल्या करवीरच्या आणि महाराष्ट्रातील बहुजनांच्या आत्मोद्धारी चळवळीचा हा बोलका इतिहास भारतीय इतिहासाच्या दालनात सन्मानिला जावो, हीच इच्छा. मुंबई २८ शुक्रवार १ ता. जाने. १९५४ केशव सीताराम ठाकरे *** ग्रंथ आणि ग्रंथकार महाराष्ट्र नादी लोकांचा देश आहे. कोण कोणत्या विषयाचा नादी बनेल आणि तो नाद पुरा करण्यासाठी चक्क एकांड्या शिलेदारीने आपली हयात एक तर बरबाद करील, किंवा त्यांतूनच एखादी विशाल लोकहितवादी संस्था निर्माण करील, याचा नेम सांगता येणार नाही. कै. अंताजीपंत काळे यांनी पैसाफंडाचे नादी फिसाट काढले; त्यासाठी फकिरी पत्करली. पण अखेर स्वतःचे जरी काही पिवळे ढवळे केले नाही, तरी महाराष्ट्राला एक नामवंत औद्योगिक संस्था बहाल केली.

इतिहासाचार्य राजवाडे त्याच नादी नादांतले. त्यांच्या इतिहास-संशोधनी नादाने महाराष्ट्रातल्या मऱ्हाठ्यांच्या भूतकालाल त्यांनी चिरंजीव केली. ते विष्णुबोवा ब्रह्मचारी. बस्स, वैदिक धर्माभिमानाच्या आत्यंतिक नादाने त्यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांना सळो का पळो करून, त्यांच्या बाटवाबाटवीच्या प्रलयाला टाचेखाली दाबले. पुण्याच्या अनाथ