निवडक प्रस्तावना : Page 3 of 7

प्रामाणिकपणाने ते इतरांशी वागतात आणि इतरांनीही आपल्याशी असेच वागावे अशी भाबडी अपेक्षा करतात. तत्त्वनिष्ठेच्या या स्थित्यंतरातून जाताना, त्यांना माणसांची पारख करता येत नाही, हा त्यांच्या स्वभावातला दोष तेही कबूल करतात. या एकाच दोषामुळे त्यांनी भलभलत्या टग्यांच्या गळ्यांना मिठ्या मारून त्यांच्या दिलदारीवर विसंबून ठेवलेली आपली मान कापून घेतली आणि कित्येक स्पष्टवक्त्या निस्पृहांना मतभेदाच्या मुद्यावर त्यांनी नजरेआड केले.

जनहितासाठी त्यांनी कोल्हापुरी कैदखान्याच्या यमपुरीचा नरकवास भोगला, तळहातावर शीर घेऊन अनेक वेळा ते शस्त्रसज्ज शिपायांच्या पलटणीपुढे मर्दाच्या छातीने ताठ उभे राहिले. अधिकाऱ्यांनाही समोरासमोर स्पष्टोक्तीच्या तडाक्यांनी वंगवायला बाचकले नाहीत. लोकमत-जागृतीसाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानचसे काय, उभा महाराष्ट्र पायदळी घातला आणि हजारांच्या वर ३-३ ताशीं व्याख्याने झोडली. अखेर तो इच्छित क्षण जवळ आला. छत्रपतींनी रयतेला लोकमतानुवर्ति स्वराज्य दिले आणि माधवरावांना मंत्रिमंडळ बनवायला सांगितले. कोल्हापूरच्या रियासतीत माधवराव करतील ते कारण आणि बांधतील ते तोरण, हे ऐश्वर्य लाभले. तेथेही त्यांना माणूस-पारखणीच्या आपल्या कमकुवतपणाचा कटु अनुभव घ्यावा लागला. तथापि मंत्रिमंडळ कामाला लागले, पण माधवराव बाजूला उभे राहून फक्त नियंत्रण करू लागले. ती त्यांची भूमिका गौरवास्पद म्हणून अखिल महाराष्ट्राच्या अभिनंदनाला पात्र झाली. स्वतःच्या मानपानासाठी किंवा सत्तेसाठी नव्हे, तर जनतेलाच सत्ताधारी बनवण्यासाठी ते पाव तपाचा लोखंड चणे खाण्याचा उद्योग मी केला, हेच त्यांना हडसून खडसून लोकांना दाखवायचे होते. स्वतः माधवराव कितीही निरीच्छ आणि निस्पृह असले तरी सत्ताप्राप्तीच्या दरवड्यात ज्यांचा जेजुरी-एळकोट फसला गेला, असे काही त्यांचे ‘जानीदोस्त’ त्यांना खाली ओढण्याच्या खटपटीत होते. गांधी-वधानंतर झालेल्या जाळपोळीचे निमित्त घडले. वैऱ्यांना हवी होती ती संधी सापडली. त्यांनी सत्ताधारी काँग्रेसच्या छावणीत चहाडखोरपणाचा भुंगा नि पिंगा घातला. झाले, बागल मिनिस्ट्री बरखास्त झाली. छत्रपतींनी कारभाऱ्यांच्या हातात कारभार दिला. एकेक कारभारी मोठे डोकेबाज आले. त्यांनी पुन्हा बागलकंपूला छळायला छेडायला सुरुवात केली. कैदखानाही लाभला. अपमान दुरुत्तरांचे हार गळ्यात पडले. पुन्हा माधवराव कोल्हापुरात कोणीच कोठे नव्हते, असे झाले. पण त्यांच्या अस्तनीतल्या निखाऱ्यांचे तेवढ्यानेही समाधान होणारे नव्हते. त्यांनी माधवरावांना तर खोल खड्यात गाडलाच, पण अखेर राजवटही विलीनीकरणाच्या होळीत जाळून तिची राख केली.

स्वतःच्या अधःपतनाबद्दल माधवरावांना तसे म्हटले तर वाईट वाटण्याचे कारण काहीच नव्हते. परिस्थितीने, अथवा नियतीने म्हणा वाटेल तर, त्यांना सर्वाधिकारी केले, आणि नियतीनेच त्यांना खाली ढकलून दिले. पण काही झाले तरी कोल्हापूर संस्थान खालसा होत कामा नये, ही त्यांची मनिषा वैरियांनी मातीमोल केली, हा खटका पाठीतल्या जंबियाच्या वारासारखा त्यांना आजही दुःखीकष्टी करीत असला पाहिजे. होतो कोण, झालो कोण आणि आता कोठे आहे, याचे पायाशुद्ध आत्मचिंतन माधवरावांनी या पुस्तकांत भरपूर केल्याचे दिसते. ‘जितले सांगावे जनाला नि हरले सांगावे मनाला,’ हा संभावीत विवेकही त्यांना नापसंत, इतका मनमोकळेपण त्यांनी या आत्मनिरीक्षणात दाखविला आहे. सत्यसमाजाची मठी का सोडली? ब्राह्मणेतर म्हणजे शेतकरी कामकरी संघटनेचे कार्य अर्धवटच टाकून, काँग्रेझी गण्डेबाजी का पत्करली? तेथे काय अनुभव घेतला? महात्मा गांधींच्या प्राणांतिक उपवासांच्या प्रयोगाची कसली फलश्रुति होते? काँग्रेसमध्ये कसकसल्या रंगांच्या शिडकाव्याचे लोक घुसलेले आहेत? त्यांची नेकी किती आणि एकी किती? अशा अनेक तत्त्वांच्या मंथनातून माधवरावजींनी पुष्कळच नवनीत काढलेले दिसते. काँग्रेसमध्ये घुसताना त्यांना सत्यसमाज आणि बामणेतरी संघटना ही वेडी खुळे वाटली. काँग्रेसला रामराम ठोकून बाहेर पडल्यावर, शेतकरी कामकरी पक्षाच्या खटाटोपाने ते आणि त्यांचे समदुःखी दोस्त आता तेच पहिले पंचावन पाढे घोकताहेत. या घोकणीत एक नवा मसाला आहे. त्यांचा भावनाप्रधान विश्वास सध्या सोवियत रशियाप्रणित कम्युनिझमवर खिळलेला आहे. एका काळी मानवतेच्या यच्चयावत दुःख-क्लेश-निरसनार्थ महात्मा गांधींचा सत्याग्रही नि आत्मक्लेशी तोडगा आणि काँग्रेसचे गंडाबंधन हा एकुलता एकच उपाय, हा जो त्यांचा हट्टाग्रही दावा होता, नेमका तोच आज कम्युनिझमविषयी आहे. मार्क्सवाद म्हणजे माधवराव बागलांची चालू घडीची गीता. त्यांच्या सत्यशोधनाची