निवडक प्रस्तावना : Page 2 of 7

यथाशक्ति किती कसोशीने त्याने पार पाडली, हरएक बऱ्या वाईट मुकाबल्याला तत्त्वनिष्ठेने कसे तोंड दिले, लोकांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराला स्वतःच आग कशी घातली, त्यांचे जन्मप्राप्त सुखासीन श्रीमंतीचे विलासी जीवन कोल्हापुरी कैदखान्याच्या यमपुरीत किती कठोरतेने चेचले ठेचले गेले, मित्र अमित्र कुमित्रादिकांना त्यांच्या प्रामाणिक तत्त्वनिष्ठेचे विपर्यासी अर्थानी कसे जाहीर धिंडवडे वाजवले, आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या त्या धडाडलेल्या यज्ञकुंडात या प्रमुख नेत्याच्या देहमनाचे होळकुकडे होत असता, खुद्द कोल्हापुरात आणि आसपासच्या महाराष्ट्रात मतलबी राजकारणांचे ढोंगधत्तुरें जनतेच्या लोकशाही महत्त्वाकांक्षांची जागोजाग कसकसे मुस्कटदाबणी करीत होते, हा सगळ् कथासंग्रह या पुस्तकांत ताळेबंद वाचायला मिळतो. भारतीय स्वातंत्र्याचा नि लोकशाही झगड्याचा इतिहास मध्यवर्ती सरकार लिहवीत आहे म्हणतात.

माधवरावांच्या या चित्तवेधक नि रसाळ सत्यनिरुपणाला त्यात एखादा तरी मानाचा कोपरा अगत्य लाभला पाहिजे. कारण बागलांचा मूळ स्वातंत्र्यवादी झगडा जरी कोल्हापूर दरबारशी चालू झाला, तरी क्रमशः त्याला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले आणि माधवरावजी संस्थानांत आणि संस्थानाबाहेर दलित जनतेचे बोलके प्रतिनिधि म्हणून उभ्या महाराष्ट्रात चमकू लागले. माधवरावांचा पिण्ड मूळचा जातिवंत चित्रकाराचा. हातात सदान् कदा पाणरंगाची पेटी नि ब्रशांचे बंडल हा असामी निसर्गाची जिवंत प्रतिबिंबे कागदांवर उमटविण्यात अखंड रममाण. ते पट्टीचे निसर्ग चित्रकार. त्यांची कित्येक रंगकामे पाहिली की. ‘The canvass glowed beyond even Nature’s warmth’ हा ऑलिव्हर गोल्डस्मिथचा साक्षात्कार आजही प्रेक्षकांना घेता येतो. निसर्गाच्याच दर्याचा अखंड नि आकंठ आस्वाद घेण्यात कलाधुंद असणारा हा कलावंत कधी-काळी राजकारणी कटकटींचा म्होरक्या म्हणून तलम रेशमी मखमली वस्त्रप्रावरणांतून धडाड कैदखान्याच्या खरखरीत गोणपाट घोंगडीचा आणि लोखंडी कड्याबेड्यांचा सक्तमजुरी कैदी होईल, असे एकाद्या ज्योतिषाने भविष्य वर्तविले असते,तर तोही मूर्ख ठरला असता. मग हे असे कसे झाले? माधवरावांचा पिंडच जात्या तीव्र भावनावशतेचा आहे. निसर्गातल्या गुढांशी एकतानेनं चटकन रमणाऱ्या या कलावंताला आजूबाजूच्या मानवतेच्या सुख-दुःखांच्या, आशा-आकांक्षांच्या आणि हालअपेष्टांच्या वेदना आणि संवेदना टोचू बोचू लागताच, त्याने ब्रशांच्या बदला कलमाची तलवार उपसली आणि पाणरंगाच्या पेटीच्या जागी वाग्शैलीचा तोफखाना चालू केला. चित्रकार माधवराव कलम-वाग्बहादूर लोकनेता पत्रकार बनला. दरी, डोंगर, वृक्ष, नदी-नाले, किल्ले, मंदिराचे तपशील आपल्या हुकमी कुंचल्याने चित्रित करणारा हा भावनाप्रधान कलाकार, जनतेच्या हृदयात खवळणाऱ्या आधीव्याधी, हालअपेष्टा आणि सत्ताधीशांचे अनेकमुखी जुलूम यांची तपशीलवार शब्दचित्रें आपल्या बाल-बोध भाषाशैलीने रेखाटू लागला. पाणरंगांच्या चित्रांसाठी मन मानेल त्या धुरोळ्यात अथवा टेकाडावर चित्रसमाधीची बैठक मारणारा, आता कोल्हापूर राजधानीतल्या जाहीर व्यासपीठांवर धीट उभा राहून राज्यकर्ता छत्रपति आणि त्यांचे पोटभरू कारभारी नि मसलतगार यांच्यावर वाग्शरांचा मारा करू लागला.

जनतेच्या बऱ्या वाईट जीवनाशी तो एकतान तन्मय झाला. पण दरबारी जनाला तो वैऱ्यासारखा वाटू लागला. गारगोटीवर चकमक झाडणाराच तोवर कोणी नव्हता. तो आता समोर उभा ठाकल्यावर मग हे काय? झाली, ठिणगी शिलगली आणि दरबार आणि माधवराव बागल यांच्या झकाझकी नि चकमका सारख्या झडू लागल्या. त्या कशा, याचा इतिहास वाचकांनी या पुस्तकांतच पाहावा. माधवराव बागलांची वृत्ती सत्यशोधकाची आहे. जो जो नवा विचार, नवे तत्त्व किंवा सिद्धांत त्यांच्या वाचनात अथवा श्रवणात येतात त्यांवर ते पतंगी झांप टाकून समरस होतात. अखेर सत्य सत्य जे काय म्हणतात ते आता माझ्या हातात गवसले, अशा समजुतीने ते त्या नव्या तत्त्वाचा इतका तल्लीनतेने, प्रामाणिकपणाने आणि हिरीरीने पुरस्कार नि प्रचार करतात की विरोधकाचा सुस्काराही मग त्यांना सहन होत नाही. पुन्हा काही नवीन दिसले, की स्वारीने मारली उडी त्यावर. या प्रकृतीस्वभावामुळे, त्यांनी सत्यसमाज, काँग्रेस आणि आता मार्क्सवादाचा कम्युनिझम असे तत्त्वनिष्ठेचे थारेपालट केलेले आहेत. वरवर विचार करणाऱांना हा बुडबदलेपणा म्हणजे मनाचा थिल्लरपणा वाटणे साहजिक आहे. पण येथेही माधवरावांची निर्मळ भावना, त्या त्या काळापुरती का होईना, पण नेकीच्या बैठकीपासून च्युत होत नाही. ते स्वतःशी जितक्या प्रामाणिकपणाने वागतात, तितक्याच