निवडक प्रस्तावना

प्रबोधनकारांचा व्यासंग फारच मोठा. बुकबाजीचा त्यांचा नाद प्रसिद्ध. त्यांच्या साहित्याच्या पानापानावर त्याची साक्ष आहे. वाचलेल्या पुस्तकांवर त्यांनी प्रबोधनमधे सातत्याने लिहिलं. कलमबहाद्दरांस शेलापागोटे असं त्यांच्या पुस्तक परीक्षणाचं नाव होतं. त्यातील काही निवडक लेखांचं पुस्तक आल्याचे अस्पष्ट संदर्भ काही ठिकाणी आढळतात. त्यांनी काही पुस्तकांना अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही लिहिल्या आहेत. त्यातील आम्हाला सापडलेल्या चार पुस्तकांच्या या प्रस्तावना.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील प्रबोधनकारांचे सहकारी भाई माधवराव बागल यांच्या जीवनप्रवाह या आत्मचरित्राला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना महत्त्वाची आहे. तसेच विनायक जोशी यांच्या लोकनाट्याची परंपरा या पुस्तकाची प्रस्तावनाही अभ्यासपूर्ण आहे. सोबतच संजय प्रबोधन आणि काव्य लीला या काव्यसंग्रहांच्या प्रस्तावनाही सोबत आहेत. मला काय वाटले प्रबोधनकार ठाकरे प्रस्तुत पुस्तकाचा तोंडवळा जरी आत्मवृत्ताचा असला तरी वास्तविक तो एक चालू घडीचा राजकारणी, समाजकारणी इतिहास आहे. गेल्या २५-३० वर्षांचा तो कोल्हापूर संस्थानचा जिवंत इतिहास श्री. बागलांनी जिवंतवाणीने सांगितला आहे. जुन्या इतिहास बखरीची भाषा ‘अप्रत्यक्ष’ तर या इतिहासाची भाषा ‘प्रत्यक्ष’. छत्रपति शिवाजीमहाराजांची अगदी पहिली जुन्यातली जुनी सभासदाची बखर घेतली, तरी ती राजारामाच्या अमदानीत म्हणजे तिसऱ्या पिढीत लिहिलेली. तीसुद्धा लेखकाने केवळ आठवणीच्या भांडवलावर आणि पौराणिकी थाटाने. तीत शिवशाहीविषयी भक्तिभाव असला, तरी जागती ज्योत आत्मीयता आढळायची नाही.

पण बागलांचा हा इतिहास म्हणजे लेखकाने प्रत्यक्ष अनुभवलेल्या, पाहिलेल्या आणि स्वतःच घडवलेल्या नि बिघडवलेल्या शेकडो घटनांचा क्रमवार बोलका चित्रपटच म्हटला तरी चालेल. त्यातील अनेक रोमांचकारी घटनांचे साद नि पडसाद त्या त्या घडीला पाहून ऐकून नि वाचून भारावलेली, चिडलेली, संतापलेली, व्याकूळ अथवा हर्षभरित झालेली जनता आज महाराष्ट्रांत हयात आहे. हेन्री फोर्ड इतिहासाला ‘वारेमाप गप्पांचा गाथागोंधळ’ म्हणतात आणि ‘इतिहास म्हणजे बहुसंख्य (बावळट) लोकांनी मान्यता दिलेल्या कल्पित कथांचे भारूड.’ हा नेपोलियन बोनापार्टचा अभिप्राय. पण तसला काही आरोप या पुस्तकाला चुकूनही कोणाला लावता येणार नाही. अथपासून इतिपर्यंत हे सत्य घटनांचे सत्य कथन आहे आणि त्याचे साक्षीदार सर्वत्र हयात आहेत. तसे म्हटले तर कोल्हापूरचा साराच इतिहास शेकडो विचित्र घटनांनी भरगच्च उफळलेला आहे. कितीतरी भयंकर चित्तविदारक आणि प्रक्षोभकारक घटना पूर्वीच्या काळी घडल्या. त्यांच्या सत्यनिरूपणाविषयी संशोधक आणि रसग्राहक आजही तान्हलेले आहेत. पण त्यांची ती तहान भागवायची कोणी नि कशी? संस्थानाचा सारा प्राचीन (नि अर्वाचीनसुद्धा) दप्तरखाना मि. पेरी कारभाऱ्याच्या अमदानीत म्हणे प्रचंड होळी करून जाळण्यात आला. तमाम मऱ्हाठी जनतेच्या हृदयमंदिरात चिरंजीव बसलेल्या छत्रपति शाहू महाराजांच्या शतमुखी लोकोद्धारपी चळवळींचा तपशीलवार इतिहास तरी कोठे आहे? प्रो. लठ्ठे यांच्या-इंग्रजी मऱ्हाठी – दोन लठ्ठ बाडांत शाहू छत्रपति वावारताना दिसले, तरी जनतेने त्याना तसे पाहिले नि ते जनतेला दिसले, ते शाहू महाराज त्यात कोठेही नाहीत. ही जर अगदी अलिकडच्या काळातली अवस्था, तर बर्वेशाहीच्या कुटिल कारस्थानांना हकनाहक बळी पडलेल्या आणि अहमदनगरच्या अंधारकोठडीत एका गोऱ्या गब्रूच्या भालाफेकीत खून झालेल्या दुर्दैवी तरुण शिवाजी छत्रपतीची करुण कहाणीची कथा कालोदरात आता कायमचीच गडप झाली नव्हे का? पण माधवरावांच्या या पुस्तकांची किंमत पार निराळी आहे.

सन १९३८ पासून तो आजदीनतागायतचा करवीरचा राजकारणी, समाजकारणी, धर्मकारणी-प्रामुख्याने स्वातंत्र्यप्राप्तीचा-इतिहास जसजसा घडत आणि बिघडत गेला, त्यांचे तपशीलवार कथन यात आहे. लेखकांची भूमकाही त्रयस्थाची नाही. पंडिताची नाही अथवा संशोधनकाची नाही. त्या इतिहासाचे नाटक भरघोस रंगत असताना, तो प्रत्यक्ष रंगभूमीवर एक जबाबदार नेता नट म्हणून नाचला आहे, जाचला नि ठेचला गेला आहे, कधी गौरविला गेला तर कधी धिःकारला गेला, कधी कुरवाळला गेला तर पुष्कळ वेळा मुरगाळला गेला. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतरचे कोल्हापुरी दरबारचे राजकारण आणि त्याला जनतेचा होत असेला विरोध, म्हणजे अमेरिकन क्लू क्लक्स क्लान चित्रपटांतल्या घिसाडघाई धावपळीचा नि कारस्थानी धाडसांचा एक नमुनाच म्हटले तरी चालेल. त्यात लेखकाला विरोधकाची लोकहितवादी भूमिका घ्यायला परिस्थितीनेच खेचून नेले. ती भूमिका यथामति,