निवडक प्रबोधन: Page 9 of 26

परदेशी गो-यांच्या लष्करी चढाईचा मुलाजा चालू देण्याइतक्या त्या नादान आणि बेसावध खास नव्हत्या. अर्थात ‘हिंदुस्थान आम्ही तलवारीच्या जोरावर जिंकले आणि तलवारीच्या जोरावरच आम्ही ते आचंद्रार्क टिकविणार’ ही आधुनिक इंग्रेजी मुत्सद्यांची मुक्ताफळे, त्यांच्या दगलबाज राजकारणाला कितीही शोभून दिसली, तरी ती ऐतिहासिक सत्याचा खून करणारी आहेत. मुसलमानांप्रमाणे इंग्रेजांनी तलवारीच्या जोरावर हिंदुस्थान मुळी जिंकलेलेच नाही. इंग्रेजांच्या पराक्रमांच्या इतिहासात तलवारीला कोठेही मोठेसे महत्त्वच नाही. तलवारीच्या पात्यावरच इंग्रेजांच्या राजकारणी वर्चस्वाची मदार असती, तर नेपोलियन बोनापार्टाच्या क्षात्र चारित्र्याचा कोंब त्यांनी गर्भातल्या गर्भात ठेचला असता. वॉटरलूच्या युद्धात नेपोलियन हतप्रभ झाला, तो इंग्रेज तलवारीने नव्हे. नेपोलियन इंग्रेजांच्या तलवारीला बळी पडला नाही, तो त्यांच्या राजकारणाला बळी पडला. तो त्यांच्या क्षात्र तेजाने दिपला नाही, तो इंग्रेजी राजकारणाने शिजवून तयार केलेल्या स्वतःच्या फ्रेंच सेनापतीच्या राष्ट्रद्रोहाला बळी पडला. गेले युरोपियन महायुद्ध सुद्धा इंग्रेजांनी तलवारीच्या जोरावर जिंकले नाही. ते त्यांनी आपल्या राजकारणी बुद्धिबळावर जिंकले. इंग्रेज लोक क्षत्रिय नव्हेत. ते वैश्य, बनिये आहेत. शक्तीपेक्षा युक्तीवर त्यांची मोठी मदार. इंग्रेज तलवार म्हणजे युक्ती, कारस्थानी जंतरमंतर. याच्यात प्रभावाने हिंदुस्थानच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा होम झाला. इंग्रेज वैश्यांच्या युक्तीपुढे आज हरएक शक्ती फोल ठरत असताना ‘हिंदुस्थान आम्ही तलवारीच्या जोरावर जिंकले’ ही आंग्रेजोक्ती त्यांच्या आंग्लभाषा प्राविण्याचे आणि शेक्सपीरियन काव्यकल्पनापटुत्वाचे गोरे चिन्ह मानण्यापलीकडे, ऐतिहासिक पुराव्यांपुढे त्याल कसलीही किंमत देता येत नाही. ‘Justice for India’ (हिंदुस्थानासाठी न्यायाची मागणी) या मथळ्याखाली लॉर्ड पामर्स्टन (हिंदुस्थानाचे एक स्टेट सेक्रेटरी) यांना A Plain Speaker - ‘स्पष्टवक्ता’ (बहुतकरून हे डॉ. कान्ग्रीव्हच असावे) या सहीने एक लांबलचक अनावृत्त पत्र पाठविले होते. त्यात ‘‘We conquered her (India) as the Spainiards conquered Mexixo and Peru, with the same cupidity and eagerness for aggrandizement, with the same treachery, and almost with the same inhumanity………. Assuredl we did not conquer Indian to make its people happy.’’ [भावार्थ – स्पॅनियार्ड लोकांनी मेक्सिको आणि पेरू जिंकण्यासाठी आशाळभूतपणा, अरेरावी गाजविण्याची हाव, घातपात आणि राक्षसी वृत्ती इत्यादी ज्या साधनांचा उपयोग केला, तीच हिंदुस्थान जिंकताना आम्ही वापरली.......... तद्देशीय लोकांना सुखी करण्यासाठी हिंदुस्थाना देश आम्ही खास जिंकलेला नाही.] असा स्पष्ट खुलासा केलेला आहे. हिंदुस्थान तलवारीच्या जोरावर इंग्रेजांनी जिंकला, या कल्पित कादंबरीवर किंवा बाजरगप्पेवर अंधविश्वास टाकणा-यांच्या अकलेला सर जॉन मालकम यांनी स्पष्ट खुलाशाची फोडणी देऊन ठेवलेली आहे. ते म्हणतात, ‘‘जबरदस्तीच्या जोरावर हिंदुस्थानच्या किना-यावर पाऊल ठेवण्याच्या प्रयत्नांना प्रतिकाराची कचकचीत थप्पड मिळाल्याशिवाय केव्हाही राहिली नसती. (पाश्चिमात्य गोरे) व्यापारी हिंदी लोकांना निष्कपटी (Unpretending) आणि सरळ व्यवहारी असे भासल्यामुळेच त्यांना येथे आसरा व उत्तेजन मिळाले. पण पुढे आपापल्या वसाहती व मालमत्ता लुटफाटीपासून संरक्षण करण्यासाठी जेव्हा त्या गो-या व्यापा-यांना वेळीवेळी प्रतिकाराच्या अस्तन्या वर सारण्याचे प्रसंग येत गेले, तेव्हा तागडीच्या बहाद्दरीप्रमाणेच त्यांची तलवार-बहाद्दरी जबरदस्त असल्याचे पाहून, मोठमोठ्या हिंदी राजांना, मत्सर वाटण्यापेक्षा, त्यांच्याबद्दल कौतुकच वाटू लागले. याचा परिणाम असा झाला की हिंदी राजे त्यांच्याशी सलोखा करू लागले, आणि परस्परांच्या भांडणांत या गो-या व्यापा-यांची मदत मिळविण्यासाठी धडपडू लागले.’’ [Polititcal History of India, p. 2.] हिंदी लोकांच्या सहकार्याशिवाय क्रिस्ती बनियांना हिंदुस्थानात आपली कसलीही सत्ता स्थापन करता येणे शक्य नाही, हा सिद्धन्त प्रथम फ्रेंचाच्या डुपलीने शोधून काढला. डुपली मोठा कुशाग्र बुद्धीचा मनुष्य. पाश्चिमात्य राष्ट्रांतील लोकांप्रमाणे, हिंदी लोकात राष्ट्रधर्म, राष्ट्राभिमान म्हणजे पेट्रिऑटिझम् या गुणाचा खडखडाट आहे, हे महत्त्वाचे मर्म डुपलीनेच प्रथम ओळखले. सा-या लोकांत समाजात आणि जातीत बेकीचा महारोग जबरदस्त फैलावलेला. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. अशा अवस्थेत एक समाज दुस-याच्या अंगावर छूः म्हणून घालायचे काम या परदेशी गो-यांना मुळीच कठीण गेले नाही. दोघांचा तंटा लावून दिल्याशिवाय तिस-या त्रयस्थाला किंवा तटस्थाला आपली