निवडक प्रबोधन: Page 8 of 26

परिणामावरून पाहता ही खात्री साधार होती.’’ ‘‘येथे एक अनुषंगिक प्रश्न असा निघतो की, टोपीवाल्यांकडून कारीगार बंदुका, तोफा व दारूगोळा जो शहाजी घेई, तो त्याने महाराष्ट्रात त्या बरहुकूम बनविण्याची व्यवस्था का केली नाही? अथवा शहाजीचा मुलगा शिवाजी त्याने तरी का केली नाही? किंबहुना बाजीराव बल्लाळ, बाळाजी बाजीराव, नाना फडणीस ह्या गृहस्थांनी का केली नाही? उत्तम हत्यारांकरिता दुस-यांचे मिंधे राहण्याची लज्जा यांना कशी वाटली नाही? प्रश्नाला उत्तर एकच आहे व ते अगदी साधे आहे. ते हे की उत्तम रेखीव व नेमके हत्यार बनविण्याची कला पैदा होण्यास शास्त्रीय ज्ञानाची जी पूर्वतयारी राष्ट्रांत व्हावी लागते. ती त्या काली महाराष्ट्रात नव्हती. शहाजीच्या हयातीत युरोपात डकार्ट बेकन इत्यादी विचारवंत सृष्टपदार्थसंशोधनकार्याचे वाली ज्यारीने पंचभूतांचा शोध लावण्यास लोकांना प्रोत्साहित करीत होते; आणि आपल्या इकडे एकनाथ, तुकाराम, दासोपंत निपटनिरंजन इत्यादी संत पंचभूतांना मारून ब्रह्मसाक्षात्कारात राष्ट्राला नेऊन मुक्त करण्याच्या खटपटीत होते. अशांना स्क्रू, टाचणी, बंदूक व तोफा यांचा विचार वमनप्राय वाटल्यास त्यात नवल कसचे? थोडक्यात आगस्ट कोंट यांच्या भाषेत सांगावयाचे म्हणजे महाराष्ट्र त्या काळी Metaphysical अवस्थेत होते आणि Positive अवस्थेत येण्यास त्याला अद्याप पाचशे वर्षे अवकाश होता. म्हणजे शके २०००च्या सुमारास महाराष्ट्र Positive बनणार होते. अशा अवस्थेत आपल्याला बनविता येत नाहीत ती श्रेष्ठ हत्यारे दुस-यांकडून विकत घेण्याखेरीज शहाजीला गत्यंतर नव्हते. सध्या महंमद आफ्रिडी चित्रळी अफगाण इराणी इत्यादी अर्ध सुधारलेल्या लोकांची जी अवस्था आहे, तीच आपली शहाजीच्या काळी होती. उत्तम जर्मन, फ्रेंच किंवा रशियन बंदुक घेऊन जो आफ्रिडी माणूस चो-या दरवडे व हल्ले करतो, त्याहून शहाजीकालीन मराठा जास्त सुधारलेला होता हे खरे. परंतु शस्त्रांकरिता तो युरोपियनांच्या आफ्रिडीच्या इतकाच परावलंबी होता. ह्या परावलंबित्वाचा अर्थ शहाजीच्या काली कोणाच्या लक्षात कितपत आला असेल, ते सांगण्यास साधन नाही. परंतु विष जे आहे ते जाणून खा की नेणून खा, आपला अंमल केल्याशिवाय जसे रहात नाही, तसेच ज्याचे हत्यार त्याचे राज्य हा नियम – कोणाला समजो की न समजो – आपले कार्य केल्याशिवाय राहात नाही. अर्थात मूळ हत्यार तयार करणारे जे फिरंगी, फ्रेंच, डच किंवा इंग्रज वगैरे युरोपियन त्यांना राज्य कमावून देण्याकरिता न जाणतेपणे शहाजी जिवापाड मेहनत करीत होता असा अर्थ झाला. आणि हा अर्थ शहाजी व त्याचे ब्राह्मण मुत्सद्दी यांच्या लक्ष्यांत यावा तसा नव्हे, तर मुळीच आला नाही. ज्या दिवशी व्हास्कोने कालीकतच्या चामुरीच्या थोबाडीत मारली, तोच हिंदुस्थानचे साम्राज्य युरोपियनाच्या हातात जाऊ लागण्याचा पहिला दिवस होय. मूठभर फिरंगी लोकांनी एका हिंदू राजाला पहिले छूट कुंठित करावे असे त्यांच्या जवळ कोणते बरे सामर्थ्य होते? काय त्यांना दहा तोंडे व वीस हात होते? की ते इजार नेसत होते व बायबल पढत होते म्हणून ते इतके प्रबळ झाले? तर अनेक शोधांच्या साहाय्याने सिद्ध झालेली जी लांब पल्ल्याची कारीगार हत्यारे, त्यांत त्यांचे सामर्थ्य होते. ही हत्यारे म्हणजे युरोपियन शास्त्रीय संस्कृतीचा केवळ निष्कर्ष होत. त्या हत्यारांच्या जोरावर एक युरोपियन हजार हिंदु-मुसलमानांना भारी होता. हा अर्थ शहाजीसारख्या धोरणी, दूरदर्शी, मतलबी व जागरूक सरदाराच्या लक्ष्यान यावा, अशीच तत्कालीन महाराष्ट्राची स्थिति होती. तेव्हा दोषाटा वाटा शहाजीप्रमाणेच तत्कालीन समाजावर पडतो, हे उघड आहे. सगळेच आंधळे, त्यात एकालाच सुळावर चढविण्यात मतलब काय? ह्या बाबतीत शहाजीच्या पंक्तीस अकबर, शहाजहान, मीरजुमला व औरंगजेब असे सारेच बसतात.तेव्हा हा तत्कालीन भारतवर्षीय संस्कृतीलाच सर्वसाधारण दोष होय, हे कबूल करावे लागते.’’ (राधामाधव-विलास-चंपूकाव्य-प्रस्तावना) हत्यारे जुनी असोत वा नवीन सुधारलेली असोत, केवळ त्यांच्या दिमाखावर मूठभर ख्रिस्ती बनियांनी चढाईच्या उघड धोरणाने हिंदुस्थानच्या किना-यावर पाऊल ठेवणेच त्यांना शक्य नव्हते. हिंदी रियासती कितीही जु्न्यापान्या शस्त्रास्त्रांच्या सामर्थ्यावर टिकल्या असल्या, तरी मूठभर