निवडक प्रबोधन: Page 7 of 26

विद्यापीठातील शिक्षणाच्या विरुद्ध मी नाही. पण केवळ पदव्यांच्या पाठीस लागून स्वतःचे व देशाचे काहीच हित साधत नाही, हे आता हिंदी तरुणांना कळावयास पाहिजे. थोर लेखकांचे ग्रंथ व स्वकर्तृत्व यांच्या बळावरच मोठेपणा प्राप्त करून घेतला पाहिजे. कारण तोच मोठेपणाचा खरा मार्ग आहे. जगातील मोठमोठे धनिक कारखानदार अथवा ग्रंथकार विश्वविद्यालयांचे पदवीधर नाहीत. जगातील श्रेष्ठ ग्रंथकार वेल्स यांचे तर असे मत आहे की, ‘विद्यापीठाची पदवी हा अंगचे अज्ञान झाकणारा झगा आहे.’’ ...................... जबरदस्ताचा टिकाव (लेखांक ३रा) यानंतर असा एक प्रश्न उद्भवतो की युरोपियन बनिये सुधारलेली हत्यारे वापरीत असत आणि त्यांचे गोरे सोजीरांचे सैन्य युरोपियन कवायतीमुळे मोठे कदरबाज असे; या दोन लष्करी सामर्थ्यापुढे हिंदी राजेरजवाडे नामोहरम झाले की काय? किती झाले तरी हे गोरे पाहुणे मूठभर. त्यांनी सात समुद्र ओलांडून येथे यावे आणि शतकानुशतकांच्या स्थायिक रियासतींना बोलबोलता मुळापासून उखडून मोकळे व्हावे, हा सर्व चमत्कार काय बंदुकांचा आणि कवायतीचा? सुरुवातील या दोन विलायती कळी पाहून देशी लोक थोडे भेदरले खरे; पण त्यांनी त्या क्रिस्ती बनियांकडून त्यांची कारीगार शस्त्रे विकत घेऊन, आपल्या सैन्यानासुद्धा युरोपियन धर्तीची कवायत शिकविण्याचा उपक्रम सुरू केला. १७व्या शतकातल्या शहाजी राजे (शिवछत्रपतीचे वडील) भोसल्यासारख्या राजकारण धुरंधरालासुद्धा क्रिस्ती बनियांच्या पराक्रमाची ही मख्खी माहीत होती.

त्या दिशेने त्याने आपल्या सामर्थ्यवर्धनासाठी काय प्रयत्न केले, त्यांची मार्मिक चिकित्सा कै. राजवाडे येणे प्रमाणे करतात – ‘‘हत्यार चोख पाहिजे आणि ते प्रतिपक्षाच्या हत्याराहून श्रेष्ठतर पाहिजे, या बाबीची जाणीव शहाजीच्या ठाई स्वकालीन अनुभवाने अत्युत्कट बाणलेली होती. पूर्वेतिहासही त्याला तेच शिकवीत होता. कोणत्याही राष्ट्राच्या संस्कृतीचा श्रेष्ठ कनिष्ठपणा त्या राष्ट्राच्या हत्याराच्या स्वरूपावरून ओळखता येतो. फार काय सांगावे, हत्यार हे राष्ट्राच्या एकंदर संस्कृतीचे मापक आहे. जशी ज्या राष्ट्राची संस्कृती, तसे त्या राष्ट्राचे हत्यार....... लोखंडा बाणांहूनही दूर पल्ल्याच्या हत्यारांचा, म्हणजे दारूने उडणा-या वेळूच्या कांडांचा शोध लावणा-या आर्यांनी, केवळ लोखंडी तीराने लढणा-या आर्यांचा पराभव करून आपले रसायन-मिश्रण-ज्ञान जगाच्या अनुभवास आणिले. त्याहिपुढे मजल मारून लोखंडी नळ्यांत दारू भरून अर्ध्या पाव कोसावरून शत्रूचा पाडाव करणा-या मुसलमानांनी ख्रिस्ती हिंदु वगैरे कनिष्ठ संस्कृतीच्या लोकांचा पराभव केला. पुढे युरोपियन लोकांनी नाना शास्त्रीय शोधांच्या द्वारे नेमके काम करणा-या व दूरवर पल्ल्यांच्या तोफा, बंदुका वगैरे संगीन हत्यारांच्या जोरावर मुसलमानांची युरोपातील स्पेन वगैरे दशांतून हकालपट्टी केली व पृथ्वीवरील अमेरिका, आफ्रिका व हिन्दुस्थान हे देश जिंकण्याची खात्रीपूर्वक हिंमत बांधली. एवढी मोंगलांची अफाट व प्रबळ सत्ता, परंतु पोर्तुगीज चाच्यांनी कितीदा तरी समुद्रावर त्यांची इज्जत घेतली. त्याच काली कुस्तुंतुनियाच्या तुर्कांनी व्हेनियशियन लोकांपासून श्रेष्ठ बंदुका व तोफा आणि दारूगोळा तयार करण्याची सर्वश्रेष्ठ कला अर्धीमुर्धी व उष्टीमाष्टी किंचित् आपलीशी केली होती. त्या अर्धवट तुर्क कारागिरांना पदरी ठेवून दिल्लीचा मोंगल व दक्षिणेतील शहा हत्यारे व दारूगोळा बनवून त्याच्या जोरावर देशांतील अर्धवट सुधारलेल्या टाळकुट्या हिंदूंना व परस्परांना भिवडावीत असत. हा सर्व चमत्कार शहाजी पहात होता. उत्तम कारागीर हत्यार कोठून पैदा होते व कोण आणून देते. ह्याचा अनुभव जुन्नरच्या घाटाखालील कोकणात त्याला आला होता. दमण, दीव, वसई, गोवा, सुरत, तेलीचरी इत्यादी स्थळींच्या टोपीवाल्यांकडून कारागीर हत्यारे पैदा करून निजामशाही आदिलशाही व मोगलाई सैन्याहून शहाजी आपली फौज जास्त कर्तबगार ठेवू लागला. अशा त-हेने पक्ष सैन्य व हत्यार शहाजीने निर्माण केले आणि त्यांच्या जोरावर प्रकट स्वराज्य, प्रच्छन्न स्वराज्य, मांडलीक स्वराज्य व निर्भेळ स्वतंत्र स्वराज्य उत्तरोत्तर स्थापित असता, वेळोवेळी येणा-या विपत्तीत दम न सोडता, पूर्वीच्याहून जास्त हुरुपाने पुढील कर्तव्य तो बजावीत राहिला. सैन्य व हत्यार यांच्यावरील त्याचा विश्वास मोठ्या विपत्तीतही कधी ओसरला नाही. शेवटी या साधनांच्या जोरावर आपण विजयी होऊच होऊ अशी त्याची बालंबाल खात्री होती व