निवडक प्रबोधन: Page 6 of 26

धर्मगुरू आदिकांनी त्यांना पिळून काढून अनवस्था केली होती, त्यातच याही जुलुमाची भर पडली; व लोक क्रांतीला उत्सुक झाले. प्रारंभी केरेन्स्कीने रशियाच्या चौफेर उधळलेल्या बेफाम वारूचे वाग्दोर आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तो त्याचा हेतू सफल झाला नाही. लेनिनचे मत चालू युद्धाला प्रतिकूल होते, हे आधीच माहीत असल्यामुळे, रशियाला आपल्याविरुद्ध लढण्यापासून परावृत्त करण्यासाठी जर्मनीत अटकेत असलेल्या त्याला मुद्दाम जर्मन सरकारने खास गाडी सोडून रशियात नेऊन सोडले. त्याने तेथे अस्तित्वात असलेल्या लहान लहान किसान संघांचे संघटन करून त्यांच्यात युद्ध प्रतिकूल मतप्रसार केला व त्यातूनच रशियाचे नवे सरकार निर्माण केले. सोव्हियट म्हणजे किसानसभा. आजचे रशियन सरकार हे या सोव्हिएटांच्या गटांचेच बनलेले आहे. प्रथम या नव्या सरकाराचा अंमल एका जिल्ह्याएवढ्या प्रदेशावरच होता व त्यांच्या हातात फौजफाटाही नव्हता. लोकांना वाटे आता फार तर २४ तास यांचे हे बंड टिकेल; पण या त्यांच्या आशा जागच्या जागीच जिरल्या व नव्या सोव्हियट सरकारचे आसन स्थिर झाले व गेली १०-११ वर्षे त्या सरकारची सत्ता उत्तरोत्तर दृढतरच होत गेलेली आहे.

अगदी बंडाच्या धामधुमीतसुद्धा की, - ज्यावेळी त्याच्या अमलाखाली मूठभर प्रजा व लहानसा प्रदेश होता; - त्यावेळी देखील हे नवे सरकार आपल्या अंमलाखालील प्रदेशात विजेची सोय करण्याची, उद्योगधंद्यांनी पुनर्घटना करण्याची व शिक्षणाची सोय करण्याची धडपड करीत होते. रशियातील सर्व उद्योगधंदे व जमीनही सरकारच्या मालकीची असून, तेथे सर्वांचे अधिका-यापासून रस्त्यावरील निकृष्ट इसमापर्यंत सा-यांना सारखेच वेतन देण्यात येते. व त्यांचा दर्जाही सारखाच मानण्यात येतो. लग्नाच्या व घटस्फोटाच्या बाबतीत तेथे अगदी पूर्ण स्वातंत्र्य आहे, कसलीही अडचण नाही. गेल्या पाच वर्षांचा इतिहास पाहता रशियाची जेवढी आर्थिक उन्नती झाली आहे तेवढी जगातील दुस-या कोणत्याही देशाची झाली नाही.’’ अशा आशयाचे त्यांचे भाषण त्यांना दोन प्रश्न विचारण्यात आले.

(१) रशियांतील सरकार हे धर्म व ईश्वरद्वेष्टे आहे काय? व

(२) तेथे संपत्तीची समविभागणी झाली आहे काय? पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘‘रशियन सरकार स्वतः कोणताही धर्म मानीत नाही; व कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रचार चालू देत नाही. कारण देव व धर्म ही लोकांना सतत गुलामीत डांबून ठेवण्याची उपकरणे आहेत अशी त्यांची समजूत आहे .पण कोणत्याही इसमाला स्वतः वाटेल ती धर्मविषयक मते बाळगण्यात तेथे प्रतिबंध नाही.’’ दुस-या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘‘संपत्तीची समविभागणी करणे हे त्यांचे ध्येय आहे. ते अद्याप पूर्णतया साध्य झालेले नसले, तरी पुष्कळ अंशी अंमलात आलेले आहे.’’

(१०) राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता भारतमहर्षी सर प्रफुल्लचंद्र रॉय यांनीही याच व्याख्यानमालेत शीर्षोक्त विषयावर व्यक्त केलेल विचार – ‘‘माझा अनेक सरकारी शिक्षणसंस्थांशी व कलकत्ता विश्वविद्यालयाशी निकटचा संबंध आहे; तरीही माझे असे ठाम मत झाले की, सध्याच्या शिक्षणाने हिंदी तरुणांचे काहीही कल्याण झाले नाही. उलट त्यामुळे त्यांची दृष्टी फिरून जाते व ते हिंदी संस्कृतीला जवळ जवळ पारखे होतात. नाही म्हणायला या शिक्षणातूनच टिळक, गांधी, टागोर, रानडे वगैरे सारखी नररत्ने निर्माण झालेली आपण पाहतो. पण यांच्याऐवजी राष्ट्रीय शिक्षणाचा लाभ त्यांना झाला असता तर ते अधिक मोठे झाले असते. असे माझे मत आहे मोठेपणा हा इंग्रजी शिक्षणावर अवलंबून नाही. इंग्रजी विद्यापीठे नव्हती त्या वेळी नाही का शिवाजी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर वगैरेसारखे थोर स्त्रीपुरुष याच हिंदूंत निर्माण झाले? इतिहास वाचावयास मिळून लोकांत स्वातंत्र्यविषयक जागृती झाली ही गोष्ट पण हे असे होईल हे इंग्रेजी शिक्षणाचा प्रसार हिंदुस्थानात करण्याचा विचार इंग्रजांच्या मनात आला तेव्हाच त्यांना ठाऊक होते. आज ना उद्या हिंदुस्थान आपल्या हातचे जाईल याची त्यांना पूर्ण जाणीव होती. पण त्यांचा हे शिक्षण येथे देण्याचा उद्देश सांस्कृतिक विजयाचा होता.हा परिणाम घालविण्याकरिताच राष्ट्रीय शिक्षणाची खरी आवश्यकता आहे. इंग्रजी