निवडक प्रबोधन: Page 5 of 26

घरच्या स्त्रियांचेही स्त्रीस्वभावसहज कारुण्य नष्ट होऊन, त्या इतक्या कठोर कशा झाल्या याचे आम्हास आश्चर्य वाटते.’’ अशी बातमी मुंबईचे ‘सुदर्शन’ पत्रात प्रसिद्ध झाल्याचे ‘विजयी मराठा’ (१६-१२-२९) वरून समजते. जिवंत बोकड अग्नित जाळणे, घराच्या पायात गाडणे किंवा यज्ञयागाच्या सबबीखाली जीव जाईपर्यंत बुकलून ठार मारणे, या क्रिया ‘क्रुएल्टी टू अनिमल्स’ या कायद्याखाली येतात की नाही, याचा मुंबई सरकारच्या लीगल रिमेंब्रन्सरने अगत्य विचार करून आपला कायदेबाज निर्णय लोकांच्या माहितीसाठी जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. या याज्ञिकी अत्याचाराबद्दल सर्वत्र हाकाटी चालू असता. धारवाडचे कलेक्टर खुशाल चिरूट फुंकीत स्वस्थ बसतात, तर ‘भटांना सारे खून माफ’ ही पेशवाईच अजून चालू आहे की काय, हे तरी मुंबई सरकारने एकदा स्पष्ट जाहीर करावे, म्हणजे वादच मिटला. धर्माच्या नावाने होणारे असले भटी अत्याचार जर क्षम्य ठरतात, तर सतीच्या कायद्याचे बंधन भट मानतात, हा देखील भटांचा मूर्खपणाच ठरतो, असे मानणे प्राप्त आहे सुरीने बोकड कापला तर मान धडापासून वेगळी झाल्यानंतर सुमारे मिनिट दीट मिनीट तडफड करतो.

धारवाडी यागात तर भटांनी नुसते बुकलून बोकड मारले. बुकलण्याची क्रिया सुरीच्या खसक्यापेक्षा अर्थात् अधम आणि बिनपरिणामी. बुकलण्याचे बोकडाचा प्राण जायला कमीत कमी पाऊणतास तरी पाहिजेच पाहिजे. तेव्हा त्याच्या वधाच्या वेदना किती भयंकर असतील, याची कल्पना भटांपेक्षा भटेतरांना आणि धारवाडच्या गो-या कलेक्टराला खात्रीने सहज करता येईल. असे एक दोन बोकड नव्हे तर पंचवीस बोकड भटांनी नुसते बुकलून मारले, तरीही त्यांच्यावर ‘क्रूएल्टी टू एनिमल्स’ कायद्याखाली कलेक्टर खटला भरीत नाही, तेव्हा याचे कारण काय, याचा खुलासा सरकारने अवश्य केला पाहिजे. (८) इंग्रजी राज्य कां हवे? प. वा. लाला लजपतराय म्हणतात, ‘‘शेकडा पन्नास सुशिक्षितांना त्यांच्या हयातीपर्यंत इंग्रजांनी येथे रहावे असे वाटत असते. याचे कारण इतकेच की, यांचा आजपर्यंतचा काळ भोगविलासात गेला असल्यामुळे राज्यक्रांतीच्या वेळी ज्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्या सहन करण्याचे त्राण यांच्यात उरलेले नाही. यांनी आपला सारा काळ चैनीत घालविला असल्यामुळे हत्याराला स्पर्शही केलेला नसल्यामुळे व खेळातसुद्धा कधी कोणाशी सामना दिलेला नसल्यामुळे, कष्ट सहन करणे म्हणजे काय हेही यांना समजेनासे झालेले आहे. इंग्रजी शिकून अनायासे यांनी पैसा कमविला व त्रासाशिवाय आपले आयुष्य घालविले. राज्यक्रांतीबरोबर एकंदर समाजाची घडी बिघडते, हे यांना माहीत असल्यामुळे, वाणीने जरी यांनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तरी भविष्कालीन अशांततेचे व दुःखाचे चित्र यांच्या मनःचक्षूंसमोर उभे राहिले की हे गडबडून जातात. आणि यासाठीच पराधीनतेतसुद्धा जर सुखाने व शांतीने जीवन क्रमिता येऊन ऐश्वर्याचा लाभ होतो, तर स्वातंत्र्याकरिता जाणूनबुजून सरकारी नोकरीवर पाणी सोडण्यात व शांततेचा भंग करण्यात काय अर्थ आहे असे यांना वाटत असते, नव्हे अशी यांची ठाम समजूत झालेली असते. एवंच नोकरी चाकरी, धन व ऐषआराम यांचे हे लोक पक्के गुलाम आहेत. यांच्या दृष्टीने सुग्रास मोटारीला जी किंमत आहे ती काही स्वांतत्र्याला नाही! अशा लोकांकडून त्यागाची अपेक्षा करावयाची असल्यास इतकीच करणे योग्य होईल की, सुट्टीच्या दिवसांत एखाद्या ठिकाणी जाऊन हे एखादे व्याख्यान झोडतील! परंतु ते व्याख्यानही असले देतील, की ज्याने यांच्या नोकरीवर गदा येणार नाही किंवा यांच्यावर वरिष्ठांची वक्रदृष्टी होणार नाही. फार फार झाले तर हे लोक थोडासा पैसा देतील!’’

- महाराष्ट्र (नागपूर) १५-१२-२९ (९) रशियातल्या क्रांतीचे मर्म पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नागपूर हेमंत व्याख्यामालेत वरील विषयावर व्याख्यान झाले. त्याचा सारांश ‘महाराष्ट्र’ (१५-१२-२९) वरून – ‘‘रशियातील क्रांतीचे वैशिष्ट्य यात आहे की, ती युद्धाशिवायच घडून आलेली आहे. जर्मन महायुद्धात रशियातील फौजा गवताप्रमाणे कापल्या गेल्या. कारण त्यांच्याजवळ माणसे होती; पण लढाईच्या साधनांचा पुरवठा नव्हता. पण झार व इतर मुत्सद्दी यांना त्यांची दरकार नव्हती. आधीच रशियन प्रजेची झार, मुत्सद्दी, सरदारवर्ग,