निवडक प्रबोधन

प्रबोधनकार हे संबोधन ज्या नियतकालिकामुळे प्रबोधनकारांना चिकटले, त्याचे नाव ‘प्रबोधन’. या प्रबोधनाने बहुजन पत्रकारितेला एक नवे तेज आणि सन्मान मिळवून दिला. त्या प्रबोधनामधील हे काही निवडक लेख.

साप्ताहिक प्रबोधनमधील प्रबोधनकारांचे निवडक लेख

विचारक्रांतीच्या ठिणग्या

(१) जनतेच्या पाठिंब्याशिवाय सगळ्या चळवळी फोल नागपूरच्या हेमंत व्याख्यानमालेत बॅरिस्टर गिरी म्हणाले, ‘‘मी आयर्लंडात तीन वर्षे घालविली आहेत; त्या मुदतीत डी. व्हॅलेरा वगैरे तेथील ट्रेड युनियनिस्ट पुढारी यांच्या बरोबर काम करण्याचे प्रसंग मला अनेकवार आले. आणि तेथील चळवळीचा जो प्रत्यक्ष अभ्यास करायला मला मिळाला त्यावरून तरी मला असाच अनुभव आला की, राष्ट्रांतील जानपदाचा पाठिंबा मिळाल्याशिवाय कोणतीही चळवळ प्रभावी होऊ शकत नाही. आयर्लंडांतसुद्धा जोपर्यंत नुसती समाजाच्या वरच्या भागात – सुशिक्षित लोकांतच खळबळ चालू होती तोपर्यंत ब्रिटिश मुत्सद्यांनी त्यांच्या ओरडीकडे बिलकूल लक्ष दिले नाही. पण चळवळीचे लोण जानपदापर्यंत जाऊन पोचून त्यांचा पाठिंबा जेव्हा तिला मिळाला तेव्हा आयर्लंडाच्या पदरात स्वराज्य घालण्याखेरीज इंग्लंजला गत्यंतर उरले नाही. जनतेच्या हाती सत्ता आली पाहिजे. मानेवरील जोखड फेकून देम्याचा निर्धार जोर्यंत तुमच्या ठिकाणी उत्पन्न झालेला दिसणार नाही तोपर्यंत ब्रि. सरकार काही देईल ही आशाच सोडा! केवळ १२ टक्के सुसिक्षितांची अथवा श्रीमंताची ज्यात सोय होईल असे स्वराज्य आम्हाला नको आहे, तर ज्यात देशातील सर्वसामान्य जनतेच्या हाती सत्तासूत्रे येतील असे स्वराज्य आम्हाला हवे. देशातील कामगारांना, शेक-यांना, जनतेला स्वराज्याची तळमळ लागून त्यांनी संघटना केली तर स्वराज्य हां हां म्हणता हाती येईल. जातवारीची भावना देशाला घातुक आहे हे ध्यानात ठेवा. प्रतिदिन देशासाठी काही तरी केले पाहिजे ही भावना अंतःकरणात सदैव जागृत ठेवा!’’

(२) विश्वधर्माचे कातडे पांघरलेला स्वार्थ त्याच व्याख्यानमालेत स्वामी भास्करेश्वरानंद म्हणाले, ‘‘सा-या जगात एकच पंथ कधीच नांदू शकणार नाही. विविधता हा जगाचा धर्म आहे – निसर्ग आहे. पण विरोधातही साम्य वसत आहे, ही गोष्ट लक्षात आली म्हणजे जागतिक धर्माचे रहस्य सहज उलगडेल. निरनिराळे पंथ हे एकाच परमेश्वराकडे जाण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. पण हे रहस्य हृदयात वास करीत नाही, म्हणूनच आपण ही धर्माधर्मांतील भांडणे आज प्रत्यही पाहतो. आज उठला सुटला प्रत्येक जग जागतिक धर्म, विश्वबंधुत्व वगैरे शब्द ओरडत असतो. पण या विश्वधर्माच्या नावाखाली जो तो आपल्याच पंथाचे घोडे पुढे दामटत असतो. दोघे दारुडे भाऊ होते. ते एके दिवशी दारू प्यावयास बसले असता, त्यांपैकी प्रत्येकजण दुस-यास म्हणे, ‘अरे, ओरडून नकोस; शेजारच्या खोलीत काका झोपले आहेत ते उठतील.’ दोघांचाही हा क्रम चालल्यामुळे अखेर या सांगण्याच्या गलबल्यामुळेच काका उठले. बरोबर हीच स्थिती विश्वधर्माच्या गप्पा मारणा-या आजच्या लोकांची आहे. भांडणे ही अशी होतात.’’ – जागतिक शांतीसाठी धर्माच्या निरनिराळ्या स्वरूपांवर माथेफोडे करम्यापेक्षा, धर्माचेच माथे कायमचे फोडले , धर्म ही बाबच जर जगातून उध्वस्त केली तर काय होईल? खात्रीने ब-याचशा आधिव्याधी समूळ नष्ट होतील.

(३) धनगरसुद्धा मराठ्यांविरुद्ध ? बारामतीचे धनगर जातीचे पुढारी आणि शिक्षणप्रसारक श्री. हरी पिराजी धायगुडे, दादर येथील ‘’नवयुग साप्ताहिकात (१५-१२-२९) ‘‘धनगर समाजाविषयी दोन शब्द’’ लिहिताना म्हणतात :- ‘‘क्षत्रिय-मराठा-धनगर असलं मालगाडीवजा लांबलचक नाव धारण करणारी एक शाखा अलीकडे धनगर समाजामध्ये विलीन होऊ पाहात आहे. हरकत नाही! अशाने समाजाचे खानेसुमारीचा आकडा तरी वाढेल! हटकर वखुटेकर या दोन्ही शाखेचे लोक या तृतीय शाखेला मुळीच जवळ येऊ देत नाहीत. त्यांतील कित्येक सकारण उत्तर देतात की, ‘आम्ही शेळ्या मेंढरांचे पालनपोषण करावे. त्यांच्या लोकरीने स्वतःचे व जगाचे थंडीवा-यापासून निवारण करावे, आणि या तृतीय पंथी तोतयाने त्यांना कापून त्यांचे मांस विक्रीवर श्रीमंत बनून चैनीत राहावे, ते काही असो; पण आमचा मेंढरांशी प्रत्यक्ष संबंध येतो म्हणून आम्ही धनगर असे यांनी म्हणावे हे आम्हांस मुळीच पसंत नाही.

मग पुष्कळ मुसलमानही हा बकरेकसायांचा