महामायेचे थैमान: Page 10 of 12

पाडतो, एवढीच अपेक्षा या होळकर-निंदकांची दिसते. पण ‘शुन:कपाले लगुडप्रहार:‘ हीच त्यांची योग्य संभावना, हे ते विसरतात. मागे कोल्हापूरच्या महाराजांच्या गुप्त दानाने संदेशचे तोंड बंद झाल्याचा गवगवा पुष्कळांच्या स्मरणांत असेलच. प्रस्तुत लेखकाने खुद्द छत्रपतींना त्याचा खुलासा विचारला असतां ते म्हणाले, “ हे एक जंतरमंतर आहे. कोणी काही बरे वाईट लिहिले म्हणून माझ्या अंगाला काही खांडके पडत नाहीत, Money makes the maro go अशी इंग्रजीत एक म्हण आहे. पण मी पैशाने घोड्यांचीच नव्हे तर माणसांची सुद्धा गाढवे बनवितो ती ही अशी ! ” कै. शिवाजीराव होळकरांनी ‘ गुराखी ‘ च्या भाट्याची तर फारच योग्य संभावना ठेवली. फर्स्ट क्लास प्रवासखर्च पाठवून त्याला इंदोरास आमेत्रण दिले. भाट्याला वाटेल की माझा शिमगा फळाला आला . खुद्द शिवाजीराव जातीने स्टेशनवर सामोरे गेले . हे सन्मान्य पाहुणे गडीतून उतरताच वेटिंग रुममध्ये नेऊन हंटरखाली यथास्थित चोप देऊन परत मुंबईला रवाना केले. शुन:कपाले लगुडप्रहार: हाच होळकरी मलिद्याचा ‘मेन्यू’ आहे, हे मौज चाबुक कर्त्यांनी लक्षात ठेवावे. सारांश, श्रीमंत तुकोजीराव होळकरांचे निंदक माजी गुराखी भूत प्रभृतीचे सांप्रदायिक आहेत, एवढे लक्षात ठेवले म्हणजे त्यांच्या छिनाल शिमग्याला काय किंमत द्यायची ती विचारवंतांना सांगणेच नको. काश्मिरचे सर हरिसिंग आणि इंदोरचे श्रीमंत तुकोजीराव यांच्यावर दुसरा असा एक आक्षेप घेतां येईल की लक्षावधि प्रजाजनांच्या सुखदु:खाची जबाबदारी यांना पार पाडावयाची असल्यामुळे, सामान्य माणसांप्रमाणे यांची बुद्धि कमकुवत व दृष्टी आकुंचित असता कामा नये. ज्यांना रॉबिनसन मुमताझसारख्या चंवढाळ नारी बोलताबोलतां फसवितात त्यांची बुद्धी तीव्र व दृष्टी धोरणी कशी मानावी ? हे कशाचे मुत्सद्दी आणि डिप्लोमॅटस ? शंका बरोबर आहे. दोघेहि लव्हाळ्यांत सपशेल फसले. ही फसवणूक त्यांच्या कमजोर धोरणामुळें झाली, असे जरी क्षणभर मानले, तरी एक गोष्ट विसरुन भागणार नाही की ते विश्वासघाताला बळी पडले. सर्व घात पत्करतात पण विश्वासघातापुढे कोणाची काही अक्कल चालत नाही. मनुष्यांचे सर्व व्यवहार विश्वासावरच चालतात. अशी कोणती गोष्ट आहे की जिच्या सांगतेसाठी तिळमात्र जरुर लागत नाही ? एकहि आढळणार नाही. आजपर्यंत ज्या मोठमोठ्या राज्यक्रांत्या झाल्या, त्यांपराजीत नृपतीला विश्वासघातानेंच मान कापली गेली. विश्वासघातापुढे वृहस्पतीचीहि अक्कल ठार व्हायची, तेथे हरिसिंग होळकरांचा पाड काय ? जेथे धडधडीत विश्वासघात होत आहे, तेथे फसलेल्या मनुष्याची कीवा केली नाही तरी निंदा करण्यास मुळीच वाव नसतो. मुमताज महामायेचा थैमान बावलाच्या खुनांत सुरु झाला आणि त्याची अखेर तिघांना फाशी व चौघांना हद्दपारी यांत झाला. याशिवाय धरपकड, तात्पुरती कैद, साक्षीपुराव्यासाठी हेलपाटगिरी, झडत्या, बाचाबाची, उलटसुलट तपासण्या, वगैरे अनंत भानगडीत शेकडो लोकांची धुळपट निघाली, ती वेगळीच. शनिवार ता. २३ मे १९२५ रोजी सेशन कोर्टाने या थैमानाचा सर्व इतिहास तपासून, ज्यूरी व न्यायमूर्ती यांनी एकमताने कमाल कसोशीचा न्याय दिला. या न्यायामुळे फांसावर चढणा-या तिघा आरोपींपैकी पोंडे व दिघे हे दोघे अगदी भरज्वानीचे तरुण असल्यामुळे त्यांच्या दृष्कृत्याची चीड आली तरी त्यांच्या दुर्दैवाबद्दल करुणा उत्पन्न झाल्याशिवाय रहात नाही. तारुण्याच्या उमेदीला विवेकची दाबणी ( ब्रेक ) नसली म्हणजे मनुष्याच्या हातून केवढे भयंकर दुष्कृत्य होते, हे पोंडे व दिघे यांच्या चरित्रावरुन स्पष्ट दिसून येईल. राजेलोक कशाने खूष होतात, याचा वास्तवीक कोणालाच थांग लागत नाही, इतके ते बहुश: खोल मनाचे असतात. लोकसंग्रहाच्या बाबतीत ते प्रत्येक व्यक्तीची पूर्ण पारख करून त्याविषयी आगाऊच आडाखा अजमावून ठेवतात, तरी बाह्यत: भल्या बु-याला एकाच दावणीचा आश्रय देतात. त्यामुळे प्रत्येकाला असे वाटते की महाराज माझ्यावरच विशेष खुष आहेत. पण खुद्दांचा आडाखा काही न्याराच असतो. कै. शाहू छत्रपति या लोकसंग्रहाविषयी बोलत तेव्हां म्हणत “ आमची ही एक मेनेजरी आहे. येथे माणसांतले सर्व प्रकार आहेत. जनावरांत कोल्ह्यामाकडापासून तो सिंहापर्यंत जसे आमच्या संग्रही