महामायेचे थैमान: Page 9 of 12

खेळणा-यांना स्वाभिमान ही चीज पारखी असल्यास काही आश्चर्य मानण्याचे कारण नाही. आपलेपणाची आमची जाणीवच मेली आहे. वैयक्तीक स्वार्थापुढे प्रत्यक्ष स्वकियांच्या, स्वदेशीयांच्याहि अब्रुचा होम करण्यास निरढावलेल्या माणसात माणुसकीचा अंश तरी सापडणे शक्य आहे काय ? महपराष्ट्रीयांचा स्वाभिमान जर जागृत असता, त्यांच्यांत आपलेपणाचा ओलावा असता, आणि केवळ टीचभर पोटाच्या खळगीसाठी परक्यांना चहाड्या चुगल्या सांगून आत्मद्रोही घरभेदाचा भिक्षुकीपणा त्यांनी केला नसता तर आज ते इंग्रेजी राज्यसत्तेच्या पायांतली खेटरे व त्यांच्या नोकरांच्या हंटरखाली शिस्तीच्या गोणी वाहणारी गाढवे झालेच नसते. महाराष्ट्रातला इंग्रेजी राद्यसत्तेचा पाया महाराष्ट्रीयांच्या घरभेदावर आणि आत्मद्रोहपवरच उभारलेला आहे. ही इतिहाससिद्ध गोष्ट धडधडीत डोळ्यांपुढे असूनही जर आम्हाला अझून एकमेकांना खाली ओढण्याची आसुरी प्रवृत्ती दाबून टाकता येत नाही, तेव्हा आमची अवनत होण्याची प्रवृत्ती किती सडून कुझुन गेली आहे हे न दाखवताही सिद्ध होण्यासारखे नाहीकाय ? सारांश, स्वकीयांच्या व स्वदेशीयांच्या निंदा नालस्तीवर पोट भरण्याची प्रवृत्ती हेच सुचविते की हिंदु लोकांना मुळी स्वाभिमानच (Self respect) नाही. अर्थात कदरबाज व स्वाभिमानि इंग्रजी राजसत्तेचा वरवंटा फिरून खालसा झालेल्या खालसातल्या गुलामांना स्वयंशासित स्वदेशी राज्यांचा तीव्र द्वेष व बदनामी करण्यातच होणारा आनंद आसुरी व आत्मद्रोही प्रवृत्तीचा द्योतक आहे. या द्वेषात व बदनामीत सत्यप्रियतेचा व अन्यायाच्या तिटका-याचा कितीही दिखीऊ मालमसाला घातल्याचा बहाणा निंदक करत असले, तरी ज्यांना ज्यांना या निंदकांच्या चारित्र्याचा कुळामुळासकट तपशील पूर्ण माहित आहे, त्यांना या बहाण्यांतले ढोंग समजत नाही असे नाही. तात्पर्य, नीतिदाक्षिण्याच्या सबबीवर होळकर सरकारची विटंबना करणा-या पोटभरू पत्रांचा चालू असलेला शिमगा म्हणजे सैतानाचा बायबलपाठ होय. या सैतानांचा नुसता नामनिर्देश करणे म्हणजे नरकांत धोंडा टाकून आपल्या अंगावर घाण उडवून घेण्यासारखे आहे, हे महाराष्ट्रात आज तरी कोणाला नव्याने सांगण्याची जरुरी नाही. बावला खुनीचे प्रकरण उपस्थित झाल्यापासून तो खुनी लोकांना शिक्षा होईपर्यंत महाराष्ट्रांतल्या यच्चयावत पत्रकारांनी मौन धारण केले असता, मौज व चाबूक या दोन छिनाल वाड्.मयप्रसारक पत्रकारांनी होळकरांची निर्भत्सना व बीभत्स विटंबना केली, म्हणून या दोन विवेकच्युत संपादकांना महाराष्ट्रात एक तरी विचारवंत सत्यप्रियतेने व नीतिदाक्षिण्याचे सर्टिफिकीट देईल, असे आम्हाला वाटत नाही. भयत ‘भूत’ ‘गुराखी‘ च्या ‘विक्षिप्त‘ पणाची घाणेरडी भिक्षुकी परंपरा चालवून, इतिहासाची पुनरावृत्ति घडवून आणल्याचा कितीहि आसुरी आनंद या पत्रकादांना होत असला, आणि आचकट विचकट अशा हलकट वाड्.लय प्रसारावर त्यांनी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यांत कितीहि कौशल्य दाखविले असले, तरी महाराष्ट्राच्या सामाजीक, धार्मिक, राजकीय व विशेषत: नैतिक क्षेत्रांत या “मौज” व “चाबूक” कर्त्यांचा भाव काय आहे ? स्वत:च्या नीतिभ्रष्टतेचा व सामाजिक नालायकीचा तिळमात्र विचार न करता, केवळ ‘मी पत्रकार आहे’ एवढ्याच भांडवलावर या पत्रांनी वाटेल त्याच्या अब्रूवर निखारे ठेवून, त्यावर आपल्या उदरनिर्वाहाचे पापड भाजीत सुटावे, ही गोष्ट त्यांना व्यक्तिश: तर बेशरमपणाची आहेच, पण मराठी ‘जर्नालिझम’ ला अत्यंत लांछनास्पद आहे. वाचकांना हे आता सांगायलाच नको की, कै. टिळकांचीहि वीभत्स विटंबना करण्यास न शरमलेले संदेशकार आज चाबूकस्वार असल्यामुळे आमच्या स्पष्टोक्तीबद्दल आमच्यावरहि आपल्या वाड्.मय ड्रेनेजचा पंप सोडण्यास आता कमी करणार नाहीत; आणि लवकरच प्रबोधनकार ठाकरे चाबूक मौजेच्या गटारगंगेत, आपादमस्तक हवकून चुबकून निघालेल्या सर्वांना दिसतील. नरकांतच धोंडा टाकल्यावर आंगावर काही उडालेच तर आम्हांला तक्रार करण्याची किंवा प्रत्युत्तर देण्याची कांहीच जरूरी नाही. होळकर विटंबनेचा हेतु होळकरांच्या निंदेवर जगणारी पत्रे उघड उघड पोटार्थी इंदोराहून काही मलिद्यांची पार्सले जर या सज्जनांच्या पदरांत गुपचूप येऊन पडती तर त्यांचा चालू असलेला शिमगा तेव्हाच बंद पडला असता, असे मानण्यास अवसर आहे. या शिमग्यांत चीड नाही, सत्याची नाही, काही नाही, हा दिखाऊ दिमाख आहे. भुंक भुंक म्हटले की माणूस त्रासून जातो आणि भकरीचा एकदा लठ्ठ तुकडा किंवा एखादे हाडूक पुढ्यात फेकून कुत्र्याचा भुकभुकाट बंद