महामायेचे थैमान: Page 8 of 12

असे स्पष्ट दिसून येईल. शिवाजीराव होळकरांच्या वेळी मुंबईस आवसेपौर्णिमेला अवतरणारे फाटकांचे भूत, १८९२ ते १८९६ पर्यंत मुंबईला ‘सोनेरी टोळी’ नावाखाली धुडघूस घालणा-या पटईत लुटारु कंपूतल्या भाट्यांचा गुराखी व विक्षिप्त, ही पत्रे म्हणजे आजच्या मौज चाबुक वगैरे पाचकळ पत्रांचे पूज्य पितर होत. एका ब्राह्मण न्हाणवलीची मिरवणूक चालली आहे, शिवाजीराव ती न्हाणवली पकडीत आहेत व न्हाव्याकडून तिचे केस भादरीत आहेत, असली चित्रे ‘इंदोरातील अत्याचार’ मथळ्याखाली या पत्रात दर आठवड्यास प्रसिद्ध होत. त्याचप्रमाणे इंदोरातील वकीलांकडून राजवाड्यासमोरची सडक उकरुन, तीवर खडी दाबण्यासाठी वकीलांना टोणग्यांऐवजी मुन्सिपालटीच्या रुळाला जुंपले आहेत. हळदकुंकवास जाणा-या ब्राह्मण बायकांना शिवाजीराव भंग्यांकडून खराट्याचा मार देत आहेत. शेकडो ब्राह्मणांच्या घरांवरुन व देवळांवरुन शिवाजीराव गाढवांचे नांगर फिरवीत आहेत ; प्रजाजन जीव घेऊन स्टेशनावर भयभित पळत आहेत ; भररस्त्यावर शिवाजीराव ब्राह्मणांच्या पगड्या भंग्यांच्या डोक्यांवर चढवीत आहेत ; इत्यादि हजारो अनन्वित काल्पनीक आरोपांची शिळा छापाची कार्टून चित्रे व तसल्याच धर्तीचे घाणेरडे लेख भूत गुराखी विक्षिप्तांदि पत्रांतून एकसारखे प्रसिद्ध होत असत. शिवाजीराव होळकरांची हा भिक्षुकी निंदा अखेर त्यांच्या राज्यसंन्यासाला कारण झाली व कारस्थान्यांच्या नवसाला परशुराम फळला. ही एक चणचणित भवानी निंदक पत्रांच्या संप्रदायाला दोन अडीज तपांपूर्वी प्राप्त झालेली असल्यामुळे, महामाया मुमताजच्या पुण्याईने आज हाताशी आलेली होळकर-उच्चाटणाची पर्वणी कोणता भिक्षुक पत्रकार गमाऊन बसेल ? स्वराज्याचा, स्वयंनिर्णयाचा, स्वातंत्र्याचा सध्या केवढाहि हैदोस सुरू असला आणि या हैदोसात भिक्षुकी वाघ सिंहाचा कितीहि थैमान असला, तरी कोल्हापूर ग्वाल्हेर इंदोर बडोद्यासारखी मोठमोठी ब्राह्मणेत्तर संस्थाने या स्वराज्यवाद्यांच्या डोळ्यांत वाळूप्रमाणे सलत आहेत, ही गोष्ट बहुजनसमाजाला व खुद्द ब्रिटिश सरकारला आता पूर्ण माहीत आहे. त्याचप्रमाणे नीतिदाक्षिण्याचा मोठा आव आणून स्वदेशी राजांच्या अनीतीचे वाभाडे काढणारे पत्रकारहि सामाजिक नीतिमत्तेच्या ताजव्यांत काय दर्जाचे आहेत, याचीहि माहिती जनतेला व सरकारच्या गुप्तपोलीस खात्याला मुळीच नाही, असे मुळीच नाही. टैम्ससारख्या आंग्लहितवादी पत्रांनी संस्थानबुडच्या डलहौशीचा हौशी सूर काढून स्वदेशी राजांच्या उच्चाटणाचा मंत्र म्हटला तर त्यांत काही नवल नाही. तो त्यांना शोभून दिसेल. इतकेच नव्हे तर स्वदेशी पत्रांनीच स्वदेशी राजांच्या आईमाईचा उद्धार करण्यांत मोठ्या अहमहमिकेने पुढाकार घेतला तर ती सुद्धा आंग्लपत्रकारांना एक इष्टापत्तीच होत असते. राष्टातलेच लोक एकमेकांच्या पाडावाचा प्रयत्न करीत असतां, लाथाळीचा व गुह्यस्फोटाचा शिमगा खेळू लागले, तर जेतृत्वानंदांत डुलणा-या राज्यकर्त्याना तो कपिलाषष्ठीचा योग का बावला खुनाच्या पहिल्याच आर्टिकलांत टैम्सने तर एवढा मोठा गडगडाट केला की ‘या प्रकरणांत कोणी एखादा स्वदेशी राजा जरी असला तरी त्याचाहि हिंदुस्थान सरकारने मुलाजा राखू नये, असा आमचा आग्रह आहे.‘ मुमताजसारख्या छिनील तरुणीच्या पायी बावलासारखी एक अप्रसिद्ध व्यक्ति कांही क्षुद्र माथेफिरु मारेक-यांच्या हातून ठार मारली जातांच, ओढून ताणून लावलेल्या संबंधावर जर इंदोर संस्थान चेचण्याची अप्रत्यक्ष सूचना करण्याइतकी ही अंग्रेजी पत्रे बेगुमान बनतातट, तर पंजाबांत निष्कारण कत्तली करणा-या डायरओडवायरच्या हिंदुस्थानांतल्या आंग्लाईबद्दल परराष्ट्रीयांनी असलेच उद्दार काढले तर टैम्सप्रभृतींना ते कितपत मानवतील ? पण आंग्लराष्ट्रे असा राष्ट्रद्रोह कधीच करणार नाहीत. स्वार्थासाठी ती एकमेकांशी कितीही झगडली, तरी परकीयांपुढे आपली गुह्यें कधाच प्रगट करणार नाहीत. थोड्याच दिवसांपुर्वी लंडनात खुद्द राजघराण्यांतील एका राजपुत्राचे लव्हाळे लफडे उपस्थित झाले होते. पण इंग्लीश जनता कडवी स्वाभिमानी असल्यामुळे, आत्मद्रोही गुलाम हिंदूप्रमाणे, त्यांनी या प्रकरणाचा प्रस्तुत होळकर-निंदेच्या गलिच्छ शिमग्याप्रमाणे, पराचा कावळा न करता, ती बातमी उगाच एका कोप-यात अस्पष्ट भाषेत प्रसिद्ध करून ठिकच्या ठिकाणी दडपून नामशेष केली. गुलाम हिंदुंना स्वाभिमानच नाही. महपराष्ट्रीयांनी स्वाभिमानाची प्रथम होळी केली तेव्हाच त्यांचे स्वराज्य सरणावर चढले. आज स्वराज्याचा स्वातंत्र्याचा आणि स्वयंनिर्णयाचा केव्हढाही डांगोरा पिटला जात असला, तरी त्यात स्व कोठेच नाही. गुलामगिरीत पिचत असता पक्षभेद, पंथभेद, जातीभेद इत्यादी भेदांचा नरक चिवडण्यातच आपल्या उरल्या-सुरल्या अकलेची धुळवड शेणवड