महामायेचे थैमान: Page 7 of 12

काळी सर्व ठिकाणी रुढ होती, आज आहे आणि जोपर्यंत मानवाच्या भावनांत आमूलाग्र विलक्षण क्रांति होणार नाही तोपर्यंत पुढेहि ती तशीच चालू राहणार. मग संपत्तिमान लोकांना व स्वयंनिर्णयी राजांनाच तिचे वावडे का म्हणून असावे ? श्रीमंतच वास्तवीक रखेल्या ठेवू शकतात. हातावर मिळवून तळहातावर खाणा-या पोटार्थाचा तो प्रश्नच नव्हे. नीतीची तत्वे काहीहि असली तरी लव्हाळ्याचे त्रांगडेच असे मोठे जबरदस्त आहे की त्यापुढे ब्रह्मदेवाच्या अकलेची सुद्धा टाप चालली नाही, मग मनुस्मृतीला कोण भीक घालतो ? आणि पोटार्थी पुराणिकांच्या पापपुण्याच्या पुराणांना पुसतो कोण ? ‘अव्यवस्थित व्यवहारापेक्षा विवाह बरा‘ हे सूत्र मान्य झाले की ‘गुप्त व्यभिचारापेक्षां उघड रखेली बरी‘ हे सूत्र व्यवहारांत तरी निदान फारसे निंद्य ठरणार नाही. शेकडो विधवांना व कुमारिकांनाहि पंढरपूरच्या वारकरणी बनविणारे हजारो नराधम आज हिंदुसमाजात प्रतिष्ठितपणे वावरताना काय कोणाला माहितच नाहीत ? होळकर किंवा हरिसिंग यांच्यावर टीकेचा भडीमार करणारे शहाणे स्वत: तरी नीतीमत्त्येचे निष्कलंक पुतळे आहेत काय ? वर्तमानपत्राचा संपादक बनताच त्याच्या शेकडो निंद्य कृष्णकृत्यांवर छापखान्यातल्या शाईचा काळा पडदा पडतो आणि ‘सारे खून माफ’ झालेला हा प्राणी ‘केवळ पोटासाठी’ नितीमत्त्येच्या ढोंगाने वाटेल त्यावर लूत लागलेल्या कुत्र्याप्रमाणे भुंकण्यास समर्थ ठरतो, असे समजण्याचा काळ अजून आलेला नाही. पुढे कदाचित् आलाच तर या ढोंगी तत्ववेत्त्यांना भर तिव्हाट्यावर जोडे पैजार करायला विवेकी जनतेला फाटक्या पायतणांचा तुटवडा खास पडणार नाही. तात्पर्य, मुमताजला होळकर सरकारने आश्रय देण्यात, पोटभरु पत्रकर्त्यांकडून आपल्या बेचाळीस पितरांचा उद्धार करुन घेण्याइतका मोठा भयंकर अपराध केला आहे, असे मुळीच नाही. श्रीमन्महाराज तुकोजीराव होळकर हे आपल्या अफाट इंदोर संस्थानात अत्यंत लोकप्रिय असे नृपति आहेत. लोकांची त्यांच्यावरील श्रद्धा व प्रेम वर्णनीय आहे. गाव तेथे महारवाडा आणि घर तेथे शेतखाना या नियमनुसार महाराजांचेच अन्न खाऊन त्यांच्या तळपटाचे चिंतन करणारे कांही भिक्षुकी अड्डे खुद्द इंदोरांत आहेत; नाही असे नाही. पण एकंदर लोक संख्येच्या मानाने या कृतघ्न कारस्थान्यांची संख्या मूठभर म्हटली तरी चालेल. मागे चार पाच वर्षांपूर्वी एका इरसाल भटाने असेच एक ‘बलात्कारें बाम्हणी भोगिली‘ चे काहूर महाराजांविरूद्ध बॉम्बे कॉनिकल पत्रात उठवले होते. त्या वेळचे संपादक आग्या वेताळ हॉर्निमन यांनी तर त्या पराचा भयंकर कावळा केला. भिक्षुकशाही छावण्यांत तर एकच सूर वांहू लागला की हॉर्निमनाची चार पांच सणसणीत आर्टिकले फडकली की- इंदोर संस्थान खालसा झालेच ! स्वर्ग अगदी दोन बोटे उरला. पण इतक्यात इंदोरच्याच प्रजाजनांनी अक्राळविक्राळ विराटरुप धारण करुन सर हुकूमचंद शेटजींच्या मुखाने ‘मुद्द्यापुराव्यानिशी कोण मायेचा पूत पुढे येत असेल त्याने यावे‘ असे दणदणीत आव्हान देतांच सर्व भिक्षुक कारस्थान ठिकच्या ठिकाणी थंडगार ! असे कोणते ब्राह्मणेतर संस्थान आहे की ज्याचे तळपट उडविण्याच्या कामी भिक्षुकांनी व भिक्षुकी पत्रकारांनी आपल्या कारस्थानी अकलेला तणावे दिले नाहीत ? सातारच्या प्रतापसिंह छत्रपतीला यांनीच नाना प्रकारची कुलगुंडी उपस्थित करुन कायमचा उखडला. कोल्हापुरच्या राजावर या राजापूरच्या कोल्ह्यांची तर केवढी करडी वक्रदृष्टी ! बेळगावच्या नामदार बेळवीनी एका कुळकर्णी परिषदेत सांगितले की “ In Kolhapur no man’s life or wife is safe” (कोल्हापुरात कोणाहि माणसाचा जमाना किंवा जनाना बिनधोक नाही.) तर आमच्या केसरी दादानी पांत्रजन्य ठोकला की “ पहा हो पहा, हा शाहूमहाराज स्वराज्यद्रोही छत्रपति आहे.” यापेक्षा निंदेचा व शिव्याश्रापाचा कडेलोट कडेलोट म्हणतात तो कोणता ? बडोद्यास ऐतखाऊ भटांची खिचडी बंद केली तेव्हा सयाजीराजांवर केवढा गहजब ! २५-३० वर्षापूर्वी कै. शिवाजीराव होळकरावर उठलेले भिक्षुकी काहूर पुष्कळांच्या स्मरणात असेलच, आज तुकोजीरावांची बेलगाम निर्भत्सना करणा-या पोटभरु भिक्षुकी पत्रातल्या हलकट चित्रांशी व पोरकट लेखांशी ते ताडून पाहिले, तर स्वदेशी राजाची अवहेलना करुन त्यांच्या निंदेवर आपली लोकमान्यता सावरण्याची ही एक अखंड भिक्षुकी परंपराच आहे